जम्मू काश्मीरच्या पुलवामामध्ये दहशतवादी हल्यात एक जवान शहीद

जम्मू – जम्मू काश्मीरच्या पुलवामामध्ये सुरक्षादलाच्या पथकावर दहशतवाद्यांनी चढविलेल्या हल्ल्यात एक जवान शहीद झाला असून एक जवान जखमी झाला आहे. अन्य एका घटनेत कुपवाडामध्ये सुरक्षादलाने केलेल्या कारवाईत लश्कर ए-तोयबाच्या तीन दहशतवाद्यांना पकडण्यात यश आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. दरम्यान, पाकिस्तानव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांच्या प्रशिक्षण तळाला कोरोनाव्हायरसचा विळखा पडला असल्याची माहिती पोलिस महासंचालक (डीजीपी) दिलबग सिंग यांनी दिली.

सीआरपीएफचे जवान व जम्मू काश्मीर पोलिस पुलवामा जिल्ह्यातील पेरचू पुलाजवळ गस्त घालत असताना दहशतवाद्यांनी सुरक्षादलाच्या पथकावर हल्ला चढवला. या हल्ल्यात दोन जवान जखमी झाले होते. मात्र दहशतवाद्यांच्या हल्यात गंभीर जखमी झालेले अनुज सिंग यांना वीरमरण आले. या हल्ल्यात मोहम्मद इब्राहिम हा जवान जखमी झाला आहे. दहशतवाद्यांच्या हल्ल्यानंतर संपूर्ण परिसराला वेढा घालण्यात आला असून दहशतवाद्यांचा शोध घेण्यात येत आहे.

दरम्यान, जम्मू-काश्मीरच्या कुपवाडामध्ये सुरक्षादलाचे जवान व दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. या चकमकीनंतर लोलाब जंगल भागातून, लष्कर-ए-तोयबाच्या तीन दहशतवाद्यांना अटक करण्यात जम्मू-काश्मीर पोलीस व २८-राष्ट्रीय रायफलच्या जवानांना यश आले. गुजरपट्टी गनबघ भागात दहाशतवादी असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे शोधमोहीम हाती घेण्यात आली होती. अटक करण्यात आलेले तिन्ही दहशतवादी नुकतेच लश्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेत सहभागी झाले होते. दहशतवाद्यांकडून शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे.

पाकिस्तानव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांच्या प्रशिक्षण तळालादेखील कोरोनाचा विळखा बसल्याचे समोर आले आहे. पाकिस्तानव्याप्त काश्मीरमधील तळावरून दहशतवाद्यांनी त्यांच्या कुटुंबियांशी
संपर्क साधला होता. हे संभाषण पकडण्यात आले आहे. येथील प्रशिक्षण तळावर असलेल्या काश्मीरी तरुणांना कोरोनाचा धोका आहे. काश्मीरमधील काही प्रशिक्षणार्थी कोरोनाव्हायरसने संक्रमित झाले असून त्यांचा मृत्यू होण्याची भीती आहे. कोणालाही त्यांची काळजी नसल्याचे हे दहशतवादी आपल्या कुटुंबियांना सांगत असल्याचे उघड झाल्याचे पोलिस महासंचालक (डीजीपी) दिलबग सिंग यांनी सांगितले.

या भागात २० लाँच पॅड्स व २० दहशतवादी तळ आहेत. प्रत्येक ठिकाणी किमान ५० दहशतवादी असतील असा अंदाज सिंग यांनी वर्तविला. वेगवेगळ्या गुप्तचर यंत्रणांकडून मिळत असललेल्या माहितीनुसार, पाकिस्तान कोरोनाबाधित दहशतवाद्यांना काश्मीरमध्ये घुसवण्याच्या प्रयत्नात आहे. पाकिस्तानव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांच्या लाँच पॅड्सवर सुमारे ४५० दहशतवादी भारतात घुसखोरीच्या तयारीत असल्याची माहिती यापूर्वीच समोर आली आहे.

leave a reply