चीनविरोधात ‘एलएसी’ वरील दीर्घकालीन तैनातीसाठी भारतीय लष्कर सज्ज

- संरक्षणदलप्रमुख जनरल बिपिन रावत यांची ग्वाही

नवी दिल्ली – भारत व चीनमधील प्रत्यक्ष नियंत्रणरेषेवर (एलएसी) दीर्घकालीन तैनातीसाठी भारतीय लष्कर पूर्णपणे सज्ज असल्याची ग्वाही देशाचे संरक्षणदलप्रमुख (सीडीएस) जनरल बिपिन रावत यांनी दिली. जूनमध्ये गलवान व्हॅलीत झालेल्या संघर्षानंतर भारत व चीनमधील तणाव अद्यापही कायम असून, या मुद्द्यावर लष्करी पातळीवर झालेल्या चर्चा अपयशी ठरल्या आहेत. त्यामुळे सीडीएस जनरल रावत यांनी संसदीय समितीसमोर केलेले वक्तव्य महत्त्वाचे ठरते. याच पार्श्वभूमीवर, चीनने पुन्हा एकदा भारताबरोबरील सीमारेषेवर शांतता व स्थैर्य आवश्यक असल्याचे आवाहन केले आहे.

China-Indiaगलवान व्हॅली संघर्षात भारतीय लष्कराने चीनला चांगलाच दणका दिला होता. या दणक्याने हादरलेल्या चीनने त्यानंतर वेळकाढूपणाचे धोरण अवलंबण्यात सुरुवात केल्याचे दिसत आहे. तणाव वाढू नये म्हणून चर्चा कायम ठेवतानाच वेगवेगळ्या भागात लष्करी तैनाती वाढविण्याचे डावपेच चीनकडून वापरण्यात येत आहेत. मात्र चीनच्या कारवायांची जाणीव असलेल्या भारताने कठोर व आक्रमक पावले उचलण्यावर भर दिला आहे. गेल्याच आठवड्यात झालेल्या चर्चेत, चिनी जवान मागे हटत नाहीत, तोपर्यंत भारतही आपली सैन्य तैनाती कमी करणार नाही, असे भारताकडून चीनला स्पष्ट शब्दात बजाविण्यात आले होते.

गेल्या दोन महिन्यात भारताने चीनबरोबरील नियंत्रणरेषेवर दोन अतिरिक्त डिव्हिजन्स तैनात केल्या आहेत. त्याचवेळी प्रगत ड्रोन्स लढाऊ विमाने व अटॅक हेलिकॉप्टर्सची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढविली आहे. लडाख, हिमाचल प्रदेश व सिक्कीमसह संपूर्ण नियंत्रणरेषेवर कोणत्याही आव्हानांचा मुकाबला करण्यासाठी भारतीय लष्कर सज्ज आहे. संसदीय समितीसमोर नुकत्याच झालेल्या सुनावणीत सीडीएस जनरल रावत यांच्यासह वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांनी यासंदर्भात ठाम ग्वाही दिली.

China-Indiaयेता एकदोन महिन्यांच्या काळात हिवाळा सुरू होणार असून या कालावधीत नियंत्रणरेषेवरील बराचसा भाग मोठ्या प्रमाणावर हिमाच्छादित असतो. शुन्याखाली गेलेले तापमान व सातत्याने होणारी हिमवादळे यामुळे संरक्षणदलासाठी हा काळ कसोटीचा मानला जातो. भारतीय लष्कर यात विशेष कौशल्य मिळवलेले लष्कर म्हणून ओळखण्यात येत असून, सध्याच्या चीनबरोबरील तणावाच्या काळात ही बाब प्रकर्षाने अधोरेखित होत आहेत. भारतीय लष्कराची ही सज्जता चीनसाठी चिंताजनक ठरत असून, चीनने पुन्हा एकदा शांतता व स्थैर्याची भाषा सुरू केली आहे.

‘चीन व भारतामधील संबंधांसाठी दोन्ही बाजूंनी सीमाभागात शांतता व सुरक्षेची जबाबदारी घेणे महत्त्वाचे आहे. द्विपक्षीय सहकार्याच्या विकासासाठी व स्थैर्यासाठी ही बाब आवश्यक ठरते. चीन आपल्या शेजारी देशांत बरोबरील सामायिक हितसंबंध वाढविण्याचा तसेच परस्परांमधील विश्वास मजबूत करण्याचा प्रयत्न करील’, असे निवेदन चीनच्या परराष्ट्र विभागाकडून प्रसिद्ध करण्यात आले आहे.

leave a reply