‘बेबी फॉर्म्युला’च्या टंचाईवरून विरोधकांनी बायडेन प्रशासनाला धारेवर धरले

वॉशिंग्टन – नवजात बाळांसाठी अत्यावश्यक असणाऱ्या ‘बेबी फॉर्म्युला’च्या टंचाईवरून अमेरिकेतील विरोधकांनी बायडेन प्रशासनाला धारेवर धरले आहे. अमेरिकेतील संसद सदस्य एलिस स्टेफानिक यांनी अमेरिका ही काही ‘थर्ड वर्ल्ड कंट्री’ नाही या शब्दात राष्ट्राध्यक्ष बायडेन यांच्यावर ताशेरे ओढले. संसद सदस्य कॅट कॅमाक यांनी बायडेन प्रशासन ‘अमेरिका लास्ट’ धोरण राबवित असल्याचा आरोप केला आहे. तर टेक्सासचे गव्हर्नर ग्रेग ॲबॉट यांनी, निर्वासितांच्या केंद्रात ‘बेबी फॉर्म्युला’ पाठविण्याचे बायडेन यांचे धोरण हा बेजबाबदारपणा असल्याचा ठपका ठेवला आहे.

अमेरिकेत गेल्या वर्षभरापासून लहान बाळांना देण्यात येणाऱ्या ‘बेबी फॉर्म्युला’चे साठे पुरेशा प्रमाणात नसल्याची माहिती समोर येत होती. कोरोनाच्या काळातील कच्च्या मालाची टंचाई व जागतिक पुरवठा साखळीत निर्माण झालेल्या अडचणी यामुळे ‘बेबी फॉर्म्युला’चा पुरवठा पूर्ण क्षमतेनुसार होत नव्हता. ही समस्या असतानाच फेब्रुवारी महिन्यात अमेरिकेतील आघाडीची कंपनी असणाऱ्या ॲबॉटच्या ‘बेबी फॉर्म्युला’ उत्पादनांमध्ये तसेच फॅक्टरीत दोष आढळले. त्यामुळे या कंपनीने बाजारपेठेतील आपली उत्पादने माघारी घेतली.

त्यामुळे अमेरिकन बाजारपेठेत त्यावेळी उपलब्ध असणाऱ्या ‘बेबी फॉर्म्युला’ची अनेक उत्पादने शेल्फवरून नाहीशी झाली. अचानक घडलेल्या या घटनेमुळे अमेरिकेतील पालकांची चांगलीच तारांबळ उडाली. अनेक पालकांना सोशल मीडियाचा आधार घेत ज्या राज्यात ‘बेबी फॉर्म्युला’ उपलब्ध आहे त्यांच्याकडून उत्पादने मागवून घ्यावी लागली. अमेरिकी सरकारकडून कमी उत्पन्न असणाऱ्या महिलांसाठी राबविण्यात येणाऱ्या योजनेसाठीही ‘बेबी फॉर्म्युला’ची टंचाई निर्माण झाली. फेब्रुवारी महिन्यापासून समस्येची सुरुवात झाली असताना, बायडेन प्रशासनाने त्याकडे योग्य लक्ष पुरविले नाही.

त्याचवेळी अमेरिकेत घुसखोरी करणाऱ्या निर्वासितांसाठी उभारलेल्या केंद्रांमध्ये ‘बेबी फॉर्म्युला’चे मोठे साठे ठेवण्यात आल्याचे सोशल मीडियावर उघड झाले. त्यामुळे विरोधक बायडेन प्रशासनावर तुटून पडले आहेत. त्याचवेळी हजारो पालकही सोशल मीडियावरून आपला रोष व्यक्त करीत आहेत. रिपब्लिकन पक्षाच्या एलिस स्टेफानिक, कॅट कॅमाक, मार्जोरी टेलर-ग्रीन, मायकल वॉल्ट्झ या संसद सदस्यांनी यासाठी बायडेन प्रशासनावर घणाघाती टीका केली.

‘लहान बाळांना उपाशी झोपवून अमेरिकी पालक बेबी फॉर्म्युला मिळविण्यासाठी वणवण भटकत आहेत. अमेरिका हा काही तिसऱ्या जगातील देश नाही’, असे एलिस स्टेफानिक यांनी सुनावले. कॅट कॅमाक यांनी निर्वासितांच्या केंद्रात ठेवलेले ‘बेबी फॉर्म्युला’चे साठे व अमेरिकी शहरांमधील रिकामी शेल्फ यांचे फोटो सोशल मीडियावर प्रसिद्ध केले आहेत. ही गोष्ट बायडेन यांच्या ‘अमेरिका लास्ट’ धोरणाची निदर्शक असल्याचा ठपका कॅमाक यांनी ठेवला आहे. टेक्सास प्रांताचे गव्हर्नर ग्रेग ॲबॉट यांनी, ‘बेबी फॉर्म्युला’ची टंचाई हे बायडेन प्रशासनाकडून राबविण्यात येणाऱ्या विसंगत व बेजबाबदार धोरणांचे प्रतीक असल्याचा आरोप केला आहे.

इंधन दरवाढ, महागाई, निर्वासितांची घुसखोरी यासारख्या मुद्यांवरून बायडेन प्रशासन आधीच अडचणीत असून ‘बेबी फॉर्म्युला’चा मुद्दा अमेरिकी जनतेतील रोषात अधिकच भर टाकणारा ठरला आहे.

leave a reply