ऊर्जा कंपन्यांनी ५.८८ लाख कोटी रुपयांचे  प्रकल्प जलदगतीने कार्यान्वित करावेत  

-  केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान

नवी दिल्ली –  कोरोनाच्या संकटाचे संधीत रूपांतर करून सुमारे ५.८८ लाख कोटी रुपयांच्या खर्चाचे इंधन क्षेत्रातील ८,३६३  प्रकल्प जलदगतीने कार्यान्वित करावेत, असे केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी सांगितले. ऊर्जा कंपन्यांकडून राबण्यात येणाऱ्या प्रकल्पांमधून सुमारे ३३.८ कोटी मनुष्यबळ दिवसांची रोजगारनिर्मिती होण्याचा अदाज व्यक्त करण्यात येत आहे. कोरोना साथीत जाहीर करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे मोठ्या प्रमाणात रोजगाराची समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे केंद्र सरकारकडून रोजगार निर्मितीसाठी वेगवेगळ्या उपाययोजना करण्यात येत आहेत. ऊर्जा कंपन्यांतर्फे हाती घेण्यात आलेल्या प्रकल्पांमुळे रोजगाराचा प्रश्न सोडवण्यास मदत मिळेल, असे संकेत मिळत आहेत.
५.८८ लाख कोटी
पेट्रोलियम उद्योगाने कोरोना ‘संकटाचे संधीत रूपांतर करावे. रोजगार निर्माण करण्यासाठी तसेच विकासाला पुनरुजीवित करण्यासाठी प्रयत्न करावेत, असे कंपन्यांना सांगण्यात आले आहे. प्रकल्पांच्या अंदाजित खर्चापैकी चालू आर्थिक वर्षात अंदाजे १.२० लाख कोटी रुपये खर्च होईल असे सांगण्यात येते आहे. इंधन क्षेत्रातील कंपन्यांकडून चालू वर्षात विविध प्रकल्पांवर सुमारे २६,५७६ कोटी रुपयांचा भांडवली खर्च केला गेला आहे. त्यातील ३२५८ कोटी रुपये कामगार संबंधित मुद्यांवर खर्च करण्यात आले असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

इंधन कंपन्यांतर्फे हाती घेण्यात आलेल्या प्रकल्पांमध्ये रिफायनरी प्रकल्प, बायो रिफायनरीज, पायाभूत सुविधा प्रकल्प, पाईपलाइन, सीजीडी प्रकल्प, ड्रिलिंग व सर्वेक्षण उपक्रमांचा समावेश आहे. ऑईल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन (ओएनजीसी), इंडियन ऑईल कॉर्पोरेशन (आयओसी), हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (एचपीसीएल), भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (बीपीसीएल), गेल इंडिया लिमिटेड, ऑईल इंडिया लिमिटेड (ओआयएल) आणि एचपीसीएल-मित्तल एनर्जी लिमिटेडतर्फे (एचएमईएल).हे प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत.

५.८८ लाख कोटी

कंपन्यांतर्फे हाती घेण्यात आलेले ८३६३ प्रकल्प पूर्ण करण्यासाठी एकूण ३३.८ कोटी मनुष्यबळ दिवसांची रोजगारनिर्मिती अपेक्षित आहे. त्यापैकी चालू आर्थिक वर्षात ९.७६   कोटी मनुष्यबळ दिवसांच्या रोजगारनिर्मितीचे लक्ष्य आहे. तर यावर्षी आतापर्यंत तेल आणि  वायू प्रकल्पांच्या अंमलबजावणीत भांडवली खर्चाच्या माध्यमातून २.२ कोटीपेक्षा जास्त मनुष्यबळ दिवस रोजगार निर्माण झाला आहे. आर्थिक वर्षात सुमारे ४१,६७२ कोटी रुपये रोजगारभिमुख परिचालन खर्चाचे नियोजन करण्यात आले आहे,.  त्यापैकी ११,२९६ कोटी रुपये खर्च झाले आहेत. ४१,६७२ कोटी रुपयांच्या या परिचालन खर्चामध्ये सुमारे १४.५  कोटी मनुष्यबळ दिवसाचा  रोजगार निर्माण होईल, अशी माहिती सूत्रांनी दिली.

leave a reply