अमेरिका प्रचारयुद्धाचा वापर करून इराण-सौदीमध्ये तणाव वाढवित आहे

इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाचा आरोप

तेहरान – आपल्या शेजारी अरब देशांबरोबरचे संबंध सुधारण्यासाठी इराण सकारात्मक पावले उचलत आहे. याला चांगला प्रतिसादही मिळत आहे. अशा परिस्थितीत, अमेरिका इराणच्या विरोधात खोट्या बातम्या प्रसिद्ध करून सौदीबरोबरील तणाव वाढविण्याचे काम करीत आहे. अरब देशांमध्ये इराणविरोधात नकारात्मक वातावरण निर्माण करण्यासाठी अमेरिका प्रचारयुद्धाचा वापर करीत आहे, असा घणाघाती हल्ला इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाने चढविला. इराण सौदीवर हल्ल्याच्या तयारीत असल्याचा इशारा अमेरिकेतील आघाडीच्या वर्तमानपत्राने दिला होता. त्यावर इराणकडून ही प्रतिक्रिया आली आहे.

Iran Nasser Kananiलवकरच किंवा येत्या ४८ तासात इराण सौदी अरेबियावर हल्ला चढवू शकतो, अशी बातमी ‘द वॉल स्ट्रिट जर्नल’ या अमेरिकेच्या वर्तमानपत्राने प्रसिद्ध केली. सौदीच्या गुप्तचर विभागाने अमेरिकेला याची माहिती कळविली असल्याचा दावा या वर्तमानपत्राने केला होता. या बातमीवर अमेरिकेचे संरक्षण मुख्यालय पेंटॅगॉनने प्रतिक्रिया दिली होती. आखातात तैनात आपल्या जवानांच्या सुरक्षेसाठी अमेरिका कुठल्याही पर्यायाचा वापर करील, असा इशारा पेंटॅगॉनने दिला होता.

पण अमेरिकेच्या वर्तमानपत्राने सौदीवरील संभाव्य हल्ल्याबाबत दिलेली बातमी खोटी असल्याचा आरोप इराणने केला. ‘पाश्चिमात्य देश आणि इस्रायलकडून अशा एकतर्फी बातम्यांची निर्मिती केली जाते. यामुळे आखाती देशांमध्ये इराणविरोधात नकारात्मक वातावरणनिर्मिती होते आणि अरब देशांबरोबर संबंध सुधारण्याच्या प्रयत्नांना हादरे दिले जातात’, असा ठपका इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते नासिर कनानी यांनी ठेवला.

‘परस्पर आदर आणि आंतरराष्ट्रीय नियमांच्या आधारे इराण शेजारी अरब देशांबरोबर चांगले संबंध प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न करीत आहे. यामुळे या क्षेत्रात स्थैर्य आणि शांतता प्रस्थापित होऊ शकते. पण अशा खोट्या बातम्या इराण व सौदीमधील तणाव वाढवू शकतात’, असा दावा कनानी यांनी केला. त्याचबरोबर इराणवर असे आरोप करणाऱ्या अमेरिकेकडे यासंबंधी पुरावे नसल्याचे कनानी यांनी स्पष्ट केले. पेंटॅगॉनने देखील सौदीवरील संभाव्य हल्ल्याबाबत ठोस माहिती देण्याबाबत टाळाटाळ केली होती.

दरम्यान, काही महिन्यांपूर्वी सौदी अरेबियाच्या नेत्यांनी देखील इराणबरोबर सहकार्य प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे म्हटले होते. इराण व सौदीच्या अधिकाऱ्यांमध्ये याबाबत चर्चा पार पडल्याच्या बातम्याही आल्या होत्या.

leave a reply