वॉशिंग्टन/किव्ह – रशियाकडून गेल्या 24 तासांमध्ये झालेल्या तीव्र क्षेपणास्त्रहल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेने युक्रेनला प्रगत हवाईसुरक्षा यंत्रणा पुरविण्याचा निर्णय घेतला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांच्याबरोबर चर्चेत ही माहिती दिली. युक्रेनकडून गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने हवाईसुरक्षा यंत्रणेसह दीर्घ पल्ल्याची क्षेपणास्त्रे तसेच लढाऊ विमानांची मागणी करण्यात येत होती.
सोमवार व मंगळवार असे सलग दोन दिवस रशियन फौजांनी युक्रेनी शहरांवर 100हून अधिक क्षेपणास्त्रांचा मारा केला. या हल्ल्यात युक्रेनची मोठ्या प्रमाणात हानी झाली आहे. युक्रेनच्या प्रमुख शहरांमधील वीज तसेच पाणीपुरवठा बंद झाला असून पायाभूत सुविधांना मोठा फटका बसला आहे. रशियाने केलेल्या हल्ल्यांमधील काही क्षेपणास्त्रे परतविल्याचा दावा युक्रेनी यंत्रणांकडून करण्यात आला होता. मात्र रशियाच्या प्रगत क्षेपणास्त्रांना युक्रेन तसेच पाश्चिमात्य देशांनी दिलेल्या यंत्रणा रोखू शकल्या नसल्याचे उघड झाले.
या पार्श्वभूमीवर, अमेरिकेने युक्रेनला प्रगत हवाईसुरक्षा यंत्रणा देण्याबाबत केलेली घोषणा महत्त्वाची मानली जाते. युक्रेनने अमेरिकेकडे ‘नॅसॅम्स’ व ‘फॅलँक्स वेपन्स सिस्टिम’ची मागणी केली आहे. यातील नॅसॅम्स अमेरिकेकडून पुरविण्यात येतील, असे सांगण्यात येते. मात्र क्षेपणास्त्रे व लढाऊ विमाने देण्याची मागणी अमेरिकेने पुन्हा फेटाळल्याचे सांगण्यात येते. अमेरिकेने आतापर्यंत युक्रेनला 16 अब्ज डॉलर्सहून अधिक मूल्याचे शस्त्रसहाय्य पुरविले आहे. त्यात ‘हायमार्स रॉकेट सिस्टिम्स’, जॅवलिन क्षेपणास्त्रे तसेच सशस्त्र वाहने व तोफांचा समावेश आहे.
अमेरिकेपाठोपाठ जर्मनीनेही येत्या काही दिवसात युक्रेनला हवाईसुरक्षा यंत्रणा देण्यात येईल, असे जाहीर केले. जर्मनी युक्रेनला चार ‘आयरिस-टी एसएलएम’ हवाईसुरक्षा यंत्रणा पुरविणार आहे. त्यातील पहिली यंत्रणा पुढील काही दिवसांमध्ये युक्रेनमध्ये दाखल होईल, अशी माहिती जर्मन संरक्षणमंत्र्यांनी दिली. जर्मनीने यापूर्वीही युक्रेनला एक अब्ज युरोहून अधिक संरक्षणसहाय्य पुरविले आहे. मात्र जर्मनीने पुरविलेल्या यंत्रणा वेळेत युक्रेनी लष्कराला मिळाल्या नसल्याची तसेच त्यात दोष असल्याची टीका युक्रेनी अधिकाऱ्यांकडून करण्यात आली होती.