विशाखापट्टणममध्ये गॅस गळतीने १३ जणांचा बळी – पाच हजार जणांना बाधा

विशाखापट्टणम – आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम येथील एका फॅक्टरीत स्टिरीन वायूची गळती झाल्याने मोठी दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेत १३ जणांचा बळी गेला. सुमारे तीन किलोमीटरपेक्षा क्षेत्रात हा वायू पसरून येथील पाच हजाराहून जास्त रहिवाशांना या विषारी रासायनिक वायूची बाधा झाली आहे. सरकारने या भागातील सुमारे आठ हजार नागरिकांची तपासणी करण्याचा निर्णय घेतला आहे. या वायू गळतीने हजारो जणांचे बळी घेणाऱ्या १९८४ च्या भोपाळ गॅस दुर्घटनेची आठवणी ताज्या झाल्या असून या भागातील गावांमधून नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यासाठी बचावकार्य हाती घेण्यात आले आहे.

विशाखापट्टणम येथील ‘विशाखा एलजी पॉलिमर’ या पॉलिस्टीरीन बनविणाऱ्या दक्षिण कोरियन कंपनीत गुरुवारी पहाटे अडीच ते तीनच्या सुमारास अचानक वायू गळती सुरु झाली. काही क्षणातच हा वायू या फॅक्टरीच्या आजूबाजूच्या तीन किलोमीटरपेक्षा जास्त क्षेत्रात पसरला. नागरिकांना श्वास घेण्यास त्रास जाणवू लागला. उलट्या होऊ लागल्या, चक्कर येऊन नागरिक पडू लागले. घराच्या बाहेर पडून जिवाच्या आकांताने पाळणारे रस्त्यातच बेशुद्ध झाल्याचे समोर आले आहेत. यावरून येथील परिस्थितीचा अंदाज येऊ शकतो.

पॉलिस्टीरीन म्हणजे विशिष्ट प्रकारचे प्लास्टिक बनविणारी ही फॅक्टरी गेल्या ४० दिवसांपासून लॉकडाऊनमुळे बंद होती. सरकारने कारखाने सुरु करण्यास परवानगी दिल्यानंतर पुन्हा हा कारखाना सुरु करण्यासाठी तयारी होत असताना ही दुर्घटना घडली आहे. स्टिरीन वायू अतिशय घातक मनाला जातो. वातावरणात ऑक्सिजनबरोबर हा वायू सहज मिसळून जातो आणि यामुळे हवेतील कार्बन मोनो ऑक्साइडचे प्रमाण वाढून याच्या संपर्कात येणाऱ्या व्यक्तीच्या फुफ्फुसांवर विपरीत परिणाम होऊन श्वास घेण्यास त्रास जाणवतो. या रासायनिक वायूच्या संपर्कात आलेली व्यक्तीचा अवघ्या १० मिनिटात मृत्यूही होऊ शकतो, अशी माहिती समोर येत आहे.

  ‘विशाखा एलजी पॉलिमर’ ही फॅक्टरी सुदैवाने विशाखापट्टणम शहराच्या काहीशी बाहेरच्या बाजूस असल्याने शहरातील नागरिक या वायू गळतीच्या भीषण परिणामांपासून बचावले आहेत. अन्यथा प्रचंड मोठी दुर्घटना घडली असती असा दावा करण्यात येतो. कंपनीने सकाळी ९ वाजेपर्यंत प्रकल्पातून होणारी ही गॅस गळती थांबविण्यात यश मिळविले होते.

मात्र या दुर्घटनेने ३५ वर्षांपूर्वीच्या भोपाळ गॅस दुर्घटनेच्या आठवणी ताज्या केल्या आहेत. या दुर्घटनेत युनियन कार्बाईड नावाच्या कंपनीत अशीच पहाटेच्या सुमारास विषारी वायूची गळती झाल्याने हजारो नागरिकांचा झोपेतच मृत्यू झाला होता. पाच हजार नागरिक मृत्युमुखी पडले होते, तर ६ लाख नागरिकांना बऱ्याच काळापर्यंत याचे भीषण परिणाम भोगवे लागले होते.

leave a reply