काबुल – तालिबानने ताबा घेतल्यापासून अफगाणिस्तानची अर्थव्यवस्था संकटात सापडली आहे. अशीच परिस्थिती कायम राहिली तर या देशाची अर्थव्यवस्था ३० टक्क्यांनी कमी होईल, असा इशारा आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने दिला. अफगाणिस्तानचा हा आर्थिक तिढा सोडविण्यासाठी आंतरराष्ट्रीय समुदायाने प्रयत्न करावे, असे आवाहन संयुक्त राष्ट्रसंघाचे अध्यक्ष अँटोनियो गुतेरस यांनी काही दिवसांपूर्वी केले होते.
हॉंगकॉंगस्थित वृत्तसंस्थेने प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार, अफगाणिस्तानच्या अर्थव्यवस्थेबाबत नाणेनिधीला चिंता वाटत आहे. अमेरिका आणि मित्रदेशांची सैन्यमाघार आणि तालिबानच्या हातात अफगाणिस्तानची सूत्रे गेल्यापासून या देशावर सर्वात मोठे आर्थिक संकट कोसळले आहे.
अफगाणिस्तान हळुहळू सर्वात भीषण दुष्काळाकडे झुकू लागला आहे. अमेरिका, युरोपिय महासंघापाठोपाठ जागतिक बँक, युरोपिय महासंघ आणि आंतरराष्ट्रीय नाणेनिधी संघटनेने अफगाणिस्तानचे अर्थसहाय्य गोठविले आहे. याचा परिणाम अफगाणिस्तानच्या अर्थव्यवस्थेवर व परिणाम जनतेवर होत असल्याची चिंता व्यक्त केली जाते.
येत्या काही तासात कतारची राजधानी दोहा येथे अमेरिकेचे दूत आणि तालिबानच्या दहशतवाद्यांमध्ये विशेष बैठक पार पडणार आहे. अमेरिकेने अफगाणिस्तानचा साडे नऊ अब्ज डॉलर्सचा निधी खुला करावा, अशी मागणी तालिबान या बैठकीत करणार आहे.