चीनबरोबर रक्तरंजित युद्धाखेरीज फिलिपाईन्सला सागरी क्षेत्र परत मिळणार नाही

- फिलिपाईन्सचे राष्ट्राध्यक्ष रॉड्रिगो दुअर्ते

रक्तरंजितमनिला – ‘‘‘वेस्ट फिलिपाईन्स सी’वर नियंत्रण मिळविण्यासाठी चीनबरोबर युद्ध करण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. रक्तपाताशिवाय दुसर्‍या कुठल्याही मार्गाने आपले सागरी क्षेत्र फिलिपाईन्सला मिळू शकणार नाही. त्यासाठी ही किंमत मोजावीच लागेल. हे युद्ध रक्तरंजित असेल आणि यात जय आणि पराजय अशा दोन्ही शक्यता संभवतात’, असा निर्वाणीचा इशारा फिलिपाईन्सचे राष्ट्राध्यक्ष रॉड्रिगो दुअर्ते यांनी आपल्या जनतेला दिला आहे. यानंतर दुअर्ते सरकारने चीनच्या मिलिशिया जहाजांनी घुसखोरी केलेल्या वेस्ट फिलिपाईन्स सीच्या क्षेत्रातील विनाशिका, गस्तीजहाजे आणि विमानांची तैनाती वाढविण्यासाठी पावले उचलली आहेत.

दोनशेहून अधिक चीनच्या जहाजांनी फिलिपाईन्सच्या सागरी हद्दीत घुसखोरी केलेली आहे. या जहाजांवर लष्करी प्रशिक्षण घेतलेले चीनचे मिलिशिया आहेत. या घुसखोरीला दोन महिने पूर्ण होणार आहेत. या घुसखोरीच्या विरोधात फिलिपाईन्सचे संरक्षणमंत्री आणि लष्करप्रमुखांनी चीनवर घणाघाती टीका करून चीनला परिणामांचा इशाराही दिला होता. तरीही राष्ट्राध्यक्ष दुअर्ते यांनी चीनच्या विरोधात भूमिका घेण्याचे टाळल्याची टीका सुरू झाली होती. सोमवारी राष्ट्राध्यक्ष दुअर्ते यांनी कॅबिनेटच्या बैठकीत व त्यानंतर जनतेला संबोधित करताना चीनबरोबर युद्ध पेट घेईल, याची जाणीव फिलिपाईन्सच्या जनतेला करून दिली.

रक्तरंजित‘२०१६ साली हेग येथील आंतरराष्ट्रीय न्यायालयाने फिलिपाईन्सच्या सार्वभौम सागरी अधिकारांवर शिक्कामोर्तब केले होते. या निर्णयाची अंमलबजावणी करायची असेल तर युद्धाशिवाय दुसरा पर्याय नाही. फिलिपाईन्स सी सामर्थ्याचा वापर करूनच परत मिळविता येईल’, असे राष्ट्राध्यक्ष दुअर्ते म्हणाले. ‘चीनच्या मच्छिमार नौकांनी फिलिपाईन्सच्या हद्दीत मासेमारी केली, तर त्यावर भांडण करण्याचे कारण नाही. पण चीन जर या क्षेत्रात इंधन, निकेल किंवा इतर कुठल्याही खनिजांचे उत्खनन सुरू करणार असेल तर त्यावर त्यावर ऍक्शन घेण्याची वेळ आलेली आहे’, असे दुअर्ते यांनी बजावले.

‘चीनने फिलिपाईन्सच्या सागरी क्षेत्रात उत्खनन सुरू केले तर ते उभय देशांमधील कराराचे उल्लंघन ठरेल व चीनच्या या उत्खननाला उत्तर देण्यासाठी फिलिपाईन्स देखील आपली जहाजे चीनच्या हद्दीत रवाना करून उत्खनन सुरू करील’, असे राष्ट्राध्यक्ष दुअर्ते यांनी बाजवले. फिलिपाईन्सचे संरक्षणमंत्री डेल्फिन लॉरेंझा यांनी देखील यानिमित्ताने चीनवर ताशेरे ओढले. ‘चीनच्या जहाजांची सदर सागरी क्षेत्रातील तैनाती या देशाचे खरे हेतू उघड करणारी आहे. या तैनातीद्वारे चीन वेस्ट फिलिपाईन्स सीचा ताबा घेण्याच्या प्रयत्नात आहे’, असा आरोप लॉरेंझा यांनी केला.

याआधी फिलिपाईन्सच्या सागरी सार्वभौमत्वाचे उल्लंघन करून चीनने अशाच प्रकारे पानाताग शोल आणि पांगानिबान द्विपाच्या हद्दीत घुसखोरी केल्याची आठवण लॉरेंझा यांनी करुन दिली. याबरोबर येथील सागरी क्षेत्रातील आपल्या हितसंबंधांच्या सुरक्षेसाठी फिलिपाईन्सने बुधवारपासून विनाशिका, गस्तीनौका आणि हवाई गस्तीचे प्रमाण वाढविले आहे. फिलिपाईन्स दावा करीत असलेल्या सागरी क्षेत्रातून आपल्या काही जहाजांनी माघार घेतल्याचा दावा चीन करीत आहे. पण अजूनही चीनची जहाजे या भागात असल्याचा आरोप फिलिपाईन्स करीत आहे.

leave a reply