जर्मनीतून २३ ऑक्सिजन उत्पादक संयंत्र ‘एअरलिफ्ट’ करून आणणार

- संरक्षण मंत्रालयाचा निर्णय

नवी दिल्ली – देशात सध्या कोरोनाच्या साथीच्या विस्फोटामुळे वैद्यकीय कारणासाठी ऑक्सिजनची मागणी प्रचंड वाढली आहे. यामुळे देशात कोरोनाचे संक्रमण सर्वाधिक असलेल्या राज्यांमध्ये ऑक्सिजनचा तुटवडा जाणवत आहे. काही राज्यांनी तातडीने ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पाची उभारणी केली आहे. मात्र तरीसुद्धा ऑक्सिजन पुरविठ्याचे मोठे आव्हान असून या पार्श्‍वभूमीवर संरक्षण मंत्रालयाने जर्मनीतून मोबाईल ऑक्सिजन उत्पादक संयंत्र आणण्याचा निर्णय घेतला आहे. नुकताच सरकारने संरक्षणदलांची रुग्णालयेही कोरोनाच्या रुग्णांसाठी खुली करण्याचा निर्णय घेतला होता. या रुग्णालयांमध्ये जर्मनीतून आणण्यात येणारी ही मोबाईल ऑक्सिजन संयंत्र तैनात केली जातील.

चार दिवसांपूर्वी संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी एक महत्त्वाची बैठक घेतली होती. त्यानंतर तिनही संरक्षणदलांना आणि इतर संरक्षणविषयक संस्थांना कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर वैद्यकीय पायाभूत सुविधा उभारण्यासाठी आवश्यक खरेदी करण्यास सांगितले होते. तसेच याकरिता काही आपत्कालिन वापरासाठीचे आर्थिक अधिकार संरक्षणदलांना देण्यात आले होते. याअंतर्गतच आता जर्मनीतून मोबाईल ऑक्सिजन उत्पादक संयंत्र तातडीने खरेदी केली जाणार आहेत. ही संयंत्र ‘आर्म फोर्स मेडिकल सर्व्हिसेस’च्या (एएफएमएस) रुग्णालयांत कोरोना रुग्णांवर उपचारासाठी तैनात केली जातील, अशी माहिती संरक्षण मंत्रालयाचे प्रवक्ते भूषण बाबू यांनी दिली.

जर्मनीतून एकूण २३ मोबाईल ऑक्सिजन उत्पादक संयंत्र खरेदी केली जाणार आहेत आणि एका आठवड्याच्या आत ही संयंत्र ‘एअरलिफ्ट’ करून भारतात आणली जातील. या प्रत्येक संयंत्रणातून ४० लिटर इतका ऑक्सिजन प्रति मिनिटाला उत्पादन केला जाऊ शकतो. तर तासाला या एका संयंत्रातून २४०० लिटर ऑक्सिजनचे उत्पादन घेता येईल, अशी माहिती संरक्षण विभागाकडून देण्यात आली. तर जर्मनमधून ही संयंत्र एअरलिफ्ट करून आणण्यासाठी वायुसेना तयार असून कागदी प्रक्रीया पुर्ण होताच ही संयंत्र आणली जातील, अशी माहिती दुसर्‍या एका अधिकार्‍याने दिली. तसेच परदेशातून आणखी ऑक्सिजन उत्पादक संयंत्र खरेदी केली जाऊ शकतात, अशी महितीही या अधिकार्‍याने दिली.

leave a reply