दक्षिण कोरियाबरोबरच्या सरावाची अमेरिकेला किंमत मोजावीच लागेल

- चीनमधील उत्तर कोरियाचे राजदूत

अमेरिकेला किंमतबीजिंग/सेऊल – सोमवारपासून अमेरिका आणि दक्षिण कोरियातील युद्धसराव सुरू झाला. हा सराव पूर्णपणे कम्प्युटर सिम्युलेशनवर आधारीत असून यात मैदानी सरावाचा समावेश नसेल. पण हा सराव म्हणजे आपल्यावरील आक्रमणाची रिहर्सल असल्याचा आरोप करणाऱ्या उत्तर कोरियाने यासाठी अमेरिकेला धमकावले आहे. अमेरिकेला याची मोठी किंमत चुकवावी लागेल, असे उत्तर कोरियाने बजावले. तसेच अमेरिका हा चीन व उत्तर कोरियाचा समान शत्रू ठरतो व त्याविरोधात दोन्ही देशांच्या एकजुटीची आवश्‍यकता असल्याचे आवाहन चीनमधील उत्तर कोरियाच्या राजदूतांनी केले.

अमेरिका आणि दक्षिण कोरियाच्या लष्करामध्ये नऊ दिवसांचा युद्धसराव सुरू आहे. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर हा सराव पूर्णपणे कम्प्युटर सिम्युलेशन अर्थात संगणकीय प्रतिकृतीवर आधारीत असेल. गेल्या सहा महिन्यात अमेरिका आणि दक्षिण कोरियाच्या लष्करातील हा दुसरा सराव ठरतो. याआधी मार्च महिन्यात दोन्ही देशांच्या लष्करामध्ये मैदानी सराव झाला होता व त्या सरावात दोन्ही देशांच्या जवानांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता. पण त्या तुलनेत आकाराने लहान असलेल्या आणि कम्प्युटर सिम्युलेशनवर आधारीत सध्याच्या सरावामुळे उत्तर कोरिया फारच अस्वस्थ झाला आहे.

चीनमधील उत्तर कोरियाचे राजदूत रि राँग-नाम यांनी चिनी मुखपत्र ‘ग्लोबल टाईम्स’च्या माध्यमातून अमेरिका व दक्षिण कोरियातील या सरावावर टीका केली. ‘हा सराव म्हणजे उत्तर कोरियाविरोधी युद्धाची किंवा अणुयुद्धाची रिहर्सल आहे. या सरावाद्वारे अमेरिका उत्तर कोरियावरील हल्ल्याची तयारी करीत असून हे अजिबात खपवून घेणार नाही. यासाठी अमेरिकेला निश्‍चितपणे किंमत चुकवावी लागेल’, असे उत्तर कोरियाच्या राजदूताने धमकावले. कोरियन क्षेत्रात शांतता हवी असेल तर अमेरिकेने दक्षिण कोरियातून लष्करी माघार घ्यावी, अशी मागणी राजदूत नाम यांनी केली.

अमेरिका व दक्षिण कोरियातील या सरावाचा उत्तर कोरियासह चीनला देखील धोका असल्याचा आरोप नाम यांनी केला. ‘अमेरिका हा चीन आणि उत्तर कोरियाचा समान शत्रू आहे. अमेरिका फक्त दक्षिण कोरियाबरोबरच नाही तर आग्नेय आशिया तसेच चीनच्या शेजारी देशांबरोबर युद्धसराव व सहकार्य वाढवित आहे. या सहकार्याद्वारे अमेरिका चीनला वेढा घालत आहे. अमेरिकेच्या या लष्करी हालचाली रोखण्यासाठी चीन आणि उत्तर कोरियाला एकजूट करावी लागेल’, असे आवाहन उत्तर कोरियन राजदूतांनी केले.

गेल्या आठवड्यात रशियातील उत्तर कोरियन राजदूत सिन हाँग-शोल यांनी देखील अमेरिकेच्या विरोधात उत्तर कोरिया व रशियातील सहकार्य वाढविण्याचे आवाहन रशियन वृत्तसंस्थेशी बोलताना केले होते. अमेरिका हा रशिया आणि उत्तर कोरियासाठी समान शत्रू असल्याचा दावा हाँग-शोल यांनी केला होता.

दरम्यान, काही तासांपूर्वीच चीन व रशियाने अमेरिकेबरोबरील तणावाच्या पार्श्‍वभूमीवर लष्करी सहकार्य वाढविण्याची घोषणा केली. या दोन्ही देशांमधील सामरिक सहकार्य अमेरिका व मित्रदेशांसाठी मोठे आव्हान ठरू शकते, असा इशारा अमेरिकेचे अधिकारी देत आहेत. अशा परिस्थितीत, चीन व रशियातील उत्तर कोरियन राजदूतांनी अमेरिकाविरोधातील आघाडीत सहभागी होण्याचे संकेत दिले आहेत.

leave a reply