महाराष्ट्र आणि छत्तीसगडमधून १०० माओवादी मध्य प्रदेशात घुसले

- वरिष्ठ अधिकार्‍याची माहिती

बालाघाट – महाराष्ट्र आणि छत्तीसगडमधून १०० हून अधिक माओवादी मध्य प्रदेशमध्ये घुसल्याची माहिती वरिष्ठ अधिकार्‍याने दिली आहे. माओवादी मध्य प्रदेशमध्ये आपला प्रभाव वाढविण्यासाठी प्रयत्न करीत असून या योजनेअंतर्गतच ही घुसखोरी झाल्याचा दावा करण्यात येत आहे. या पार्श्‍वभूमीवर मध्य प्रदेश सरकार निमलष्करी दलाच्या सहा तुकड्या बालाघाट आणि मंडला जिल्ह्यात तैनात केल्या जाणार आहेत. तसेच माओवाद्यांविरोधात मोहिमेसाठी विशेष तयार करण्यात आलेल्या मध्य प्रदेश पोलिसांच्या हॉक फोर्सची तैनाती वाढविण्यात येत असल्याचे अधिकार्‍याने म्हटले आहे.

माओवादी

गेल्या चार पाच वर्षात देशभरात माओवाद्यांविरोधात जोरदार कारवाई सुरू आहे. त्याचवेळी माओवाद्यांचा प्रभाव असलेल्या दुर्गम आदीवासी भागांमध्ये विकासकामे हाती घेण्यात आली आहेत. यामुळे माओवाद्यांचा प्रभाव ओसरला आहे. कित्येक माओवादी गेल्या काही महिन्यात शरणही आले आहेत, तर काही पकडले गेले आहेत. तसेच कारवाईत मोठ्या प्रमाणावर माओवादी ठारही झाले आहेत. या पार्श्‍वभूमीवर माओवादी आपला प्रभाव वाढविण्यासाठी सीमा क्षेत्रातील इतर भागांमध्ये घुसत आहे.

छत्तीसगड आणि महाराष्ट्रात माओवाद्यांविरोधात सुरू असलेल्या जोरदार कारवाईनंतर सुमारे १०० माओवादी मध्य प्रदेशात घुसल्याची माहिती वरीष्ठ अधिकार्‍याने दिली आहे. गेल्या काही महिन्यात हे माओवादी मध्य प्रदेशच्या बालाघाट आणि मंडला जिल्ह्यात आले असून येथे माओवाद्यांचा प्रभाव वाढविण्यासाठी योजनाबद्धरित्या प्रयत्न सुरू आहे. डिसेंबर महिन्यात बालाघाटमध्ये निरनिराळ्या चकमकीत तीन महिला माओवादी ठार झाल्या. यामध्ये दोन छत्तीसगडमधील, तर एक महाराष्ट्रातील महिला माओवाद्याचा समवेश होता. लाखो रुपयांचे इनाम त्यांच्या शिरावर होते. अनुक्रमे तीन, पाच आणि १४ लाखांचे इनाम असलेल्या या महिला माओवाद्यांना मध्य प्रदेशमध्ये चकमकीत ठार करण्यात आले, याकडे वरिष्ठ अधिकार्‍याने लक्ष वेधले. तसेच काही महिन्यांपूर्वी छत्तीसगडच्या एका इनामी माओवाद्यालाही बालाघाटमध्ये अटक झाली होती, अशीही माहिती या अधिकार्‍याने दिली.

बालाघाट आणि मंडला या छत्तीसगड आणि महाराष्ट्राला लागून असलेल्या सीमावर्ती जिल्ह्यात सहा नक्षल दलम कार्यरत असून यातील एका दलमची स्थापना काही महिन्यांपूर्वीच झाली आहे. यावरून माओवादी मध्य प्रदेशात आपला प्रभाव वाढविण्याच्या तयारीत असल्याचे स्पष्ट होते, असा दावा या अधिकार्‍याने केला. या पार्श्‍वभूमीवर बालाघाट आणि मंडलामध्ये निमलष्करी दलाच्या तुकड्या तैनात करण्याची मागणी करण्यात आली आहे.

गेल्या महिन्यातच मध्य प्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी बालाघाटला भेट दिली होती. त्यावेळी माओवाद्यांचा वावर असलेल्या भागात निमलष्करी दलाच्या सहा तुकड्या तैनात करण्यात येणार असल्याचे जाहीर केले होते. याशिवाय हॉक फोर्सचीही तैनाती या दोन्ही जिल्ह्यांमध्ये करण्यात येईल, असे गृहमंत्र्यांनी सांगितले आहे, अशी माहिती वरिष्ठ अधिकार्‍याने दिली.

दरम्यान, रविवारी झारखंडमध्ये कित्येक हिंसक घटना आणि गुन्ह्यांमध्ये सामील असलेल्या एका माओवाद्याला गुजरातच्या कोसांबा येथे अटक करण्यात आली. गुड्डू सिंग असे या माओवाद्याचे नाव असून दोन्ही राज्यांच्या पोलिसांनी संयुक्त मोहिम राबवत या माओवाद्याला अटक केली. गेल्या काही दिवसांपासून गुड्डू सिंगच्या हालचालीवर पोलीस लक्ष ठेवून होते.

leave a reply