डेन्मार्क सिरियन निर्वासितांना बाहेर काढण्याच्या तयारीत

सिरियन निर्वासितांनाकोपनहेगन – डेन्मार्कने आपल्या देशात आश्रय घेतलेल्या सिरियन निर्वासितांना बाहेर काढण्याची तयारी केली आहे. सिरियातील परिस्थिती आता सुधारत असून या निर्वासितांना यापुढे डेन्मार्कमध्ये ठेवता येणार नाही, असे डेन्मार्कच्या सरकारचे म्हणणे आहे. या निर्णयावर जोरदार टीका सुरू झाली असून आम्हाला सिरियात धाडणे म्हणजे मृत्यूच्या खाईत ढकलणे ठरते, असे सिरियन निर्वासित सांगू लागले आहेत. मात्र याबाबत डेन्मार्कचे धोरण पहिल्या दिवसापासून स्पष्ट होते आणि निर्वासितांना परत धाडण्याच्या निर्णयापासून आम्ही माघार घेणार नाही, असे डेन्मार्कच्या इमिग्रेशन विभागाच्या मंत्र्यांनी बजावले आहे.

जवळपास साठ लाख इतकी लोकसंख्या असलेल्या डेन्मार्कमध्ये ३५ हजार सिरियन शरणार्थी आहेत. डेन्मार्कने हे निर्वासित स्वीकारतानाच त्यांना हा आश्रय तात्पुरता असल्याचे बजावले होते. मुदत संपल्यानंतर त्यांना डेन्मार्कमध्ये राहता येणार नाही, असे स्पष्टपणे बजावण्यात आले होते. याबाबतची डेन्मार्कची भूमिका सिरियन निर्वासितांनाअगदी पहिल्या दिवसापासून स्पष्ट होती. आम्ही या निर्णयापासून माघार घेणार नाही, असे इमिग्रेशन विभागाचे मंत्री मॅट्टिस टेसफेय यांनी म्हटले आहे. डेन्माकच्या काही नेते तसेच मानवाधिकार संघटना या निर्णयाला कडाडून विरोध करीत आहेत. सिरियन निर्वासितांना असे वार्‍यावर सोडता येणार नाही, असे या नेत्यांचे तसेच मानवाधिकार संघटनांच्या कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे.

डेन्मार्कमधून आम्हाला परत सिरियात धाडणे म्हणजे मृत्यूच्या खाईत ढकलण्यासारखे आहे, असे सिरियन निर्वासित सांगू लागले आहेत. तसेच सिरियातील परिस्थिती सुधारलेली नाही तिथे आमचे कुणीही राहिलेले नाही, आम्हाला इथेच वास्तव्य करण्याची मुभा द्या, असे आवाहन सिरियन निर्वासित करीत आहेत. मानवाधिकार संघटनांचे वरिष्ठ अधिकारी व सल्लागार या निर्णयासाठी डेन्मार्कवर सडकून टीका करू लागले आहेत. युरोपातल्या इतर कुठल्याही देशाने न घेतलेला निर्णय डेन्मार्कने घेतला आहे, अशी टीका केली जात आहे. संयुक्त राष्ट्रसंघाच्या मानवाधिकार संघटनेने देखील सिरियातील परिस्थिती सुधारलेली नसल्याचे म्हटले आहे.

सिरियन निर्वासितांनातरीही डेन्मार्कचे सरकार निर्वासितांना परत पाठविण्याच्या निर्णयावर ठाम आहे. कारण डेन्मार्कची मूळ ओळख पुसली जाण्याचा गंभीर धोका या निर्वासितांमुळे खडा ठाकला आहे. तसेच आत्तापर्यंत डेन्मार्कमध्ये अत्यंत कमी प्रमाणात असलेला हिंसाचार व नागरिकांवरील हल्ले यांचे प्रमाण या निर्वासितांमुळे लक्षणीयरित्या वाढले आहे. याचा डेन्मार्कच्या सुरक्षेवर गंभीर परिणाम होत आहे. यामुळे पुढच्या काळात या निर्वासितांना आपल्या देशात ठेवून डेन्मार्क आपली सुरक्षा धोक्यात आणण्यास तयार नसल्याचे दिसते.

डेन्मार्कच्या सुरक्षेला धोका निर्माण झाल्या, तुम्हाला देण्यात येत असलेला आश्रय मागे घेतला जाईल, याची या निर्वासितांना पूर्वकल्पना देण्यात आली होती, याची मॅट्टिस टेसफेय यांनी आठवण करून दिली आहे. डेन्मार्कचा कायदा यापुढे काम करील आणि सरकार आपला निर्णय अजिबात मागे घेणार नाही, असे टेसफेय यांनी स्पष्ट केले आहे. मायदेशी जाण्याची तयारी दाखविणार्‍या सिरियन निर्वासितांसाठी डेन्मार्कच्या सरकारने विशेष पॅकेज जाहीर केले होते. यानुसार निर्वासितांना प्रत्येकी २३ हजार डॉलर्सची घसघशीत रक्कम देण्याबरोबर इतर सोयीसुविधांचाही समावेश होता. तरीही ३५ हजार निर्वासितांपैकी अवघ्या १३७ जणांनी डेन्मार्क सोडण्याची तयारी दाखविली होती.

दरम्यान, युरोपिय महासंघाने केलेल्या सक्तीमुळे सदस्यदेशांना निर्वासित स्वीकारणे भाग पडले होते. पण या निर्वासितांमुळे छोट्या युरोपिय देशांची मूळ ओळख पुसली जाण्याचा गंभीर धोका निर्माण झाला आहे, असे युरोपातील उजव्या गटाचे नेते वारंवार बजावत आहेत. युरोपिय देशांमध्ये या निर्वासितांमुळे गुन्हेगारी व हिंसाचार वाढत असून सामाजिक सुरक्षा धोक्यात आली आहे. इतकेच नाही तर अशीच परिस्थिती कायम राहिली तर युरोप आपली संस्कृती गमावून बसेल, असे इशारे उजव्या गटाचे नेते देत आहेत. युरोपिय जनताही निर्वासितांच्या विरोधात गेली असून यामुळे युरोपिय देशांमध्ये निर्वासितांना विरोध करणार्‍या उजव्या गटाचे नेते व राजकीय पक्षांना मिळणारे समर्थन वाढत चालले आहे.

leave a reply