महाराष्ट्रातील संचारबंदीमध्ये १५ मेपर्यंत वाढ

मुंबई – महाराष्ट्रातील संचारबंदी १५ मे पर्यंत वाढविण्यात आली आहे. बुधवारीच मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर आरोग्यमंत्री राजेेश टोपे यांनी राज्यातील संचार निर्बंधांचा कालावधी वाढविण्यावर मंत्रिमंडळात एकमत झाल्याचे म्हटले होते. मात्र हा कालावधी किती दिवसाने वाढविण्यात येईल याचा निर्णय झाला नसल्याचे ते म्हणाले होते. गुरुवारी राज्य सरकारने एक स्वतंत्र आदेश काढून १५ मे पर्यंत संचारबंदी वाढविण्यात येत असल्याचे जाहीर केले. महाराष्ट्रात गुरुवारी ७७१ जणांचा कोरोनाने बळी गेला, तर ६६ हजार १५९ नव्या रुग्णांची नोंद झाली.

महाराष्ट्रात दररोज आढळणार्‍या कोरोनाच्या रुग्णासंख्येत कोणतीही कमी दिसून आलेली नाही. मुंबई, ठाणे व पुण्यासारख्या शहरांममध्ये रुग्णसंख्या काही प्रमाणात घटली असली, तरी ग्रामीण भागात रुग्ण वाढल्याचे पाहायला मिळत आहे. याशिवाय या साथीने दगावणार्‍यांची संख्याही वाढली आहे. या आठवड्यात रविवारपासून गुरुवारपर्यंत कोरोनाने राज्यात चार हजाराहून अधिक बळींची नोंद झाली आहे. तसेच सुमारे २ लाख ६७ हजार नवे रुग्ण आढळले आहेत. कोरोनाने बरे होणार्‍यांची संख्या मोठी आहे. दरदिवशी आढळत असलेल्या नव्या रुग्णांपेक्षा बरे होऊन घरी परतणार्‍या रुग्णांची संख्या अधिक असल्याचे गेल्या दिसांपासून पहायला मिळत आहे. गुरुवारीही कोरोनाबाधीत ६८ हजार ५३७ रुग्ण बरे होऊन घरी परतले, ही मोठी दिलासादायक बाब ठरत आहे.

महाराष्ट्रात १५ एप्रिलपासून लागलेल्या संचारबंदीमुळे काही ठिकाणी कोरोनाची साखळी तुटताना दिसत आहे. ही साखळी आणखी तोडण्यासाठी निर्बंधाचा कालावधी वाढण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. राज्याचे प्रधान सचिव सिताराम कुंटे याच्या नावाने एक आदेशाचे पत्र काढून महाराष्ट्रातील निर्बंध आणखी दोन आठवड्याने वाढविण्यात येणार असल्याचे राज्य सरकारने जाहीर केले. १५ मे च्या सकाळच्या सात वाजेपर्यंत आता निर्बंध लागू राहणार आहेत. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राज्यातील जनतेला कोरोनाची साखळी तोडण्यासाठी नियम पाळण्याचे आणि सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.

देशभरात इतर राज्यातही परिस्थिती बिकट बनली आहे. विशेषत: महाराष्ट्रासह दिल्ली, उत्तर प्रदेश, केरळ, कर्नाटक, राजस्थान, छत्तीसगड, मध्य प्रदेश, पश्‍चिम बंगाल, बिहार या राज्यांमध्ये रुग्ण मोठ्या संख्येने आढळत आहेत. तमिळनाडू, आंध्र प्रदेश, तेलंगणा, ओडिशा या राज्यांमध्ये रुग्णसंख्या वाढत आहे. केंद्र सरकारकडून राज्यांना आवश्यक त्या सूचना वारंवार देण्यात येत आहेत. तसेच देशातील ७४१ पैकी १५० जिल्ह्यांमध्ये कोरोनाने सर्वाधिक बिकट स्थिती आहे. कारण येथील पॉझिटिव्ह दर १५ टक्क्यांच्या वर पोहोचला आहे. त्यामुळे कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी या राज्यांमध्ये लॉकडाऊन लावण्यावर केंद्र सरकार विचार करीत आहे.

दरम्यान, देेशात काही राज्यांनी आधीच संचार निबर्र्ध, लॉकडाऊनसारखे निर्णय घेतले आहेत. यामुळे गरीब, श्रमजीवी नागरिकांची उपासमार होण्याची शक्यता आहे. स्थलांतरीत मजूरांनाही मोठ्या समस्या भेडसावत आहेत. या पार्श्‍वभूमीवर भारत सरकारच्या अन्न व सार्वजनिक वितरण विभागाने पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेतून मे आणि जून या दोन महिन्यासाठी गरीबांना प्रत्येक महिन्याला ५ किलो धान्य विनामूल्य देण्याचा निर्णय घेतला होता. यासाठी लागणारे धान्य वितरणासाठी राज्य सरकारांकडे सोपविण्यात आले आहे. महाराष्ट्राला ७ लाख मेट्रिक टन धान्य देण्यात आले आहे.

leave a reply