दुबई – इराणने फोर्दो येथील अणुप्रकल्पात संशयास्पदरित्या भूमिगत बांधकाम सुरू केले आहे. गेल्या काही महिन्यांच्या सॅटेलाईट फोटोग्राफ्समधून ही माहिती उघड झाल्याचा दावा आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्थेने केला. अमेरिकेचे विद्यमान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या कार्यकाळातील चार आठवडे शिल्लक आहेत. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी इराणवर निर्बंध लादण्याचा सपाटा लावला आहे. अशा परिस्थितीत, फोर्दो येथील भूमिगत हालचालींची बातमी प्रसिद्ध झाल्यामुळे ट्रम्प प्रशासनाकडून इराणवर मोठी कारवाईची शक्यता असल्याचा दावा केला जातो.
इराणच्या रोहानी सरकारने सप्टेंबर महिन्यात मोठी घोषणा केली होती. अमेरिकेने लादलेल्या निर्बंधांचा निषेध आणि युरोपिय देशांवर टीका करून इराणने २०१५ सालच्या अणुकरारातील अटींचे उल्लंघन करण्याचे जाहीर केले होते. यानुसार फोर्दो अणुप्रकल्पातील युरेनियमचे संवर्धन वाढविण्याचे इराणने स्पष्ट केले होते. इराणच्या या निर्णयावर त्यावेळी जोरदार टीका झाली होती. अमेरिकी वृत्तसंसस्थेने प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार, याच सप्टेंबर महिन्याच्या अखेरीला इराणने फोर्दो अणुप्रकल्पातील भूमिगत इमारतीसाठी बांधकाम सुरू केले. ‘मॅक्सार टेक्नोलॉजिस’कडून प्राप्त केलेल्या सॅटेलाईट फोटोग्राफ्सचा हवाला देऊन सदर वृत्तसंस्थेने बातमी प्रसिद्ध केली. तर ११ डिसेंबर रोजीच्या सॅटेलाईट फोटोग्राफ्समध्ये फोर्दो प्रकल्पातील इमारतीसाठी मोठ्या प्रमाणात खांब उभारल्याचे दिसत आहेत. भूकंपापासून इमारतीला आधार देण्यासाठी याप्रकारचे खांब उभारले जातात, याची आठवण अमेरिकी वृत्तसंस्थेने करुन दिली. या प्रकल्पाच्या आवारात इराणचे ‘नॅशनल वॅक्यूम टेक्नोलॉजी सेंटर’ देखील आहे. युरेनियम संवर्धनासाठी वापरल्या जाणार्या प्रक्रियेत या सेंटरचे सहाय्य मिळते. या व्यतिरिक्त अमेरिकी वृत्तसंस्थेने इस्रायली लष्कराच्या माजी सैनिकाने सोशल मीडियावर प्रसिद्ध केलेल्या सॅटेलाईट फोटोग्राफ्सचा देखील हवाला दिला. यामध्ये फोर्दो अणुप्रकल्पातील बांधकामाची बारीकसारीक माहिती देण्यात आली आहे. दक्षिण कोरियन एअरोस्पेस संस्थेने हे सॅटेलाईट फोटोग्राफ्स प्रसिद्ध केले होते. यावरुन इराण फोर्दो अणुप्रकल्पात भूमिगत बांधकाम करीत असल्याचे किंवा यात यशस्वी झाल्याचे संकेत अमेरिकी वृत्तसंस्थेने दिले.
२०१५ साली इराणने पाश्चिमात्य देशांबरोबर केलेल्या अणुकराराप्रमाणे फोर्दो अणुप्रकल्पातील युरेनियमचे संवर्धन थांबविणे आवश्यक होते. तसेच या ठिकाणी टेक्नोलॉजी सेंटर उभारण्याचे पाश्चिमात्य देशांनी सुचविले होते. फोर्दो अणुप्रकल्पातील इराणच्या हालचाली निर्बंधित करण्याविषयी या करारात विशेष जोर देण्यात आला होता, अशी माहिती ‘जेम्स मार्टिन सेंटर फॉर नॉनप्रोलिफरेशन स्टडीज्’ या अभ्यासगाटचे विश्लेषक जेफ्री लुईस यांनी दिली. पण फोर्दो अणुप्रकल्प ही आपली ‘रेड लाईन’ असल्याचे इराणचे सर्वोच्च धार्मिक नेते आयातुल्लाह खामेनी यांनी धमकावले होते.
फोर्दो हा इराणच्या अणुकार्यक्रमातील सर्वात महत्त्वाचा अणुप्रकल्प मानला जातो. या अणुप्रकल्पामध्ये किमान तीन हजार सेंट्रीफ्यूजेस बसविले जाऊ शकतात, असा दावा केला जातो. अशा या डोंगरांनी घेरलेला फोर्दो अणुप्रकल्पाच्या सुरक्षेसाठी इराणने विमानभेदी तोफा तसेच इतर लष्करी तैनाती केली आहे. अमेरिकी वृत्तसंस्थेत प्रसिद्ध झालेल्या या बातमीवर इराणने प्रतिक्रिया दिलेली नाही.
दरम्यान, काही आठवड्यांपूर्वी इराणच्या अणुकार्यक्रमाशी संबंधित अणुशास्त्रज्ञ फखरीझादेह यांच्या हत्येनंतर इराणने युरेनियमच्या संवर्धनाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढविण्याची घोषणा केली होती. याआधीच इराणच्या अणुप्रकल्पातील संवर्धित युरेनियमच्या साठ्यावर चिंता व्यक्त केली जाते. इराणकडे किमान दोन अणुबॉम्बची निर्मिती करण्याएवढा संवर्धित युरेनियमचा साठा असल्याचा दावा केला जातो. अशा परिस्थितीत फोर्दो अणुप्रकल्पातील इराणच्या हालचाली चिंता वाढविणार्या ठरतात.