भारताला मंदीचा फटका बसण्याची शक्यता शून्यावर

- ब्लूमबर्गच्या अहवालातील दावा

वॉशिंग्टन – श्रीलंकेतील दारूण पारिस्थिती लक्षात घेता या देशाला मंदीचा फटका बसण्याची शक्यता 85 टक्क्यांनी वाढली आहे. तर जगाची फॅक्टरी असा लौकिक असलेल्या चीनलाही मंदीचा फटका बसू शकतो व याची शक्यता 20 टक्के इतकी आहे, असे ‘ब्लूमबर्ग’ या वृत्तसंस्थेच्या आर्थिक तज्ज्ञांनी केलेल्या पाहणीतून उघडझाले आहे. भारताच्या ‘आयटी’ क्षेत्राला मंदीचा मोठा फटका बसेल, पण भारतात मंदी येण्याची शक्यता शून्यावर असल्याचा दावा ब्लूमबर्गच्या अहवालात करण्यात आलेलाआहे.

bloombergकोरोनाची साथ व त्यानंतर आलेल्या ‘सप्लाय चेन क्रायसिस’मुळे जागतिक अर्थव्यवस्था संकटात सापडली होती. त्यातच युक्रेनचे युद्ध पेटल्याने हे संकट अधिकच तीव्र बनले आहे. अशा परिस्थितीत जग लवकरच मंदीच्या छायेत येईल, असे इशारे आंतरराष्ट्रीय संस्था देत आहे. इतकेच नाही तर बड्या देशांच्या अर्थव्यवस्था देखील मंदीच्या प्रभावातून आपल्याला वाचवू शकणार नाही, असे अर्थतज्ज्ञांचे म्हणणे आहे. सध्या श्रीलंकेत दिसत असलेले चित्र लवकरच इतर देशांमध्येही दिसू लागेल, असे भीतीदायक दावे अर्थतज्ज्ञ व्यक्त करीत आहेत. अशा परिस्थितीत, ब्लूमबर्गने यासंदर्भात अर्थतज्ज्ञांचा पाहणी अहवाल प्रसिद्ध केला.

यामध्ये श्रीलंकेला मंदीचा फटका बसण्याची शक्यता 85 टक्क्यावर गेली असून न्यूझीलंड 33, तैवान 20, ऑस्ट्रेलिया 20 तर फिलिपाईन्सला 8 टक्के इतक्या प्रमाणात मंदीचा धोका संभवतो. चीनला देखील मंदीचा धोका संभवण्याची शक्यता 20 टक्क्यांवर आहे. तर जपान आणि दक्षिण कोरिया या देशांना मंदीचा धोका 25 टक्के इतका आहे. मात्र भारताला शून्य टक्के अर्थात मंदीचा धोका नाही, असे ब्लूमबर्गच्या या अहवालात नमूद करण्यात आलेले आहे. त्याचवेळी महासत्ता असलेल्या अमेरिकेला पुढच्या वर्षी मंदीचा सामना करावा लागेल, याची शक्यता 40 टक्क्यांवर गेल्याचे ब्लूमबर्गने म्हटले आहे. यासाठी अमेरिकेतील विक्रमी महागाईचा दाखला या अहवालात देण्यात आलेला आहे.

भारताच्या आयटी क्षेत्राला मंदीचा तडखा बसेल. पण भारतीय अर्थव्यवस्था मंदीच्या प्रभावाखाली येण्याची शक्यता शून्यावर असल्याचे हा अहवाल सांगतो. याआधी आंतरराष्ट्रीय नाणेनिधी व जागतिक बँकेने देखील भारतीय अर्थव्यवस्था पुढच्या काळात दमदार कामगिरी करील, असा विश्वास याआधी व्यक्त केला होता.

यामुळेच आंतरराष्ट्रीय आव्हाने समोर असताना व युक्रेनचे युद्ध पेटलेले असताना देखील भारतातील थेट परकीय गुंतवणुकीचा ओघ वाढत असल्याची बाब काही काळापूर्वी समोर आली होती.

leave a reply