भारताचा ‘ग्लोबल साऊथ’ला एकजुटीचा संदेश

‘ग्लोबल साऊथ’नवी दिल्ली – युद्ध, संघर्ष, दहशतवाद, भू-राजकीय तणाव, अन्नधान्य आणि इंधनासह खतांचे कडाडलेले दर हवामान बदलांमुळे उद्भवणाऱ्या नैसर्गिक आपत्ती आणि कोरोनाच्या साथीचे आर्थिक परिणाम, यामुळे सारे जग संकटात सापडलेले आहे. हे अस्थैर्य आणखी किती काळ कायम राहिल, ते सांगता येणे अवघड आहे. अशा संकटाच्या काळात विकसनशील देशांनी एकत्र येऊन जागतिक स्तरावरील राजकीय आणि आर्थिक कारभाराला नव्याने आकार द्यायला हवा. याने विषमता दूर होईल आणि संधी अधिक व्यापक प्रमाणात समोर येईल, असा संदेश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘ग्लोबल साऊथ’ला दिला आहे. त्याचवेळी तुमचा आवाज हा भारताचा आवाज असेल, तुमचा अग्रक्रम हा भारताचा अग्रक्रम असेल, अशी ग्वाही पंतप्रधानांनी ‘ग्लोबल साऊथ’चा भाग असलेल्या गरीब व विकसनशील देशांना दिली.

भारताने गुरुवारी ‘व्हॉईस ऑफ ग्लोबल साऊथ समिट’चे आयोजन केले होते. या व्हर्च्युअल परिषदेचे उद्घाटन करताना पंतप्रधानांनी ग्लोबल साऊथ’चा भाग असलेल्या लॅटिन अमेरिका, आफ्रिका आणि आशिया खंडातील विकसनशील देशांना एकजुटीचे आवाहन केले. जगासमोर खड्या ठाकलेल्या भयंकर समस्यांना विकसनशील देश जबाबदार नाहीत. मात्र या समस्यांचे भीषण परिणाम विकसनशील देशांना भोगावे लागत आहेत, अशा शब्दात पंतप्रधानांनी या देशांची व्यथा मांडली. अशा परिस्थितीत एकजुटीखेरीज पर्याय नाही. विकसनशील देशांनी एकजूट करून जागतिक स्तरावरील राजकीय व आर्थिक कारभाराला नव्याने आकार दिल्यानंतर परिस्थितीत बदल होऊ शकतो, असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला.

यावेळी पंतप्रधानांनी थेट उल्लेख केला नसला तरी पाश्चिमात्यांचा प्रभाव असलेल्या जागतिक राजकीय व आर्थिक व्यवस्थेत विकसनशील देशांना फारसे स्थान नाही. हे स्थान मिळवून आपला राजकीय व आर्थिक प्रभाव वाढविण्यासाठी विकसनशील देशांना एकसंघ व्हावे लागेल. जगाची तीन चतुर्थांश इतकी जनसंख्या जा भौगोलिक क्षेत्रात राहते, त्या देशांना जागतिक व्यवहारात याच प्रमाणात स्थान मिळायला हवे. त्यासाठी आठ दशके जूनी व्यवस्था कामी येणार नाही. यात बदल करून नव्या व्यवस्थेला आकार द्यावे लागेल, याची जाणीव पंतप्रधानांनी करून दिली.

भारतासारखा विकसनशील देशांच्या समस्यांची जाणीव असलेला संवेदनशील देश ही बाब आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रभावीपणे मांडू शकतो, याकडेही पंतप्रधान मोदी यांनी लक्ष वेधले. ग्लोबल साऊथचा आवाज हा भारताचा आवाज असेल, तुमचा अग्रक्रम हा भारताचा अग्रक्रम असेल, अशी ग्वाही पंतप्रधानांनी यावेळी दिली. ग्लोबल साऊथचा भाग असलेले देश एकत्र येऊन नाविण्यपूर्ण संकल्पनांवर काम करू शकतात, या नव्या संकल्पना जी20 व इतर व्यासपीठांवर मांडता येतील, असा प्रस्ताव पंतप्रधानांनी दिला. हे सारे सांगत असताना, पंतप्रधानांनी ग्लोबल साऊथचा भाग असलेल्या देशांना त्यांच्या क्षमतांचीही जाणीव करून दिली. 21 व्या शतकात ग्लोबल साऊथमध्ये येणाऱ्या देशांमुळे जगाचा आर्थिक विकास होईल आणि जगाचा प्राधान्यक्रम आपण निर्धारित करू शकू, असा विश्वास भारताच्या पंतप्रधानांनी व्यक्त केला आहे.

जग अनेक संकटे व समस्यांचा सामना करीत असताना, दुसऱ्यांवरील अवलंबित्त्व कमी करून या सापळ्यातून आपल्याला बाहेर पडावे लागेल, असा संदेशही पंतप्रधानांनी या देशांना दिला.

दरम्यान , ग्लोबल साऊथमध्ये येणाऱ्या लॅटिन अमेरिका, आफ्रिका आणि आशियाई देशांच्या या परिषदेचे आयोजन करून भारताने आपण या देशांचे नेतृत्त्व करण्यास तयार असल्याचा संदेश साऱ्या जगाला दिला आहे. यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावरील भारताचा प्रभाव अधिकच वाढेल, असे दावे केले जातात. या देशांच्या शोषणात नाही, तर विकासात आपल्याला स्वारस्य असल्याचे भारताने दाखवून दिले आहे. ग्लोबल साऊथसाठी पुढाकार घेऊन आर्थिक विकासाचे नवे मॉडेल भारत उभे करीत असल्याचा दावा काही विश्लेषकांनी केला आहे. आधीच्या काळात श्रीमंत व विकसित देशांमध्ये निर्यात वाढवून त्याद्वारे आपल्या अर्थव्यवस्थेला चालना देण्याच्या मॉडेलवर विकसनशील देश काम करीत होते. पण विकनसशील देशांची जनसंख्या व क्षमता लक्षात घेऊन त्यांची बाजारपेठ विकसित करण्यासाठी व त्यात स्थान मिळवण्यासाठी भारत प्रयत्न करीत असल्याचा दावा या विश्लेषकांनी केला आहे.

leave a reply