कॅनबेरा – आपण घेतलेल्या राजकीय आणि आर्थिक निर्णयाचे जगावर होणाऱ्या परिणामांची जबाबदारी प्रगत देशांनी घ्यायला हवी, असे भारताच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अमेरिका व इतर प्रगत देशांना बजावले आहे. युक्रेनचे युद्ध पेटल्यानंतर, अमेरिकेने रशियावर लादलेल्या निर्बंधांची झळ रशियापेक्षाही इतर देशांना बसलेली आहे. थेट उल्लेख टाळून भारताच्या अर्थमंत्र्यांनी अमेरिका व युरोपिय देशांना हा इशारा दिल्याचे दिसते. भारताने रशियाकडून इंधनाची खरेदी थांबवावी, अशी मागणी करणाऱ्या अमेरिकेने याला भारताकडून नकार मिळाल्यानंतर तीव्र प्रतिक्रिया दिली होती. सध्या अमेरिका भारताला लक्ष्य करणारे निर्णय घेत आहे. त्या पार्श्वभूमीवर, अर्थमंत्री सीतारामन यांनी दिलेला इशारा महत्त्वाचा ठरतो.
आंतरराष्ट्रीय नाणेनिधी आणि जागतिक बँकेच्या कार्यक्रमासाठी अर्थमंत्री सीतारामन अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी अमेरिकेच्या अर्थमंत्री जेनेट येलेन यांची भेट घेतील. अमेरिकेतील ब्रुकिंग्ज् इन्स्टीट्यूटमध्ये बोलताना अर्थमंत्री सीतारामन यांनी विकसित देशांना स्पष्ट शब्दात फटकारले. आपल्या राजकीय व आर्थिक निर्णयाचे जगावर होत असलेले परिणाम या देशांनी लक्षात घ्यायला हवे व त्याच्या दुष्परिणांची जबाबदारीही स्वीकारायला हवी, असे सीतारामन म्हणाल्या. इतकेच नाही तर जगावर परिणाम करणारे निर्णय घेत असताना, इतरांना त्याची झळ बसता कामा नये, यासाठी ‘सेफ्टी नेट’ अर्थात सुरक्षा करणारे जाळे उभे करण्याची जबाबदारी विकसित देशांचीच आहे, याकडे सीतारामन यांनी लक्ष वेधले.
दरम्यान, भारताने रशियाकडून इंधनाची खरेदी करून युक्रेनच्या युद्धासाठी रशियाला पैसे पुरवू नये, अशी मागणी अमेरिका व रशियाविरोधी युरोपिय देश करीत आहेत. त्यासाठी अमेरिकेने भारतावर मोठ्या प्रमाणात दबाव टाकला होता. मात्र युरोपिय देशच रशियाकडून भारताच्या कितीतरी अधिक पट इंधनाची खरेदी करीत आहेत, असे सांगून भारताने अमेरिका व युरोपिय देशांचा दबाव झुगारून दिला. यावर अमेरिकेने दिलेल्या धमक्यांचीही भारताने पर्वा केली नव्हती. याचे परिणाम दिसू लागले असून सध्या बायडेन प्रशासनाने भारताला लक्ष्य करणाऱ्या निर्णयांचा सपाटा लावलेला आहे. यामध्ये पाकिस्तानच्या लढाऊ विमानांच्या अद्ययावतीकरणासाठी पॅकेज देण्याबरोबरच पाकिस्तानबरोबर इतर प्रकारचे लष्करी सहकार्य विकसित करण्याच्या निर्णयाचा समावेश आहे.
याची दखल भारताने घेतली असून परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर सातत्याने अमेरिकेला या निर्णयाच्या परिणामांची जाणीव करून देत आहेत. आता अमेरिकेच्या भेटीवर असलेल्या अर्थमंत्री सीतारामन यांनी देखील विकसित देशांच्या निर्णयांचा फटका गरीब व विकसनशील देशांना बसत असल्याचे सांगून अमेरिकेला फटकारल्याचे दिसत आहे.