सिरियातील अमेरिकेच्या हवाई हल्ल्यात 11 ठार

- लष्करी तळावरील ड्रोन हल्ल्याला अमेरिकेचे उत्तर

वॉशिंग्टन/दमास्कस – सिरियातील सैन्यतैनाती वाढविण्याची घोषणा केल्यानंतर अमेरिकेने या देशातील हवाई हल्ले वाढविले आहेत. अमेरिकेच्या लढाऊ विमानांनी सिरियाच्या वेगवेगळ्या शहरांमध्ये केलेल्या हवाई हल्ल्यात 11 जण ठार झाले. इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्‌‍सशी संबंधित ठिकाणांवर ही लष्करी कारवाई केल्याची माहिती अमेरिकेचे संरक्षणमंत्री लॉईड ऑस्टिन यांनी दिली.

सिरियातील अमेरिकेच्या हवाई हल्ल्यात 11 ठार - लष्करी तळावरील ड्रोन हल्ल्याला अमेरिकेचे उत्तरकाही तासांपूर्वी सिरियातील हसाकेह येथील अमेरिकेच्या लष्करी तळावर झालेल्या ड्रोन हल्ल्यात एक कंत्राटदाराचा बळी गेला व अमेरिकेचे पाच जवान जखमी झाले होते. इराणी बनावटीच्या ड्रोन्सद्वारे हा हल्ला चढविण्यात आला होता. हसाकेह येथील लष्करी तळावर अमेरिका व मित्रदेशांचे सैन्य तैनात आहे. या ड्रोन हल्ल्यामुळे अमेरिकेच्या जवानांची सुरक्षा धोक्यात आली होती. याआधीही सिरियातील अमेरिकेच्या लष्करी तळांवर ड्रोन हल्ले झाल्याची आठवण अमेरिकेचे संरक्षणमंत्री ऑस्टिन यांनी करुन दिली. इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्‌‍सने चढविलेल्या या हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यासाठी ही कारवाई केल्याचे अमेरिकेच्या संरक्षणमंत्र्यांनी स्पष्ट केले.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी या कारवाईला परवानगी दिल्याची माहिती संरक्षणमंत्री ऑस्टिन यांनी दिली. सिरियातील कोणत्या ठिकाणांवर कारवाई केली, याची माहिती अमेरिकेच्या संरक्षणमंत्र्यांनी दिली नाही. पण ब्रिटनस्थित सिरियातील मानवाधिकार संघटनेने दिलेल्या माहितीनुसार, देर अल-झोर, मयादीन आणि अल-बुकमल या तीन शहरांमध्ये हे हल्ले चढविण्यात आले. यापैकी देर अल-झोरमधील कारवाईत इराणसंलग्न सहा दहशतवादी मारले गेले. तर मयादीन शहरात दोन आणि अल-बुकमलमधील हल्ल्यात तीन दहशतवादी ठार झाल्याचा दावा मानवाधिकार संघटनेने केला. पण सिरियातील अमेरिकेच्या हल्ल्यात आपले नुकसान झालेले नसल्याचे इराणने म्हटले आहे.

सिरियातील अमेरिकेच्या हवाई हल्ल्यात 11 ठार - लष्करी तळावरील ड्रोन हल्ल्याला अमेरिकेचे उत्तर2015 साली आयएस या दहशतवादविरोधी संघटनेविरोधातील कारवाईसाठी अमेरिकेने सिरियामध्ये लष्कर घुसविले होते. सिरियात सुरू असलेल्या गृहयुद्धाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेने स्थानिक बंडखोरांच्या सहाय्याने येथील लष्करी तळांवर ताबा मिळविला होता. पण दहशतवादविरोधी कारवाईच्या आड अमेरिकेने सिरियातील इंधनाची चोरी केल्याचा आरोप सिरियाने केला होता. 2020 साली अमेरिकेचे तत्कालिन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आयएसचा प्रभाव संपुष्टात आल्याचे सांगून सिरियातून सैन्यमाघारीची घोषणा केली होती. पण बायडेन प्रशासनाने सिरियातील सैन्यतैनाती वाढविण्याचे जाहीर केले असून लवकरच येथे अमेरिकेचे अतिरिक्त लष्कर दाखल होणार असल्याचा दावा केला जातो.

दरम्यान, ‘आयएस’विरोधी कारवाईबरोबरच सिरियातील इराण व इराणसंलग्न दहशतवादी संघटनांनाही लक्ष्य केले आहे. तर इराणसंलग्न गटांनी सिरिया तसेच इराकमधील अमेरिकेच्या लष्करी तळांवर ड्रोन्स तसेच क्षेपणास्त्रांचे हल्ले चढविल्याच्या बातम्याही समोर आल्या होत्या. इराणबरोबर अणुकरारावर चर्चा करणाऱ्या बायडेन प्रशासनाने सिरियातील हे हल्ले रोखले होते. मात्र युक्रेनमधील युद्धात इराणकडून रशियाला मिळत असलेल्या लष्करी सहाय्याच्या पार्श्वभूमीवर, बायडेन प्रशासनाने इराणच्या विरोधात कठोर निर्णय घेण्याचे सत्र सुरू केल्याचे संकेत मिळत आहेत. सिरियातील इराणच्या तळांवरील हल्ले बायडेन प्रशासनाच्या या धोरणांचा भाग असल्याचे दिसते.

हिंदी

 

leave a reply