तीन महिन्यात भारतीयांकडून १४० टन सोन्याची खरेदी

मुंबई – ‘वर्ल्ड गोल्ड कौन्सिल’ ने (डब्ल्यूजीसी) जानेवारी ते मार्च दरम्यान जगभरात झालेल्या सोने खरेदीचा अहवाल प्रसिद्ध केला आहे. या तीन महिन्याच्या कालावधीत जगभरात सोन्याची मागणी २३ टक्क्यांनी घटली आहे. याच काळात भारतीयांनी मात्र सोन्याची जोरदार खरेदी केली असून सोन्याच्या मागणीत गेल्यावर्षीच्या तुलनेत ३७ टक्क्यांची वाढ झाली आहे. जानेवारी ते मार्च या तीन महिन्यात भारतीयांनी तब्बल १४० टन सोने खरेदी केले आहे.

‘डब्ल्यूजीसी’ने २०२१ च्या जानेवारी ते मार्च जगभरातील सोने खरेदीच्या जाहीर केलेल्या सांख्यिकीनुसार यावर्षी या तीन महिन्यात ८१५.७ टन सोन्याची मागणी नोंदविली गेली. २०२० सालातील जानेवारी व मार्चच्या तुलनेत ही मागणी तब्बल २३ टक्क्यांनी कमी आहे. २०२० सालात पहिल्या तीन महिन्यात १ हजार ५९ टन सोन्याची खरेदी झाली होती. कोरोनाच्या काळात घटलेली सोन्याची मागणी व निरनिराळ्या देशाच्या केंद्रीय बँकांनी कमी केलेली सोने खरेदी हे या मागील कारण असल्याचे ‘डब्ल्यूजीसी’चा अहवाल आहे. गेल्यावर्षी निरनिराळ्या देशांच्या केंद्रीय बँकांनी १२४.१ टन सोने जानेवारी व मार्चदरम्यान खरेदी केले होते. तर यावर्षी ही खरेदी केवळ ९५ टन झाल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.

कोरोनाकाळात सोन्याची मागणी घटली होती. ही मागणी हळूहळू वाढताना दिसत आहे. मात्र मागणी गेल्यावर्षीच्या स्तरावर पोहोचलेली नाही. उलट गोल्ड इटीएफमधून मोठ्या प्रमाणावर गुंतवणूकदारांनी गुंतवणूक काढण्यात आली. याचे मुख्य कारण याकाळात सोन्याच्या किंमतीत मोठी घसरण होत होती. सोन्याचे दर जागतीक बाजारात ४.२१ टक्क्यांनी घसरून १७९५ डॉलर्स प्रती औंस इतके खाली आले. गेल्यावर्षी याच कालावधीत हे दर १८७४ डॉलर्स प्रती औंस होते.

भारतात मात्र सोन्याची मागणी याच कारणामुळे वाढल्याचे दिसून आले. भारतीयांनी सोन्याच्या किंमती घसरत असताना मोठ्या प्रमाणावर खरेदी केली. जानेवारी ते मार्च महिन्यात तब्बल १४० टन सोने भारतीयांनी खरेदी केले. पुढे येणार्‍या लग्नसराईचा काळ लक्षात घेऊन सोन्याचे दर कमी झालेले असताना भारतीयांनी ही सोने खरेदी केली. किरकोळ खरेदीबरोबर तंत्रज्ञान क्षेत्रातून सोन्याची मागणी वाढली. याशिवाय भारतीय रिझर्व्ह बँकेनेही १८.७ टन सोन्याची खरेदी केली आहे. गेल्यावर्षी याच काळात रिझर्व्ह बँकेने एकूण १८ टन सोने खरेदी केले होते. जानेवारी ते मार्च या तीन महिन्याच्या कालावधीत गेल्यावर्षीच्या तुलनेत नोंदविण्यात आलेली भारतातील सोन्याची मागणी ३७ टक्के जास्त आहे. गेल्यावर्षी याच काळात १०२ टन सोने भारतीयांनी खरेदी केले होते. खरेदी केलेल्या सोन्याच्या मूल्याचा विचार केला तर यावर्षी पहिल्या तीन महिन्यात भारतीयांनी ५८ हजार ८०० कोटी रुपयांच्या सोन्याची खरेदी केली आहे.

मात्र ‘डब्ल्यूजीसी’च्या तज्ज्ञांच्या दाव्यानुसार एप्रिल ते जून या दुसर्‍या तिमाहीत मात्र सोने खरेदी लग्नसराई, अक्षय तृतीयासारखा मुहूर्त असूनही कमी होईल. कारण कोरोनाचे संकट वाढल्याने कित्येक ठिकाणी निर्बंध आहेत. याचा परिणाम दिसून येईल.

leave a reply