सौदी आणि ग्रीसमधील सहकार्य इराण व तुर्कीसाठी इशाराघंटा

रियाध – आखात तसेच भूमध्य सागरी क्षेत्रातील घडामोडींनी वेग धरला आहे. ग्रीस आणि सौदी अरेबिया यांच्यात संरक्षण सहकार्य प्रस्थापित झाले आहे. यानुसार, ग्रीस सौदीला पॅट्रियॉट ही हवाई सुरक्षा यंत्रणा पुरविणार आहे. उभय देशांमधील हे सहकार्य इराण आणि तुर्कीसाठी इशारा असल्याचा दावा आखाती माध्यमे करीत आहेत. दोन दिवसांपूर्वी ग्रीसने युुएई तसेच इस्रायलबरोबरही सहकार्य प्रस्थापित केले होते, याकडेही ही माध्यमे लक्ष वेधत आहेत.

ग्रीसचे परराष्ट्रमंत्री निकोस डेन्डियस आणि संरक्षणमंत्री निकोलोस पॅनागियोतोपोलस यांनी दोन दिवसांपूर्वी सौदी अरेबियाचा दौरा केला. यावेळी सौदीचे परराष्ट्रमंत्री प्रिन्स फैझल बिन फरहान यांनी ग्रीसच्या नेत्यांची भेट घेतली. तर सौदीचे क्राऊन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांनी देखील ग्रीसच्या नेत्यांची विशेष भेट घेतली. या भेटीत उभय देशांमध्ये आर्थिक तसेच संरक्षणविषयक सहकार्यावर करार झाल्याचे जाहीर करण्यात आले. सौदीबरोबरचे हे सहकार्य आपल्या देशाने उचललेले मोठे पाऊल असल्याचे संरक्षणमंत्री पॅनागियोतोपोलस यांनी म्हटले होते.

या सहकार्यानुसार, ग्रीस सौदीला पॅट्रियॉट ही प्रगत हवाई सुरक्षा यंत्रणा पुरविणार आहे. ग्रीस सौदीला भाडेतत्वावर सदर यंत्रणा पुरविणार असून लवकरच पॅट्रियॉट सौदीमध्ये तैनात केल्या जातील, अशी माहिती ग्रीसच्या संरक्षणमंत्र्यांनी दिली. प्रमुख इंधन उत्पादक देश असलेल्या सौदीच्या इंधनप्रकल्पांच्या सुरक्षेसाठी पॅट्रियॉटची तैनाती महत्त्वाची ठरेल, असा दावा संरक्षणमंत्री पॅनागियोतोपोलस यांनी केला. यावेळी ग्रीसच्या संरक्षणमंत्र्यांनी सौदीच्या इंधनप्रकल्पांवर हौथी या दहशतवादी संघटनेचे हल्ले होत असल्याचे म्हटले.

सौदी व ग्रीसमध्ये प्रस्थापित झालेले सदर सहकार्य अतिशय महत्त्वाचे असल्याचे आखातातील विश्‍लेषकांनी म्हटले आहे. सौदीमध्ये याआधीच अमेरिकेची पॅट्रियॉट यंत्रणा तैनात केली आहे. पण अमेरिकेच्या बायडेन प्रशासनाने सौदी अरेबियाला करण्यात येणार्‍या लष्करी सहकार्यावर तात्पुरती बंदी टाकली आहे. तसेच बायडेन प्रशासन आणि अमेरिकन कॉंग्रेस सौदीवरील ही बंदी लवकर मागे घेणार नाहीत, असा दावा आंतरराष्ट्रीय लष्करी विश्‍लेषकही करीत आहेत. याशिवाय बायडेन प्रशासनाने सौदीतील पॅट्रियॉट यंत्रणा काढून घेण्याचे संकेत दिले आहेत. अशा परिस्थितीत, ग्रीसकडून सौदीला पॅट्रियॉटचे मिळणारे सहकार्य महत्त्वाचे ठरते. सदर सहकार्य येमेनमधील हौथीप्रमाणे इराणसाठी देखील इशारा असल्याचा दावा आखाती विश्‍लेषक करीत आहेत.

तर इराणपासून वाढत असलेला धोका आणि भूमध्य सागरी क्षेत्रातील तुर्कीचे विस्तारवादी धोरणाच्या विरोधातही सौदी व ग्रीसमधील या सहकार्याकडे पाहिले जात आहे. ग्रीसबरोबर संरक्षण सहकार्य करून सौदीने कतारमध्ये सैन्यतैनातीच्या तयारीत असलेल्या तुर्कीला इशारा दिल्याचा दावा आखातातील माध्यमे करीत आहेत. दोन महिन्यांपूर्वी सौदीने कतारबरोबरचा वाद विसरून नव्याने सहकार्य प्रस्थापित केले होते, याकडेही ही माध्यमे लक्ष वेधत आहेत. याशिवाय दोन दिवसांपूर्वी ग्रीसने देखील युएई आणि इस्रायल या दोन देशांबरोबर सहकार्य प्रस्थापित करून तुर्कीला इशारा दिला होता.

leave a reply