आणखी 25 देश भारतीय लसींच्या प्रतिक्षेत

- परराष्ट्रमंत्री एस.जयशंकर

अमरावती – भारताने आतापर्यंत 15 देशांना कोरोना लसींचा पुरवठा केला आहे, तर आणखी 25 देश भारताने तयार केलेल्या लसीची प्रतिक्षा करीत आहेत, असे परराष्ट्रमंत्री एस.जयशंकर यांनी म्हटले आहे. कोरोनाव्हायरसच्या संकटात आपल्या स्थानिक क्षमतांचा वापर करून विश्‍व पटलावर भारत उदयास आला आहे, असे जयशंकर यांनी अधोरेखित केले.

ब्रिटनच्या ‘ऑक्सफर्ड-ॲस्ट्राजेनेका’ने विकसित केलेल्या ‘कोविशिल्ड’ लसीचे उत्पादन भारतीय कंपनी सिरमकडून पुण्यात घेतले जात आहे. तर ‘भारत बायोटेक’ व ‘इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च’ने (आयसीएमआर) मिळून विकसित केलेल्या ‘कोव्हॅक्सिन’ लसीलाही वापरास गेल्या महिन्यात परवानगी दिली होती. त्यानंतर जानेवारीच्या 16 तारखेपासून देशात लसीकरण सुरू झाले आहे. आतापर्यंत सुमारे 54 लाख आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देण्यात आली आहे.

याचबरोबर इतर देशांनाही भारत लस पुरवित आहे. आपल्या शेजारी देशांना आणि काही मित्र देशांना भारताने सदिच्छा म्हणून 55 लाख लसी भेट दिल्या आहेत. यामध्ये श्रीलंका, बांगलादेश, नेपाळ. मॉरिशस, सेशल्स, म्यानमार, मालदीव, बाहरीनसाख्या देशांचा समावेश आहे. याबरोबरच अनेक देश भारताकडून लस खरेदी करीत आहेत. सौदी अरेबिया, दक्षिण आफ्रिका, ओमान, मंगोलिया, निकारागुआ, कॅनडासारख्या देशांनी भारतीय लसीची मागणी केल्याचे याआधी परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले होते.

या पार्श्‍वभूमीवर, परराष्ट्रमंत्र्यांनी अनेक देश भारतीय लस मिळविण्याच्या प्रतिक्षेत असल्याचे एका कार्यक्रमात सांगितले. आंध्र प्रदेशात एका कार्यक्रमात बोलताना जयशंकर यांनी आतापर्यंत 15 देशांना भारताने लसीचा पुरवठा केला आहे. तर आणखी 25 देश भारताकडून ही लस मिळविण्याच्या तयारीत आहेत, अशी माहिती दिली.

भारताकडून लस मिळविण्याच्या प्रतिक्षेत असलेल्या देशांच्या तीन श्रेणी करता येतील, असे जयशंकर म्हणाले. यामध्ये काही गरीब देशांना अनुदानावर भारतीय लसी हव्या आहेत. तर काही देश किंमतीच्या दृष्टीने भारतीय लसीचा विचार करीत आहेत. लस बनविणाऱ्या भारतीय कंपन्यांनी ज्या दरात भारत सरकारला लसीचा पुरवठा केला, त्याच दरात हा लसीचा पुरवठा आपल्या देशालाही व्हावा, अशी काही देशांची मागणी आहे. तसेच तर काही देश थेट भारतीय कंपन्यांशी करार करीत असल्याचे जयशंकर म्हणाले. यामुळे भारत याबाबतील जगाच्या नकाशावर उदयाला आला आहे.

भारताला जगाची फार्मसी म्हणून स्थापित करण्याचे ध्येय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ठेवले आहे. कोरोनाचे संकटाच्या बाबतीत भारत जगाचे नेतृत्च म्हणून उदयास आला आहे. भारताने स्थानिक क्षमतांचा वापर करून याबाबतीत आघाडी घेतली. ज्यावेळी कोरोनाचे संकट आले त्यावेळी जगातील कोणताच देश या संकटाशी सामना करण्यासाठी तयार नव्हता. भारताचीही वेगळी स्थिती नव्हती. मास्क, पीपीई किट सारखी साधनेही ठरावीक देशांकडे होती. आज भारत पीपीई किटचा जगातील सर्वाधिक निर्माता देश आहे. तसेच मास्कचे सर्वाधिक उत्पादन भारतात होत आहे. सध्या 25 कंपन्या देशात व्हेंटिलेटर बनवित आहेत. हे सर्व भारत आपल्यासाठी त्याचबरोबर जगासाठी तयार करीत असल्याचे, परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी अधोरेखित केले.

सध्या भारतात कोरोनाच्या रुग्णांची संख्या कमी झाली आहे. कोरोनासारख्या महाभयंकर संकटाचा सामना आपण ज्या पद्धतीने केला आपण तसेच आपल्या गुणवत्ता वक्षमतांचा वापर देश घडविण्यासाठी करु शकतो. तसे घडले तर भारत नव्या उंचीवर जाऊ शकतो, असे जयशंकर म्हणाले.

leave a reply