झॅपोरिझिआ अणुप्रकल्पावर रशियाचा ताबा

मॉस्को – युरोपातील सर्वात मोठा अणुप्रकल्प असलेल्या युक्रेनमधील ‘झॅपोरिझिआ न्यूक्लिअर प्लँट’ वर रशियाने ताबा मिळविल्याची घोषणा केली. राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी बुधवारी विशेष आदेश जारी करून ‘रॉसॲटम’ ही रशियन कंपनी झॅपोरिझिआ अणुप्रकल्पाची जबाबदारी सांभाळेल, असे जाहीर केले. दोन दिवसांपूर्वीच रशियन राष्ट्राध्यक्षांनी युक्रेनमधील झॅपोरिझिआसह चार प्रांतांना रशियाचा भाग बनविणाऱ्या कायद्यावर स्वाक्षरी केली होती. अणुप्रकल्पावरील रशियन ताबा त्याचाच पुढील टप्पा मानला जातो. फेब्रुवारी महिन्यात युक्रेनवर चढविलेल्या हल्ल्यानंतर काही आठवड्यांमध्ये रशियाने युक्रेनमधील झॅपोरिझिआ अणुप्रकल्पावर ताबा मिळविला होता. सदर प्रकल्प युक्रेनसह युरोपातील सर्वात मोठ्या अणुऊर्जा प्रकल्पांपैकी एक असून त्याची क्षमता तब्बल सहा हजार मेगावॅट इतकी आहे. या प्रकल्पात मोठ्या प्रमाणात संवर्धित युरेनियम तसेच अणुइंधनाचा साठा आहे. सध्या या प्रकल्पात युक्रेनी कंपनीचे कर्मचारीच कार्यरत आहेत.

युक्रेनने जुलै महिन्यात दक्षिण युक्रेनमध्ये रशियाच्या ताब्यात असणाऱ्या भागांवर प्रतिहल्ले सुरू केले होते. यात अणुप्रकल्पाच्या परिसराचाही समावेश होता. रशियाने या प्रकल्पात मोठ्या प्रमाणात लष्कर तसेच प्रगत संरक्षणयंत्रणा तैनात करून प्रकल्पाच्या सुरक्षेची खबरदारी घेतली होती. मात्र रशियाच्या या तैनातीला धक्का देण्यासाठी युक्रेनी फौजा प्रकल्पाच्या नजिकच्या परिसराला सातत्याने लक्ष्य करीत असल्याचे गेल्या दोन महिन्यात समोर आले होते.

युक्रेन तसेच पाश्चिमात्य यंत्रणांनी हे दावे फेटाळले असून रशियाच प्रकल्पाच्या परिसरात हल्ले घडवून त्याचा दोष युक्रेनवर ढकलत असल्याचे म्हटले आहे. मात्र रशियाने युक्रेनच हल्ले चढवित असल्याची भूमिका घेऊन थेट सुरक्षा परिषदेत धाव घेतली होती. त्यानंतर आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा आयोगाच्या पथकाने सदर प्रकल्पाला भेट दिली होती. आयोगाचे काही सदस्य कायमस्वरुपी प्रकल्पात तैनात करण्याचेही संकेत देण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर, रशियाने प्रकल्प पूर्णपणे आपल्या ताब्यात घेणे महत्वाचे ठरते.

leave a reply