नायजरमध्ये ‘आयएस’च्या भीषण दहशतवादी हल्ल्यात ६० जणांचा बळी

- सात दिवसात दुसरा मोठा हल्ला

निआमे – नायजरमध्ये ‘आयएस’संलग्न दहशतवादी संघटनेने केलेल्या दहशतवादी हल्ल्यात ६० जणांचा बळी गेला आहे. नायजर-माली सीमेवर असलेल्या ताहोआ प्रांतात हा हल्ला करण्यात आला. अवघ्या आठवड्याभरात नायजर-माली सीमेवर झालेला हा दुसरा मोठा हल्ला ठरला आहे. यापूर्वी तिलाबेरीमध्ये झालेल्या हल्ल्यात ५८ जणांचा बळी गेला होता. एकापाठोपाठ झालेल्या या हल्ल्यांनी साहेल क्षेत्रातील सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

रविवारी नायजर-माली सीमेवर असलेल्या ताहोआ प्रांतातील तीन गावांमध्ये ‘आयएस’संलग्न दहशतवादी संघटनेने हल्ले चढविले. हल्ल्यात ६० जणांचा बळी गेल्याची माहिती या भागातील मेयर अल्फौझाझी इसिन्टॅग यांनी दिली. मात्र स्थानिक सूत्रांनी हल्ल्याची व्याप्ती मोठी असून बळींची संख्या वाढण्याची शक्यता असल्याची भीती व्यक्त केली आहे. हा हल्ला सूडाचा भाग असू शकतो, असा दावाही करण्यात येत आहे. गेल्या काही आठवड्यात या भागातील संशयित दहशतवाद्यांना ताब्यात घेण्यात आले होते. या कारवाईचा सूड उगविण्यासाठी हल्ला करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

माली-नायजर सीमेवर अवघ्या आठवड्याभरात झालेला हा दुसरा हल्ला ठरला आहे. गेल्या सोमवारी नायजरमधील ‘तिलाबेरी’ भागात झालेल्या हल्ल्यांमध्ये ५८ जणांचा बळी गेला होता. हल्ल्याची जबाबदारी कोणत्याही संघटनेने स्वीकारली नसली तरी ‘बोको हराम’ किंवा ‘आयएस’संलग्न दहशतवादी गटाने हल्ला चढविल्याचा संशय सूत्रांनी व्यक्त केला होता. नायजरमध्ये गेल्या तीन महिन्यात झालेला हा तिसरा मोठा हल्ला ठरला आहे. यापूर्वी जानेवारी महिन्यात झालेल्या हल्ल्यात सुमारे १०० जणांचा बळी गेला होता.

दरम्यान, मालीमध्ये गेल्या आठवड्यात झालेल्या हल्ल्याची जबाबदारी ‘आयएस’ या दहशतवादी संघटनेने स्वीकारली आहे. या हल्ल्यात ‘आयएस’ने मालीच्या ईशान्य भागातील अन्सोंगो शहराजवळ असणार्‍या लष्करी चौकीवर हल्ला चढविला होता. सुरुवातीला त्यात ११ जवानांचा बळी गेल्याची माहिती देण्यात आली होती. मात्र एकूण ३३ सैनिकांचा बळी गेल्याचे उघड झाले आहे. गेल्या महिन्याभरात ‘आयएस’ने माली लष्कराला लक्ष्य करण्याची ही दुसरी घटना ठरते.

नायजर व मालीमधील वाढत्या दहशतवादी हल्ल्यांनी ‘साहेल’ क्षेत्रातील सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. फ्रान्स व अमेरिकेने या क्षेत्रातील विविध देशांमध्ये लष्करी तळ उभारले असून दहशतवादविरोधी मोहिमेसाठी तैनातीही केली आहे. मात्र त्यानंतरही ‘आयएस’ व ‘अल कायदा’संलग्न संघटनांचे या क्षेत्रातील देशांमध्ये होणारे हल्ले सातत्याने वाढताना दिसत आहेत. ही बाब आंतरराष्ट्रीय स्तरावरून साहेलमध्ये सुरू असलेली मोहीम अपयशी ठरल्याचे संकेत देणारी ठरते.

पश्‍चिम आफ्रिकेतील नायजर, माली, बुर्किना फासो, चाड, नायजेरिया व मॉरिशानिया या देशांना ‘साहेल कंट्रीज्’ म्हणून ओळखले जाते.

leave a reply