मेक्सिकोतील हत्याकांडात 18 ठार

- मृतांमध्ये महापौराचा समावेश

मेक्सिको सिटी – मेक्सिकोच्या गुरेरो प्रांतात एका कार्यक्रमात हल्लेखोरांने केलेल्या गोळीबारात 18 जण ठार झाले. यामध्ये शहराच्या महापौरांचा समावेश असल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. अंमली पदार्थांच्या तस्करीशी जोडलेल्या लॉस टेक्विलेरो या टोळीने हा हल्ला घडविल्याचा आरोप होत आहे. मेक्सिकोचे राष्ट्राध्यक्ष आंद्रेस ओब्राडोर यांच्या सुरक्षाविषयक धोरणांवर देशांतर्गत टीका सुरू असताना हा हल्ला झाला आहे.

गुरेरो प्रांतातील सॅन मिग्यूल टोटोलापन शहरात बुधवारी संध्याकाळी मोटारीतून आलेल्या हल्लेखोरांनी एका कार्यक्रमाला लक्ष्य केले. यामध्ये शहराचे महापौर काँरॅडो मेंडोझा, त्यांचे वडिल आणि माजी महापौर देखील सहभागी झाले होते, त्यावेळी हा हल्ला झाला. मेक्सिकोत हिंसाचाराने सर्वाधिक प्रमाणात ग्रासलेला प्रांत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कॅलिंते भागात ही घटना घडली. 2016 पर्यंत टोटोलापन शहर अपहरण, हत्याकांडासाठी कुप्रसिद्ध होते. अमली पदार्थांच्या तस्करीत गुंतलेली लॉस टेक्विलेरो ही टोळी यामध्ये आघाडीवर होती. अशा टोळीने हा हल्ला घडवून आपली दहशत अधिकच वाढविली आहे.

दरम्यान, राष्ट्राध्यक्ष ओब्राडोर यांनी देशांतर्गत सुरक्षेची जबाबदारी स्थानिक पोलिसांवर न सोपविता थेट लष्कर तैनात केले आहे. यासाठी ओब्राडोर यांच्यावर मेक्सिकोतून टीका होत आहे.

leave a reply