भारताचे पंतप्रधान व रशियन राष्ट्राध्यक्षांच्या चर्चेवर अमेरिकेची सावध प्रतिक्रिया

वॉशिंग्टन – पंतप्रधान नरेंद्र मोदी व रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांच्यात झालेल्या चर्चेवर अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाची प्रतिक्रिया आली आहे. राजनैतिक वाटाघाटीच्या मार्गानेच युक्रेनची समस्या सुटेल, असे पंतप्रधान मोदी यांनी रशियाच्या राष्ट्राध्यक्षांना पुन्हा एकदा सुचविले होते. त्यावर अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने सावध प्रतिक्रिया नोंदविली. भारताच्या पंतप्रधानांचे शब्द प्रत्यक्षात उतरतील, त्यावेळी त्याचे स्वागत करता येईल, असे अमेरिकन परराष्ट्र मंत्रालयाचे उपप्रवक्ते वेदांत पटेल यांनी म्हटले आहे. शुक्रवारी पंतप्रधान मोदी व रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्यात फोनवरून चर्चा झाली. या चर्चेत पंतप्रधानांनी राजनैतिक वाटाघाटींनीच युक्रेची समस्या सुटेल व राजनैतिक वाटाघाटी हाच समस्या सोडविण्याचा एकमेव मार्ग आहे, अशी भूमिका मांडली. याआधीही भारताच्या पंतप्रधानांनी युक्रेनच्या युद्धाबाबत ही भूमिका मांडली होती. सप्टेंबर महिन्यात उझबेकिस्तानच्या समरकंदमध्ये पार पडलेल्या एससीओच्या बैठकीत पंतप्रधान मोदी यांनी रशियन राष्ट्राध्यक्षांसमोर ‘हा युद्धाचा काळ नाही’ असे स्पष्ट केले होते. त्यांचे हे विधान पाश्चिमात्य माध्यमांनी उचलून धरले. त्यानंतरच्या काळातही भारताने संयुक्त राष्ट्रसंघ तसेच इतर ठिकाणी युक्रेनच्या युद्धाबाबत अशीच भूमिका स्वीकारली होती.

modi putinत्या पार्श्वभूमीवर, शुक्रवारी पंतप्रधान मोदी व राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्यामध्ये झालेल्या संवादावर अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाची प्रतिक्रिया आली. पंतप्रधान मोदी यांचे शब्द प्रत्यक्षात उतरल्यास त्याचे स्वागत करता येईल, असा दावा करून अमेरिकी परराष्ट्र मंत्रालयाचे उपप्रवक्ते वेदांत पटेल यांनी आपल्या देशाची नाराजी सौम्य शब्दात व्यक्त केली. भारताच्या या भूमिकेमुळे रशियाच्या युक्रेनवरील आक्रमणात फरक पडलेला नाही, अशी तक्रार पटेल यांच्या या प्रतिक्रियेमागे असल्याचे दिसते.

इतर देश रशियाबरोबरील आपल्या संबंधांबाबत स्वतंत्रपणे निर्णय घेत आहेत. अशा परिस्थितीत अमेरिका आपल्या सहकारी देशांबरोबर चर्चा करून युक्रेनच्या युद्धाची झळ इतरांना बसू नये, यासाठी प्रयत्न करीत आहे, असा दावे वेदांत पटेल यांनी केला. शांतता प्रस्थापित करून युक्रेनचे युद्ध थांबविण्याचा प्रयत्न करणाऱ्या देशांनी युक्रेनशीही चर्चा करावी, असे पटेल यांनी अमेरिकन परराष्ट्र मंत्रालाच्या पत्रकार परिषदेत सुचविले आहे.

भारत युक्रेनचे युद्ध थांबविण्यासाठी रशियाला राजनैतिक वाटाघाटी सुरू करण्याचा सल्ला देत असला, तरी भारताने अमेरिकेच्या मागणीनुसार रशियावर दबाव टाकण्यासाठी प्रयत्न केले नाहीत, अशी अमेरिकेची तक्रार आहे. उलट भारत रशियाकडून इंधनाची खरेदी वाढवून रशियाला अधिक प्रोत्साहन देत असल्याचा आरोप अमेरिका करीत आहे.

leave a reply