जगभरात कोरोनाचा कहर – चोवीस तासात सहा हजारांहून अधिक बळी

बाल्टिमोर – कोरोनाव्हायरसमुळे गेल्या चोवीस तासात जगभरात ६,७८१ जणांचा बळी गेला असून ९४ हजाराहून अधिक नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. काही देशांनी ठप्प पडलेला आर्थिक व्यवहार सुरु करण्यासाठी लॉकडाउनचे नियम शिथिल करण्याचा धाडसी निर्णय घेतला आहे. त्यामुळे रूग्णांच्या संख्येत इतकी मोठी वाढ झाल्याचा दावा केला जातो.

आत्तापर्यंत जगभरात या साथीने २,६५,0९८ जणांचा बळी घेतला आहे. तर जगभरात कोरोनाचे ३८ लाखांहून अधिक रुग्ण असून यापैकी १३ लाख जण बरे होऊन घरी परतले आहेत. जगभरातील कोरोनाच्या साथीची सर्वाधिक झळ अमेरिकेला बसली असून या देशात ७४,८०९ जण या साथीने दगावले आहेत. गेल्या चोवीस तासात अमेरिकेत २०७३ जणांचा बळी गेल्याची माहिती जॉन हॉप्किन्स विद्यापीठाने दिली. तर अमेरिकेत बुधवारी एका दिवसात कोरोनाच्या ३० हजार नव्या रुग्णांची नोंद झाली. सध्या अमेरिकेत कोरोनाचे १२,६२,००० रुग्ण आहेत.

बुधवारी अमेरिकेहून अधिक बळी युरोपात गेले. जॉन हॉप्किन्स विद्यापीठ आणि युरोपिय महासंघाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या चोवीस तासात युरोपात अडीच हजाराहून अधिक जणांचा बळी गेला आहे. यापैकी ब्रिटनमध्ये ४४९, तर इटलीत ३६९, जर्मनीत २८२, फ्रान्समध्ये २७८ आणि स्पेनमध्ये २४४ बळींची नोंद झाली आहे. ब्रिटनमध्ये या साथीत एकूण ३० हजाराहून अधिक बळी गेले आहेत.

युरोपमध्ये गेल्या चोवीस तासात १५ हजारांहून अधिक नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. पण युरोपिय देशांमध्ये याहून अधिक रुग्ण सापडत असल्याचे जर्मनीतील अभ्यासकांचे म्हणणे आहे. त्याचबरोबर ब्रिटन वगळता युरोपमधील इतर देशांनी लॉकडाउनचे नियम शिथिल केले व या साथीचा फैलाव अधिकच वाढला, अशी टीका सुरू झाली आहे.

दरम्यान, गेल्या चोवीस तासात रशियात अकरा हजाराहून अधिक नवे रुग्ण आढळले आहेत. रशियात कोरोनाचे एकूण १,६५,९२९ रुग्ण आहेत. तर ब्राझिलमध्ये १०,५०३ नव्या रुग्णांची नोंद झाली.

leave a reply