पाकिस्तानच्या वझिरीस्तानात पश्तुंचे आंदोलन तीव्र

वाना (खैबर पख्तुनख्वा) – पाकिस्तानच्या दक्षिण वझिरीस्तानात पश्तू नागरिकांनी आदोलने सुरु केली आहेत. रविवारी दक्षिण वझिरीस्तानच्या वानामध्ये पश्तू नागरिकांनी भव्य मोर्चा काढून या भागात दहशतवाद माजविणाऱ्या सरकार आणि लष्कराला इशारा दिला. पाकिस्तानी लष्कराकडून पश्तू नागरिकांचा वंशसंहार सुरु असून ते या भागात वाढत्या दहशतवादाचेही बळी ठरत आहेत. याविरोधात हे आंदोलन सुरु करण्यात आले आहे. पाकीस्तानी लष्कराकडून तरुणाचे केले जाणारे अपहरण आणि त्यानंतर गायब असलेल्या नागरिकांच्या मुद्दयांवरही आंदोलकांनी तीव्र पवित्रा घेतला आहे.

‘पश्‍तून तहफ्फुज मूवमेंट’चे (पीटीएम) नेते मंजूर पश्‍तीनही रविवारच्या मोर्च्यात सहभागी झाले होते. वझिरीस्तानात दहशतवादी पुन्हा एकदा एकवटत आहेत. दहशतवाद्यांच्या वाढत्या हालचालींमुळे वझिरीस्तान पुन्हा एकदा युद्धभूमी बनत आहे. त्यामध्ये पाकिस्तानी लष्कराचे पश्तू नागरिकांवर अन्वयीत अत्याचार सुरु असून खोट्या चकमकी घडविल्या जात आहेत. यामध्ये आतापर्यंत अनेक नागरिक ठार झाले आहेत. तसेच कितीतरी जण गायब आहेत. पाकिस्तानी लष्कराच्या या अत्याचाराविरोधात हे रणशिंग असल्याचे ‘पीटीएम’च्या नेत्यांनी म्हटले आहे.

पाकिस्तानी लष्कराने या भागात भूसुरुंग पेरले असून याचे बळी सामान्य पश्तू नागरिक याचे बळी ठरत असल्याच्या आरोपही आंदोलकांनी लावला आहे. पश्तू नागरिकांच्या या भव्य मोर्चानंतर अस्वस्थ झालेल्या पाकिस्तानी लष्कराने काही पश्तूनी नेत्यांचे अपहरण केले असून त्यांचा छळ केल्याच्याही बातम्या आहेत. मात्र त्याचवेळी या मोर्चात जमलेल्या प्रचंड गर्दीमुळे पाकिस्तानी लष्कर आणि सरकारला इशारा मिळाला आहे. पश्तू नेत्यांनी हे आंदोलन अधिक तीव्र करण्याचे संकेत दिले आहेत.

गेल्यावर्षी पाकिस्तानी लष्कराचे तत्कालीन प्रवक्ते असिफ गफूर यांनी पश्‍तू नागरिकांच्या या आंदोलनामागे भारत असल्याचा आरोप केला होता आणि या मूवमेंट दिवस भरले अशी वल्गना केली होती. त्यानंतर पीटीएमचे नेते मंजूरपश्‍तीन यांनी या आरोपांचे पुरावे द्या असे उघड आव्हान लष्कराला दिले होते. त्यानंतरच्या काळात पश्‍तून मूवमेंटची आंदोलने अधिकच तीव्र झाल्याचे पाहायला मिळत आहेत.

leave a reply