लडाखच्या एलएसीवर भारताच्या दाव्यानुसार चीनने माघार घेतली

- माजी लष्करी अधिकार्‍यांचा निर्वाळा

माघारनवी दिल्ली – लडाखच्या एलएसीवरून माघार घेण्यावर भारत व चीनमध्ये सहमती झालेली असली, तरी यात भारताने काहीच गमावलेले नाही, अशी ग्वाही संरक्षणमंत्र्यांनी दिली होती. माजी लष्करी अधिकारीही याला दुजोरा देत आहेत. चीनने आपल्याला मान्य असलेल्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेनुसार सैन्यमाघार घेतलेली नाही, तर भारत दावा करीत असलेल्या एलएसीनुसार माघार घेतलेली आहे, असे भारतीय लष्कराचे माजी अधिकारी सांगत आहेत.

गेल्या काही दिवसांपासून लडाखच्या एलएसीवरील सैन्यमाघारीवर देशभरात चर्चा सुरू आहे. यावर झालेल्या सहमतीनुसार भारत व चीन लडाखच्या एलएसीवरील या क्षेत्रात गस्त घालणार नाहीत. या गस्तीच्या दरम्यान दोन्ही देशांचे सैनिक एकमेकांसमोर येऊन नवी चकमक झडण्याचा धोका टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगितले जाते. लष्करी व राजनैतिक चर्चेत एलएसीवरील तणाव कमी करण्यावर संपूर्ण एकमत झाल्याखेरीज दोन्ही देशांनी या ठिकाणी गस्त न घालण्याची तयारी दाखविली होती. याचा अर्थ भारताने एलएसीवरील भूमी चीनकडे सोपविली असा होत नाही, असा निर्वाळा माजी लष्करी अधिकार्‍यांनी दिला आहे.

सहमतीनुसार चीनचे लष्कर लडाखच्या पँगाँग सरोवराच्या क्षेत्रातून फिंगर ८ पर्यंत माघार घेणार आहे. तर भारतीय लष्करही आपल्या चौक्यांमध्ये परतणार आहे. अर्थात यामुळे या क्षेत्रात एप्रिल महिन्याच्या आधीची स्थिती पुन्हा प्रस्थापित होत आहे. भारत चीनबरोबरील लष्करी चर्चेत सातत्याने हीच मागणी करीत होता. ती मान्य करून चीनने इथून माघार घेतली, याकडे माजी लष्करी अधिकारी लक्ष वेधत आहेत. लडाखच्या एलएसीवरील चीनची ही माघार एलएसीच्या त्यांच्या दाव्यानुसार होत नसून भारताच्या दाव्यानुसार होत आहे, असे लष्कराचे माजी ‘डायरेक्टर जनरल ऑफ मिलिटरी ऑपरेशन्स-डीजीएमओ’ लेफ्टनंट जनरल विनोद भाटिया यांनी लक्षात आणून दिले.

तर माजी लष्करप्रमुख जनरल व्ही. पी. मलिक यांनीही फिंगर ४ व फिंगर ८च्या दरम्यान गस्त न घालणे चकमकी टाळण्यासाठी आवश्यक होते असे म्हटले आहे. यावर होत असलेली टीका या क्षेत्रातील एलएसीबाबतच्या अज्ञानातून केली जात असल्याचे माजी लष्करप्रमुखांनी म्हटले आहे. घुसखोरीचा प्रयत्न करून चीनला भारताला कडक संदेश द्यायचा होता. पण याबाबतीत चीन पूर्णपणे अपयशी ठरला आहे, असे सांगून माजी लष्करप्रमुखांनी चीनबाबत स्वीकारण्यात आलेल्या आक्रमक धोरणावर समाधान व्यक्त केले. इतकेच नाही तर पुढच्या काळातही भारताने चीनच्या विरोधात लष्करी तसेच आर्थिक पातळीवर हे धोरण कायम ठेवावे, अशी अपेक्षा माजी लष्करप्रमुखांनी व्यक्त केली आहे. त्याचवेळी एलएसीवर चीनच्या हालचालींवर कडक नजर ठेवून सावधानता बाळगणे आवश्यक असल्याचे माजी लष्करप्रमुख जनरल मलिक यांनी म्हटले आहे.

leave a reply