‘नॅशनल मेरिटाईम सिक्युरिटी कोऑर्डिनेटर’ची लवकरच नियुक्ती केली जाईल

- केंद्र सरकारचे संकेत

नवी दिल्ली – इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील चीनच्या हालचाली या क्षेत्रातील इतर देशांबरोबरच भारताच्या सुरक्षेला आव्हान देत आहेत. चीनच्या या हालचालींवर करडी नजर ठेवून भारत चीनच्या धोक्याविरोधात आवश्यक ती पावले उचलत आहे. ‘नॅशनल मेरिटाईम सिक्युरिटी कोऑर्डिनेटर-एनएमएससी’ अर्थात ‘राष्ट्रीय सागरी सुरक्षा समन्वयक’ या पदाची निर्मिती हा भारताच्या या धोरणाचा भाग ठरत आहे. सध्या सेवेत असलेल्या किंवा निवृत्त उपनौदलप्रमुख पदाच्या दर्जाच्या अधिकार्‍याची या पदावर नियुक्ती केली जाईल. नौदल, तटरक्षक दल आणि बंदरांबरोबरच जलवाहतूक मंत्रालयाबरोबर संपर्क व समन्वय साधण्याचे काम ‘एनएमएससी’ करतील व ते थेट राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांना याचे अहवाल सादर करतील.

‘नॅशनल मेरिटाईम सिक्युरिटी कोऑर्डिनेटर’ची लवकरच नियुक्ती केली जाईल - केंद्र सरकारचे संकेत1999 सालच्या कारगिल युद्धानंतर देशाच्या सुरक्षेचा आढावा घेण्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या समितीने सागरी सुरक्षेसाठी काही शिफारशी केल्या होत्या. नौदल व तटरक्षक दल तसेच संबंधित केंद्र व राज्यांच्या मंत्रालयांशी समन्वय साधणार्‍या एका उच्चस्तरिय व्यवस्थेची आवश्यकता असल्याची नोंद या समितीने केली होती. त्यामुळे ‘नॅशनल मेरिटाईम सिक्युरिटी कोऑर्डिनेटर’ची आवश्यकता फार आधीपासून भासत असल्याचे समोर येत होते. मात्र गेल्या काही वर्षांपासून भारताचे नैसर्गिक प्रभावक्षेत्र असलेल्या हिंदी महासागरातील चीनच्या वाढत्या कारवाया व त्यापासून भारताला असलेला धोका लक्षात घेता, ‘एनएमएससी’ची अधिक प्रकर्षाने आवश्यकता भासू लागली आहे.

म्हणूनच लवकरच या पदाची निर्मिती केली जाईल, असे संकेत मिळत आहेत. या पदावर सध्या सेवेत असलेल्या किंवा निवृत्त झालेल्या उपनौदलप्रमुख दर्जाच्या अधिकार्‍याची या पदावर नेमणूक केली जाणार आहे. 2018 साली भारताने ‘इफॉर्मेशन फ्युजन सेंटर-इंडियन ओशन रिजन’ची (आयएफसी-आयओआर) स्थापना करून हिंदी महासागरातून वाहतूक करणार्‍या प्रत्येक जहाजावर नजर ठेवणारी यंत्रणा विकसित केली होती. चीनच्या हालचालींवर नियंत्रण ठेवण्यासाठी ही बाब अतिशय महत्त्वाची असल्याचे कालांतराने उघड झाले. चीनने एखाद्या सागरी क्षेत्रात आपला दावा भक्कम करण्यासाठी मच्छिमारी करणार्‍या शेकडो जहाजांचे पथक उभारले आहे. वरकरणी ही जहाजे मच्छिमारी करणारी असल्याचे भासत असले, तरी प्रत्यक्षात तो चिनी नौदलाच्या जहाजांचा तांडा असतो. चीन आपल्या विस्तारवादाला आव्हान देणार्‍या देशाला धडा शिकविण्यासाठी या शेकडो जहाजांच्या तांड्याचा वापर करतो, हे उघड झाले होते. काही महिन्यांपूर्वी फिलिपाईन्सच्या सागरी क्षेत्रात चीनने याचा प्रयोग केला होता.

भारताच्या बाबतीतही चीन अशा स्वरुपाचे प्रयोग करण्याची शक्यता नाकारता येत नाही. लडाखच्या एलएसीवर भारताने चिनी लष्कराला दिलेल्या दणक्यानंतर, बिथरलेला चीन भारताला धडा शिकविण्यासाठी प्रयत्नांची शर्थ करीत आहे. हिंदी महासागर क्षेत्रात चीनच्या नौदलाच्या कारवाया वाढल्या असून भारताला आव्हान देण्यासाठी चीन श्रीलंकेच्या बंदरांचा वापर करीत आहे. यापासून निर्माण होणार्‍या परिस्थितीचा सामना करण्यासाठी भारताला अधिक खबरदारी घेणे भाग असून भारत सरकार आणि नौदल याकडे अत्यंत गांभीर्याने पाहत आहे. ‘एनएमएससी’ पदाची निर्मिती ही बाब नव्याने अधोरेखित करीत आहे.

leave a reply