अफगाणिस्तानातील पुरात ११० जणांचा बळी

काबूल – अफगाणिस्तानच्या पूर्व आणि उत्तरेकडील प्रांतामध्ये मुसळधार पावसामुळे आलेल्या पुरात ११० जणांचा बळी गेला. तर १५०हून अधिक जखमी झाले आहेत. हजारो घरांची पडझड झाली असून अनेकजण ढिगार्‍याखाली अडकलेले आहेत. त्यामुळे मृतांची संख्या वाढण्याची भिती व्यक्त केली जाते. अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष अश्रफ गनी यांनी यंत्रणेला सर्वोतोपरी सहाय्य करण्याचे आदेश दिले.

११० जणांचा बळी

गेल्या २४ तासात अफगाणिस्तानच्या पूर्व आणि उत्तरेकडील भागात मुसळधार पावसाने पूर आला. अफगाणिस्तानच्या परवान प्रांताला पुराचा सर्वाधिक फटका बसला असून इथल्या ८५ जणांना पुरामुळे जीव गमवावा लागला. यात महिला आणि मुलांचा समावेश आहे. एका रात्रीत पावसाने या भागात कहर केल्यामुळे झोपेत असतानाच अनेकांच्या घरांमध्ये पाणी शिरले. परवानमधली ३०० घरे वाहून गेली आहेत. तर अनेक घरांची पडझड झाली असून ढिगार्‍याखाली काही जण अडकले आहेत. त्यांच्यापर्यंत मदत पोहोचायला उशीर होत असून गुरुवारी बचावकार्य सुरु झाले. आपत्ती पथकांबरोबरच अफगाणिस्तानचे लष्करही या बचावकार्यात उतरले आहेत.

११० जणांचा बळी

या पावसामुळे काही भागातल्या हजारो एकर शेतीचे नुकसान झाले. परवान आणि आजूबाजूच्या भागात सर्वत्र चिखल झाला आहे, रस्ते खचले असून वीजपुरवठा खंडित झाला आहे. अशा परिस्थितीत मदतकार्य वेळेवर मिळत नसल्याने जनता त्रस्त झाली आहे.

दरवर्षी अफगाणिस्तानमध्ये मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण होते. अपुर्‍या पायाभूत सुविधेमुळे हे सर्व होत असल्याचे सांगितले जाते. शिवाय अनेक घरांचे कच्चे बांधकाम आहे. त्यामुळे मुसळधार पावसात ही घरे वाहून जात असल्याचे स्थानिकांनी म्हटले. दरम्यान, ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात अफगाणिस्तानच्या नांगरहार प्रांतात आलेल्या पुरात १६ जणांचा बळी गेला होता.

leave a reply