अफगाणिस्तानातील आत्मघाती हल्ल्यात 20 ठार

- आपल्या नागरिकांच्या सुरक्षेबाबत चीनची चिंता वाढली

आत्मघातीकाबुल/बीजिंग – अफगाणिस्तानची राजधानी काबुलमध्ये दहशतवाद्यांनी चढविलेल्या आत्मघाती हल्ल्यात 20 जणांचा बळी गेला. अफगाणिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाची इमारत आणि चीनच्या दूतावासांपासून काही अंतरावर हा स्फोट झाला. आयएस या दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली. चीनने या हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध केला. तसेच तालिबानची राजवट परदेशी नागरिकांची सुरक्षा करील, असा विश्वास चीनने व्यक्त केला. येत्या वर्षात अफगाणिस्तानातील चिनी नागरिकांवर हल्ल्यांची तीव्रता वाढेल, असा इशारा दोन दिवसांपूर्वीच देण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर, चीन अफगाणिस्तानातील आपल्या नागरिकांच्या सुरक्षेबाबत अधिक सतर्क झाल्याचे दिसत आहे.

बुधवारी संध्याकाळी चारच्या सुमारास अतिशय संवदेनशील समजल्या जाणाऱ्या काबुलमधील झन्बाक चौकात दहशतवाद्यांनी हल्ला चढविला. येथील अफगाणी परराष्ट्र मंत्रालयाच्या इमारतीत प्रवेश मिळविण्याचा प्रयत्न दहशतवाद्याने केला होता. पण तालिबानच्या सुरक्षा रक्षकांनी रोखल्यानंतर दहशतवाद्याने जागीच आत्मघाती स्फोट घडविला. यामध्ये पाच जणांचा बळी गेल्याचा दावा तालिबानच्या पोलीस दलाने केला. पण या स्फोटात किमान 20 जणांचा बळी गेल्याचे दुसऱ्या एका तालिबानी नेत्याने म्हटले आहे. त्याचबरोबर या स्फोटाचे फोटोग्राफ्स सोशल मीडियावर प्रसिद्ध झाले आहेत. यामध्ये रस्त्यावर मृतदेह विखुरलेले दिसत आहेत.

आत्मघाती‘आयएस-खोरासान’ या दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली. या संघटनेने देखील आपल्या हल्ल्यात 20 जण ठार झाल्याचे म्हटले आहे. तसेच मृतांमध्ये राजनैतिक कर्मचाऱ्यांचा समावेश होता, असा दावा या संघटनेने केला. आयएसच्या या दाव्याची पुष्टी होऊ शकलेली नाही. पण अफगाणी पत्रकार आएशा अहमद यांनी बुधवारच्या स्फोटात आपण आपले काका गमावल्याचे सांगून ते वरिष्ठ राजनैतिक अधिकारी होते, अशी माहिती दिली. त्यामुळे या घातपाताचे गांभीर्य अधिकच वाढले आहे. अफगाणी परराष्ट्र मंत्रालयाच्या इमारतीबरोबरच या स्फोटाच्या ठिकाणापासून चीन व तुर्कीचे दूतावास देखील जवळ असल्याचे सांगितले जाते.

त्यामुळे काबुलमधील स्फोटाचा चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते वँग वेंबिन यांनी कठोर शब्दात निषेध नोंदविला आहे. या स्फोटात चीनला जीवितहानी सोसावी लागलेली नाही, असे वेेंबिन यांनी स्पष्ट केले. तसेच अफगाणिस्तानातील तालिबानचे सरकार या दहशतवादी हल्ल्यांपासून चीन व इतर देशांच्या नागरिकांची नक्कीच सुरक्षा करील, असा विश्वासही वेंबिन यांनी व्यक्त केला. मात्र अफगाणिस्तानातील घातपातांमुळे चीनच्या चिंता प्रचंड प्रमाणात वाढल्याचे स्पष्टपणे दिसू लागले आहे.

बुधवारी चीनच्या दूतावासाचाचे शिष्टमंडळ अफगाणी परराष्ट्र मंत्रालयाच्या इमारतीला भेट देणार होते, अशी माहिती समोर येत आहे. परराष्ट्र मंत्रालयाच्या इमारतीबाहेर स्फोट झाला, त्याचवेळी ही भेट ठरलेली होती. मात्र हा स्फोट झाला तेव्हा चीनचे अधिकारी दूतावासात होते की नाही, ते स्पष्ट झालेले नाही. पण चिनी राजनैतिक अधिकारी व नागरिकांना लक्ष्य करण्यासाठी आयएसने हा हल्ला चढविल्याची दाट शक्यता वर्तविण्यात येते. असे असेल तर, गेल्या महिन्याभरात काबुलमध्ये चिनी नागरिकांना लक्ष्य करून आयएसने घडविलेला हा दुसरा हल्ला ठरेल.

याआधी काबुलमधील चिनी नागरिकांची वर्दळ असलेल्या हॉटेलवर आयएसच्या दहशतवाद्यांनी भीषण हल्ला चढविला होता. यानंतरच चीनने आपल्या नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न तालिबानकडे उपस्थित केला होता. तर 2023 साली अफगाणिस्तानात चिनी नागरिकांवरील आयएसचे हल्ले कित्येक पटीने वाढतील, असा इशारा आंतरराष्ट्रीय विश्लेषक देत आहेत. त्यानंतर बुधवारी काबुलमध्ये झालेला हा घातपात म्हणजे चीनसाठी इशारा असल्याचे समोर येत आहे.

leave a reply