तालिबानवरील निर्बंध शिथिल करणे अफगाणिस्तानच्या शांततेसाठी धोकादायक ठरेल

- संयुक्त राष्ट्रसंघातील अफगाणिस्तानच्या राजदूत

संयुक्त राष्ट्र – गेल्या काही दिवसांपासून तालिबानने अफगाणिस्तानातील हिंसाचार, आत्मघाती हल्ल्यांची तीव्रता वाढविली आहे. त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटनांबरोबरही तालिबानने सहकार्य प्रस्थापित केले आहेत. अशा परिस्थितीत, अफगाणिस्तानातील वास्तविकतेकडे दुर्लक्ष करून तालिबानवरील निर्बंध शिथिल केले तर ते या देशातील शांततेसाठी सुरू असलेल्या प्रयत्नांसाठी प्रतिकूल आणि हानिकारक ठरेल, असा इशारा संयुक्त राष्ट्रसंघातील अफगाणिस्तानच्या राजदूत अदेला राझ यांनी दिला.

तालिबानवरील निर्बंध

संयुक्त राष्ट्रसंघातील सुरक्षा परिषदेला संबोधित करताना अदेला राझ यांनी अफगाणिस्तानातील वाढत्या दहशतवादी हल्ल्यांकडे सर्वांचे लक्ष वेधले. अफगाणिस्तानात शांती व स्थैर्य प्रस्थापित व्हावे, यासाठी या देशातील सरकार प्रयत्नशील आहेत. अफगाणिस्तानचे सरकार कतारमधील तालिबानबरोबरच्या चर्चेतही सहभागी झाले असून पुढच्या महिन्यात वाटाघाटीही होणार आहेत. पण हे सर्व सुरू असताना तालिबानकडून अफगाणी लष्करावरील हल्ल्यांमध्ये वाढ होत असल्याची आठवण राझ यांनी करुन दिली. त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय समुदायाने बंदी घातलेल्या दहशतवादी संघटनांबरोबर तालिबानचे सहकार्य सुरू असल्याचा आरोप राझ यांनी केला.

तालिबानवरील निर्बंध

राझ यांनी दहशतावदी संघटनांची नावे घेण्याचे टाळले. तालिबानने कतारमधील चर्चेत अल कायदा व इतर दहशतवादी संघटनांबरोबरचे संबंध तोडण्याचे मान्य केले होते. पण अल कायदा तसेच पाकिस्तानस्थित दहशतवादी संघटनांबरोबर अजूनही तालिबानचे संबंध असल्याचे काही आठवड्यांपूर्वीच उघड झाले होते. अशा परिस्थितीत, संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेने तालिबानवर लादलेले निर्बंध शिथिल करण्याची घाई करू नये. त्याआधी राष्ट्रसंघाच्या निरिक्षकांच्या पथकाने अफगाणिस्तानातील वर्तमान स्थितीचा अभ्यास करावा, असे आवाहन राझ यांनी केले.

दरम्यान, तालिबानबरोबरच्या कराराच्या पार्श्‍वभूमीवर, अमेरिका अफगाणिस्तानातून माघार घेत असली तरी येथील दहशतवादविरोधी कारवाईत फरक पडणार नसल्याचे अमेरिकेने स्पष्ट केले आहे.

leave a reply