आठवड्याभरात अफगाणिस्तानातील तालिबानच्या हल्ल्यात २९१ जवानांचा बळी

काबूल – गेल्या आठवड्याभरात अफगाणिस्तानात तालिबानने चढवलेल्या दशतवादी हल्ल्यांमध्ये २९१ अफगाणी जवानांचा बळी गेला. अफगाणिस्तानातील गेल्या १९ वर्षांच्या इतिहासातील हा सर्वात भीषण आठवडा असून शांतीचर्चेला अवघे काही तास शिल्लक असताना तालिबानच्या हल्ल्यांमध्ये वाढ झाल्याचा आरोप अफगाणिस्तानच्या वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांनी केला. तालिबानच्या हल्ल्यांमध्ये वाढ होत असताना अफगाणिस्तानातून शीखधर्मीय नेत्याचे अपहरण झाल्याची माहिती समोर येत आहे. भारताने या घटनेवर संताप व्यक्त केला असून सदर नेत्याच्या सुटकेसाठी अफगाणी यंत्रणेशी संपर्क साधला आहे.

Afganistanगेल्या आठवड्याभरात तालिबानने अफगाणिस्तानच्या ३२ प्रांतात ४२२ हून अधिक हल्ले चढविले आहेत. अफगाणी सुरक्षा यंत्रणेला लक्ष करून चढविलेल्या या हल्ल्यांमध्ये २९१ जवानांचा बळी गेला तर साडेपाचशेहून अधिक जण जखमी झाले आहेत. यामुळे अफगाणिस्तानात शांती प्रस्थापित करण्यासाठी तालिबानची अजिबात उत्सुक नसल्याचा आरोप अफगाणिस्तानच्या राष्ट्रीय सुरक्षा समितीचे प्रवक्ते जावेद फैजल यांनी केला. गेल्या १९ वर्षांपासून अफगाणिस्तानात सुरू असलेल्या संघर्षापैकी हा सर्वात भीषण आठवडा ठरल्याचे फैजल यांनी लक्षात आणून दिले. अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष अश्रफ गनी यांनी देखील तालिबानच्या या हल्ल्यावर सडकून टीका केली. अफगाणिस्तानात शांती प्रस्थापित करण्यासाठी तालिबान बांधिल नाही, हे या हिंसाचारामुळे स्पष्ट झाल्याचा ठपका राष्ट्राध्यक्ष गनी यांनी ठेवला.

तालिबानच्या भीषण हल्ल्याची माहिती समोर येत असतानाच अफगाणी लष्कराने गेल्या चोवीस तासात हेल्मंड आणि कंदहार या प्रांतांमध्ये केलेल्या कारवाईत तालिबानचे १३ दहशतवादी ठार केले आहेत. यावेळी अफगाणी लष्कराने तालिबानकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा, रेडिओ यंत्रणा, लष्करी वाहने आणि अंमली पदार्थाचा मोठा साठा जप्त केला. अंमली पदार्थांच्या शेतीसाठी प्रसिद्ध असलेल्या हेल्मंड प्रांतातील अफगाणी लष्कराची कारवाई महत्त्वाची मानली जाते. अफगाणी लष्कराच्या कारवाईवर तालिबानने टीका केली आहे.

अफगाणी लष्करावरील तालिबानच्या हल्ल्यांमध्ये वाढ झालेली असताना, अफगाणिस्तानातील अल्पसंख्याकांवर हल्ले वाढल्याचेही समोर येत आहे. पाकिस्तानच्या सीमेलगत असलेल्या अफगाणिस्तानच्या पाकतिया प्रांतातील शीखधर्मीय नेत्याचे अपहरण झाले आहे. गेल्या महिन्याभरात अफगाणिस्तानातील शीखधर्मीयांना लक्ष्य करून चढविलेला हा दुसरा हल्ला ठरतो. याआधी अफगाणिस्तानातील शीखधर्मीयांच्या गुरुद्वारावर दहशतवाद्यांनी हल्ला चढवला होता. अफगाणिस्तानातील शीखधर्मीयांवरील या दोन्ही हल्ल्यांमागे तालिबानचा हक्कानी नेटवर्क गट असल्याचा आरोप केला जातो. अफगाणिस्तानातील अल्पसंख्यांकांवर होत असलेल्या या हल्ल्यांवर भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अनुराग श्रीवास्तव यांनी तीव्र संताप व्यक्त केला.

दरम्यान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प अफगाणिस्तानातील अमेरिकेच्या सैन्य माघारीवर ठाम आहेत. अफगाणिस्तानातील सर्व गटांनी शांतीप्रक्रियेचे पालन करावे, असे आवाहन राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्याकडून केले जात आहे. अशा परिस्थितीत, अमेरिकेतील रशियन राजदूत अँटोली अंतोनोव यांनी अफगाणिस्तानसाठी नियुक्त केलेले अमेरिकेचे विशेषदूत झल्मे खलीलजाद यांची भेट घेतली. यावेळी आंतरराष्ट्रीय दहशतवाद आणि अफगाणिस्तानातील समन्वय याविषयी चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे.

leave a reply