टोकिओ – जपानच्या लष्कराबरोबर पार पडलेल्या युद्धसरावासाठी अमेरिकेने वापरलेले रॉकेट लाँचर्स माघारी नेण्याची अजिबात घाई नाही. पुढच्या युद्धसरावापर्यंत अमेरिकेचे रॉकेट लाँचर्स जपानच्या तळावर ‘ईस्ट चायना सी’समोर रोखून तैनात असतील, अशी माहिती अमेरिकेच्या पॅसिफिक कमांडच्या वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्याने दिली. ईस्ट चायना सीच्या क्षेत्रात चीनबरोबरचा वाढता तणाव आणि उत्तर कोरियाच्या अण्वस्त्रसज्जतेच्या इशाऱ्यानंतर अमेरिकेची ही घोषणा लक्ष वेधून घेणारी ठरते.
‘ईस्ट चायना सी’च्या क्षेत्रातील ‘अमामी ओशिमा’ बेटावर अमेरिका व जपानच्या लष्कराचा नुकताच सराव पार पडला. तैवानपासून काही अंतरावर असलेल्या या बेटावरील सरावात अमेरिकेने ‘हाय मोबिलीटी आर्टिलरी रॉकेट सिस्टीम्स-एचआयएमएआरएस’ (हायमार्स) या जलदगतीने तैनात करता येणारे रॉकेट लाँचर्सचा वापर केला होता. 500 किलोमीटर पर्यंत मारा करू शकणाऱ्या सदर रॉकेट लाँचर्सचा पुरवठा अमेरिकेने युक्रेनला रशियाविरोधी युद्धासाठी केला आहे.
जपानबरोबरचा युद्धसराव पूर्ण झाल्यानंतर अमेरिका इतर शस्त्रास्त्रे माघारी नेत असली तरी ‘हायमार्स’ अमामी ओशिमा बेटावरच तैनात ठेवण्याचे अमेरिकेच्या पॅसिफिक कमांडमधील जनरल चार्ल्स फ्लिन यांनी स्पष्ट केले. येत्या काही महिन्यांमध्ये अमेरिका आणि जपानच्या लष्करात आणखी काही युद्धसरावांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यासाठी हायमार्स जपानमध्येच तैनात ठेवण्यात येईल, अशी माहिती जनरल फ्लिन यांनी दिली. याबाबत जपानचे संरक्षणदलप्रमुख जनरल योशिहिदे योशिदा यांच्याशी चर्चा झ्ााल्याचे जनरल फ्लिन म्हणाले.
गेल्या काही आठवड्यांपासून चीनने ईस्ट चायना सीच्या क्षेत्रातील आपली लष्करी आक्रमकता तीव्र केली आहे. चीनच्या विनाशिका आपल्या सेंकाकू बेटांच्या सुरक्षेला आव्हान देत असल्याचा आरोप जपान करीत आहे. तर चीनची लढाऊ विमाने आणि विनाशिका तैवानमध्ये घुसखोरीचे प्रयत्न करीत आहेत. अमेरिका आणि जपानने आपल्या विनाशिका तैवानच्या आखातात रवाना केल्या होत्या. पण आता तैवानजवळ असलेल्या जपानच्या अमामी ओशिमा बेटावर अमेरिकेने हायमार्स रॉकेट लाँचर्स तैनात करून चीनला इशारा दिल्याचे दिसत आहे.