ब्रिटनच्या ब्रिस्टॉल शहरात झालेल्या दंगलीत २० पोलीस जखमी

- हिंसक जमावाकडून जाळपोळ व पोलीस स्टेशनची नासधूस

लंडन – ब्रिटनच्या ब्रिस्टॉल शहरात ‘पोलिसिंग बिल’विरोधात झालेल्या दंगलीत २० पोलीस जखमी झाले आहेत. रविवारी ब्रिस्टॉलमध्ये निदर्शनांचे आयोजन करण्यात आले होते. मात्र संध्याकाळी हिंसक जमावाने सुरक्षेसाठी तैनात असलेल्या पोलिसांसह त्यांच्या गाड्या तसेच पोलीस स्टेशनला लक्ष्य केले. पोलिसांविरोधात झालेल्या या हिंसाचारावर ब्रिटनच्या गृहमंत्री प्रीती पटेल यांनी तीव्र प्रतिक्रिया नोंदविली असून, निवडक गटांकडून सुरू असलेल्या हिंसक कारवाया व अव्यवस्था खपवून घेतली जाणार नाही, असा इशारा दिला आहे.

ब्रिटनमधील पोलीस यंत्रणेत सुधारणा घडविण्यासाठी तसेच अंतर्गत सुरक्षाव्यवस्था मजबूत करण्यासाठी संसदेत नवे विधेयक मांडण्यात आले आहे. ‘पोलीस, क्राईम, सेंटेंन्सिंग ऍण्ड कोर्टस् बिल’ असे या विधेयकाचे नाव आहे. गेल्या आठवड्यात संसदेतील कनिष्ठ सभागृहात हे विधेयक मंजूर करण्यात आले असून वरिष्ठ सभागृहात चर्चा होणे बाकी आहे. यात पोलीसांना अतिरिक्त अधिकारही देण्याची तरतूद आहे. त्यातील निदर्शनांविरोधात असणार्‍या कलमांना मोठ्या प्रमाणावर विरोध होत आहे.

संसदेसह महत्त्वाची सार्वजनिक ठिकाणे लक्ष्य करून त्या भागात अव्यवस्था निर्माण करणार्‍या निदर्शकांविरोधात आक्रमक कारवाई करण्याचे अधिकार ब्रिटीश पोलिसांना देण्यात येणार आहेत. निदर्शनांदरम्यान गुन्हेगारी व हिंसक कारवाया करणार्‍यांना तीन महिन्यांपासून ते १० वर्षापर्यंत शिक्षा ठोठावण्याची तरतूदही विधेयकात आहे. हिंसक गुन्ह्यांची शक्यता असल्यास निदर्शकांना थांबवून त्यांची तपासणी करण्याचे अधिकारही पोलिसांना या विधेयकामुळे मिळू शकतील, असे सांगण्यात येते.

पोलिसांना देण्यात येणारे हे अधिकार लोकशाही विरोधी व निदर्शकांना सूडबुद्धिने लक्ष्य करणारे आहेत, असा आरोप ब्रिटनमधील काही गटांनी केला आहे. अशा गटांकडूनच रविवारी ब्रिस्टॉलमध्ये निदर्शनांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ‘किल द बिल’च्या घोषणा देण्यात आल्या तसेच फलकही झळकविण्यात आले. सुरुवातीला शांततेत सुरू असणार्‍या या निदर्शनांनी संध्याकाळी आक्रमक रुप धारण केले.

निदर्शकांमधील एका जमावाने सुरक्षेसाठी तैनात पोलीस, पोलिसांचा गाड्या तसेच पोलीस स्टेशनलाही लक्ष्य केले. यावेळी तब्बल १२ गाड्या जाळण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. पोलीस व निदर्शकांमध्ये जोरदार चकमकीही उडाल्या असून त्यात २० पोलीस जखमी झाले आहेत. यावेळी पोलीस स्टेशनचीही नासधूस करण्यात आल्याचे उघड झाले आहे.

leave a reply