जेरूसलेम – अमेरिका व इराणमध्ये अणुकरारावर सहमती झाली असून लवकरच हा करार संपन्न होईल, असे दावे केले जात आहेत. मात्र सध्या हा अणुकरार शक्य नसल्याचे सांगून अमेरिकेच्या बायडेन प्रशासनाने इस्रायलला आश्वस्त केले आहे. इतकेच नाही तर इराणला अण्वस्त्रसज्ज होऊ न देण्याच्या निर्णयावर अमेरिका ठाम असल्याची ग्वाही देखील बायडेन प्रशासनाने दिली. याच्याही पुढे जाऊन स्वसंरक्षणासाठी इराणवर कारवाई करताना इस्रायलचे हात बांधले जाणार नाहीत, असे राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी स्वतःहून इस्रायलच्या पंतप्रधानांना सांगितल्याचा दावा अमेरिकेच्या इस्रायलमधील राजदूतांनी केला आहे.
गेल्या आठवड्यापर्यंत अमेरिका आणि इराण यांच्यातील अणुकरार अंतिम टप्प्यात पोहोचल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या. पण इस्रायलचे पंतप्रधान येर लॅपिड आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांच्यात फोनवरुन झालेल्या चर्चेनंतर समीकरणे बदल्याचा दावा इस्रायली माध्यमे करीत आहेत. इराणबरोबरचा अणुकरार सध्या तरी बाजूला पडल्याचा संदेश राष्ट्राध्यक्ष बायडेन आणि अमेरिकी अधिकारी इस्रायलला देत आहेत. दोन दिवसांपूर्वी इस्रायलमधील अमेरिकेचे राजूत थॉमस निडेस आणि इस्रायलच्या भेटीवर आलेल्या अमेरिकन सिनेटर्सनी ही माहिती माध्यमांसमोर उघड केली.
‘अमेरिकेला इराणबरोबर 2015 सालचा अणुकरार पुनर्जिवित करायचा आहे. पण अमेरिकेच्या काही अटींचा समावेश करूनच हा अणुकरार होऊ शकतो. कारण अमेरिकेला इराणच्या आक्रमकतेची जाणीव आहे. त्यामुळे अमेरिका इराणला कधीही अण्वस्त्रसज्ज होऊ देणार नाही. राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी इस्रायलचे पंतप्रधान लॅपिड यांच्याबरोबर झालेल्या चर्चेत ही ग्वाही दिली आहे’, असे अमेरिकेचे राजदूत निडेस यांनी म्हटले आहे.
इराणबरोबरचा अणुकरार झाला नाही किंवा हा करार झाला तरी स्वसंरक्षणासाठी इराणवर कारवाई करताना अमेरिका इस्रायलचे हात बांधणार नाही, असे आश्वासन राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी पंतप्रधान लॅपिड यांना दिल्याची माहिती निडेस यांनी दिली. इस्रायलच्या भेटीवर आलेले अमेरिकी सिनेटर लिंडसे ग्रॅहम, रॉबर्ट मेंडेझ यांनी देखील इराणचा अणुकरार अमेरिकन काँग्रेस आणि सिनेटच्या मंजुरीशिवाय पारित होणार नसल्याचे स्पष्ट केले. यानंतर राजदूत निडेस यांनी इस्रायलचे पंतप्रधान लॅपिड, तर अमेरिकी सिनेटर्सनी इस्रायली गुप्तचर यंत्रणा मोसादचे प्रमुख डेव्हिड बार्नी यांनी भेट घेतली.
दरम्यान, अमेरिकेबरोबरचा अणुकरार फिस्कटला तर इराणची आखातातील आक्रमकता अधिकच वाढेल. पर्शियन आखातासह रेड सीच्या क्षेत्रात तसेच इराक, सिरिया, लेबेनॉन व गाझापट्टीतील इराण आणि इराणसंलग्न गटांच्या हालचाली तीव्र होतील, अशी चिंता इस्रायलची माध्यमे व्यक्त करीत आहेत.
इस्रायलच्या लढाऊ विमानांचे अमेरिकन बॉम्बर्ससह उड्डाण
जेरूसलेम – गेल्या आठवड्यात आखाती क्षेत्रात दाखल झालेल्या अमेरिकेच्या ‘बी-52’ लांब पल्ल्याच्या बॉम्बर्स विमानांसोबत इस्रायलच्या लढाऊ विमानांनी उड्डाण केले. इस्रायलच्या हवाईहद्दीपासून पर्शियन आखातापर्यंत इस्रायली विमाने अमेरिकन बॉम्बर्स सोबत होती. इस्रायल व अमेरिकेच्या विमानांचे हे उड्डाण इराणसाठी स्पष्ट संकेत अल्याचा दावा केला जातो.
इंग्लंडच्या फेअरफोर्ड हवाईतळावरुन अमेरिकेच्या बी-52 बॉम्बर्स विमानांनी भूमध्य समुद्रातून आखातासाठी प्रवास सुरू केला होता. अमेरिका व सहकारी देशांना असलेल्या धोक्याविरोधात, या बॉम्बर्स विमानांच्या मोहिमा हे योग्य उत्तर असल्याचे अमेरिकी हवाईदलाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने म्हटले होते.
या अधिकाऱ्याने थेट उल्लेख केला नसला तरी अमेरिकन बॉम्बर्सची आखातातील गस्त इराणला इशारा असल्याचे बोलले जाते. याआधी जून महिन्यातही अमेरिकन बॉम्बर्सनी आखातातून अशीच गस्त घातली होती.