‘डब्ल्यूएचओ’च्या यादीतील आणि प्रमुख देशांनी मंजुरी देलेल्या परदेशी कोरोना लसींनाही भारतात वापरासाठी मान्यता मिळणार

परदेशी कोरोना लसीनवी दिल्ली – रशियाच्या ‘स्पुटनिक व्ही’ या लसीला ‘सेंट्रल ड्रग्स स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशन’च्या (सीडीएससीओ) तज्ज्ञांच्या समितीने मंजुरी दिल्यावर ‘द ड्रग्ज् कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया’ने (डीसीजीआय) मंजुरी दिली आहे. त्यामुळे देशात ‘स्पुटनिक व्ही’ लस आता आपत्कालीन वापरासाठी उपलब्ध झाली आहे. आता ‘स्पुटनिक व्ही’नंतर कोरोनावरील इतर काही परदेशी लसींना जलदगतीने मान्यता देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.

जागतीक आरोग्य संघटनेच्या (डब्ल्यूएचओ) यादीतील, तसेच अमेरिका, युरोपिय युनियन, ब्रिटन, जपानसारख्या देशांनी मान्यता दिलेल्या लसींना याअंतर्गत मंजुरी देण्यात येईल. यासाठी पहिल्यांदा १०० जणांना या लसी दिल्या जातील व त्याचे परिणाम तपासले जाती. परदेशी लस दिलेल्यांवर सात दिवस तज्ज्ञ मंडळी लक्ष ठेवतील. त्यानंतर भारतात वापरासाठी या परदेशी लसींना परवानगी मिळेल, असे वृत्त आहे. यामुळे देशात लसीकरण कार्यक्रमासाठी लसींचे आणखी पर्याय उपलब्ध होणार असून यामुळे देशातील लसीकरण कार्यक्रम प्रचंड वेगाने पुढे सरकेल, असा विश्‍वास व्यक्त केला जातो.

परदेशी कोरोना लसीदेशात सध्या कोरोनाच्या नव्या लाटेचे भयंकर संकट आहे. पुढील काळात कोरोनाच्या साथीवर नियंत्रण मिळविण्यासाठी जास्तीत जास्त लसीकरण महत्त्वाचे ठरणार आहे. सध्या ४५ वर्षावरील सर्व नागरिकांना लसीकरण कार्यक्रमांतर्गत ‘कोवॅक्सिन’, ‘कोव्हिशिल्ड’ या लस देण्यात येत आहे. भारतातील लसीकरण कार्यक्रम जगात सर्वाधिक वेगाने सुरू आहे. दिवसाला ३५ लाख नागरिकांना लसी देण्यात येत आहे. आतापर्यंत सुमारे ११ कोटी लसींचे डोस देण्यात आले आहेत. यामध्ये दीड कोटी नागरिकांना लसींचे दोन्ही डोस मिळाले आहेत. तर आठ कोटीहून अधिक जणांना लसीचा पहिला डोस मिळाला आहे. मात्र भारताची लोकसंख्या व लसीकरण कार्यक्रमाची व्याप्ती पाहता भारतात लसींची उपलब्धता जास्त प्रमाणात होणे आवश्यक आहे.

या पार्श्‍वभूमीवर चाचण्यांनंतर रशियाच्या ‘स्पुटनिक व्ही’ या लसीला भारतात आपत्कालीन वापरासाठी परवानगी मिळाली आहे. सोमवारी ‘सीडीएससीओ’च्या तज्ज्ञ समितीने या लसीला मान्यता देत याबाबतची शिफारस ‘डीसीजीआय’कडे केली होती. आता ‘डीसीजीआय’नेही लसीला मंजुरी दिली आहे. त्यामुळे भारतात या लसीचा वापर सुरू होईल. ‘स्पुटनिक व्ही’ची भारतातील सहकारी कंपनी डॉ. रेड्डीज लॅब वर्षाला ८५ कोटी लसींचे उत्पादन घेईल इतके लक्ष्य ठेवण्यात आले आहे. ‘स्पुटनिक व्ही’ला मंजुरी देणारा भारत ६० वा देश ठरला आहे.

पण आता ‘स्पुटनिक व्ही’ पाठोपाठ काही परदेशी लसींना जलदगतीने मंजुरी देण्यासाठी पावले उचलली जात आहेत. ‘नॅशनल एक्सपर्ट ग्रुप ऑन व्हॅक्सिन ऍडमिनिस्ट्रेशन फॉर कोविड-१९’ने (एनईजीव्हीएसी) प्रमुख देशांनी मान्यता दिलेल्या, तसेच जागतिक आरोग्य संघटनेच्या यादीतील परदेशी कोरोना लसींना आपत्कालीन वापरासाठी जलदगतीने परवानगी देण्याबाबत शिफारस केली होती. या आधारावर काही प्रक्रिया पूर्ण करून परदेशी लसींना मंजुरी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सुरुवातीला १०० जणांना लस देऊन त्याचे परिणाम तपासल्यावर या लसींचा वापर लसीकरण कार्यक्रमात केला जाईल. यासाठी या लसी आयात केल्या जातील. सध्या भारतात आणखी सहा लसींच्या चाचण्या सुरू असून या लसीही ऑगस्टपर्यंत वापरासाठी उपलब्ध होतील, असे वृत्त आहे.

leave a reply