सोमालियातील दहशतवादी हल्ल्यात 20 जणांचा बळी

दहशतवादी हल्ल्यातमोगादिशु – मध्य सोमालियातील हिरान प्रांतात झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 20 जणांचा बळी गेला आहे. अल शबाब या दहशतवादी संघटनेने अन्नधान्याची वाहतूक करणाऱ्या वाहनांना लक्ष्य केल्याची माहिती सूत्रांनी दिली. गेल्या तीन आठवड्यात सोमालियात झालेला हा दुसरा मोठा दहशतवादी हल्ला ठरला आहे. गेल्या महिन्यात सोमालियाची राजधानी मोगादिशुमधील हॉटेलवर अल शबाबने हल्ला चढविला होता.

शनिवारी पहाटेच्या सुमारास अन्नधान्याचे काही क्स हिरानमधील महास शहराकडे चालले होते. त्यावेळी अल शबाबच्या दहशतवाद्यांनी गाड्यांवर हल्ला चढविला. गाड्यांच्या चालकांसह 20 जणांना मारण्यात आले. दहशतवाद्यांनी सात क्स जाळल्याचेही सूत्रांनी सांगितले. गाड्यांमध्ये काही प्रवासीही होते, असे सांगण्यात येते.

गेल्या महिन्यात हिरान प्रांतात सोमालिया लष्कर व अमेरिकेने दहशतवादविरोधी मोहीम हाती घेतली होती. या मोहिमेत 100हून अधिक दहशतवाद्यांना मारण्यात आले असून त्यांचे अनेक तळ उद्ध्वस्त करण्यात आले. या कारवाईत मोठा शस्त्रसाठाही जप्त करण्यात आला आहे. सदर कारवाईमुळे अल शबाबमध्ये अस्वस्थता असून त्यांनी सूड म्हणून महासकडे जाणाऱ्या नागरी वाहनांना लक्ष्य बनविले, असा दावा स्थानिक नागरिक करीत आहेत.

नव्या हल्ल्यामुळे सोमालियन लष्कर व अमेरिकेकडून चालविण्यात आलेली मोहीम अपयशी ठरल्याचे संकेत मिळत आहेत, असा दावा सोमालियातील माध्यमे करीत आहेत.

leave a reply