डेल्टा व्हेरिअंट रोखण्यासाठी चीनने जनतेला घरातच कोंडून ठेवले

डेल्टा व्हेरिअंटबीजिंग – चीनची राजधानी बीजिंग व कोरोनाचा उगम असलेल्या वुहान शहरासह 40 शहरांमध्ये ‘डेल्टा व्हेरिअंट’चा उद्रेक झाल्याचे समोर आले आहे. हा उद्रेक रोखण्यासाठी चिनी यंत्रणांनी आपला पोलादी पंजा फिरविण्यास सुरुवात केली असून घरे व इमारती सील केल्याचे व्हिडिओ प्रसिद्ध झाले आहेत. गेल्या वर्षीही चीनच्या वुहान शहरात कोरोनाची साथ वाढत असताना अनेक नागरी वस्त्या ‘ब्लॅक आऊट’ केल्याची माहिती उघड झाल्याने खळबळ उडाली होती.

2019 सालच्या अखेरीस चीनच्या वुहान शहरात कोरोना साथीचे रुग्ण आढळले होते. त्यानंतर पुढील काही महिन्यात लॉकडाऊन, मास टेस्टिंग, मोठ्या हॉस्पिटल्सची उभारणी व स्थानिक पातळीवर विकसित केलेल्या लसीच्या जोरावर कोरोनाची साथ नियंत्रणात आणल्याचा दावा चीनच्या सत्ताधारी राजवटीने केला होता. आपली साथ नियंत्रणात आणल्याचे दावे करणाऱ्या चीनने पाश्‍चात्यांसह इतर देशांकडून कोरोनाविरोधात राबविण्यात येणाऱ्या मोहिमेवर टीकास्त्र सोडले होते.

गेल्या काही आठवड्यात चीनमध्ये ‘डेल्टा व्हेरिअंट’चे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून येत आहेत. शुक्रवारी चिनी यंत्रणांनी दिलेल्या माहितीनुसार, 18 प्रांतांमधील 48 शहरांमध्ये कोरोनाची नवी साथ पसरली आहे. यात राजधानी बीजिंग व कोरोनाचे उगमस्थान असणाऱ्या वुहानचाही समावेश आहे. नव्या साथीतील रुग्णांची संख्या 1,200वर गेली असून बहुतांश रुग्ण ‘डेल्टा व्हेरिअंट’चे असल्याचे समोर आले आहे. हे वाढते रुग्ण चीनच्या राजवटीसाठी नवे आव्हान ठरेल, असा इशारा स्थानिक तज्ज्ञांकडून देण्यात आला आहे.

या पार्श्‍वभूमीवर, चीनमधील सोशल मीडियावर प्रसिद्ध झालेल्या नव्या व्हिडिओज्‌नी खळबळ उडवली आहे. ‘हॅझमट सूट’ घातलेले चिनी कर्मचारी कोरोना रुग्णांची घरे लोखंडी बार ठोकून सील करीत असल्याचे दाखविण्यात आले आहे. एका दिवसात तीनहून अधिक वेळा घराचे दार उघडणाऱ्यांची घरेही सील करण्यात येत आहेत. एखाद्या सोसायटीत दोन तीन रुग्ण आढळल्यावर पूर्ण सोसायटी सील करून लोकांना बाहेर पडण्यास बंदी करण्यात आल्याचेही व्हिडिओंमध्ये दिसून आले आहे. चिनी वेबसाईट ‘वैबो’सह ट्विटर तसेच युटयूबवर हे व्हिढिओ प्रसिद्ध झाले आहेत.

गेल्या वर्षी मार्च व मे महिन्यात वुहान शहरातील अनेक नागरी वस्त्यांचे भयावह व्हिडिओ प्रसिद्ध झाले होते. या व्हिडिओज्‌च्या पार्श्‍वभूमीवर चिनी यंत्रणा कोरोनाच्या नव्या साथीचे सत्य लपवित असल्याचा दावा स्थानिक मानवाधिकार कार्यकर्त्यांनी केला होता. नव्या व्हिडिओजमुळे हा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला असून चीनकडून कोरोनाच्या नव्या साथीचे सत्य लपविण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे संकेत मिळत आहेत.

leave a reply