पाकिस्तानी नौदलाचे ‘सबमरिन फोर्स’चे स्वप्न बुडाले

इस्लामाबाद – चीनकडून मिळणाऱ्या पाणबुड्यांच्या सहाय्यावर अरबी समुद्रात ‘सबमरिन फोर्स’ उभारण्याचे पाकिस्तानचे स्वप्न बुडाल्याचे संकेत मिळाले आहेत. पाकिस्तानच्या नौदलाचे प्रमुख ॲडमिरल एम. अमजद खान नियाझी यांनी नुकत्याच एका मुलाखतीत, चीनच्या सहकार्याने पाकिस्तानी नौदलाचे आधुनिकीकरण वेगाने सुरू असल्याचा दावा केला होता. मात्र चीनकडून पाकिस्तानसाठी बनविण्यात येणाऱ्या पाणबुड्यांसाठी इंजिन्स देण्यास जर्मनीने नकार दिल्याचे सांगण्यात येते.

काही वर्षांपूर्वी पाकिस्तानी नौदलाची अवस्था दयनीय असल्याच्या बातम्या स्थानिक तसेच परदेशी माध्यमांमध्ये प्रसिद्ध झाल्या होत्या. पाकिस्तानकडे असलेल्या पाणबुड्यांपैकी फक्त एकच पाणबुडी कार्यरत असल्याचे त्यात सांगण्यात आले होते. आंतरराष्ट्रीय स्तरावर खिल्ली उडाल्यानंतर पाकिस्तान सरकारने चीन तसेच तुर्कीकडून पाणबुड्या व इतर युद्धनौका मिळविण्यासाठी हालचाली सुरू केल्या होत्या. 2015 साली पाकिस्तानने चीनबरोबर आठ पाणबुड्यांसाठी करार केला होता.

करारानुसार, चार पाणबुड्या चीनमध्ये तर चार पाकिस्तानमध्ये बांधण्यात येणार आहेत. त्याची प्राथमिक तयारी सुरू झाल्याचे दावेही दोन्ही देशांकडून करण्यात आले आहेत. पहिल्या दोन पाणबुड्या 2022 साली एप्रिल तसेच ऑक्टोबर महिन्यात मिळतील, असे करारात नमूद करण्यात आले आहे. मात्र आता ही शक्यता धूसर बनली असून नौदलाला आधुनिक पाणबुड्यांनी सज्ज करण्याचे पाकिस्तानची महत्त्वाकांक्षा भंग पावल्याचे मानले जाते.

चीनकडून निर्मिती होणाऱ्या पाणबुड्यांसाठी जर्मनीकडून डिझेल इंजिन्स घेण्यात येणार होते. मात्र जर्मन कंपनीने अजूनही इंजिन निर्यात करण्याची तयारी दाखविलेली नाही. चीनने पाकिस्तानसाठी बनविण्यात येणाऱ्या पाणबुड्यांना चिनी बनावटीचे इंजिन देण्याची तयारीही दर्शविली आहे. मात्र पाकिस्तानी नौदलाने प्रगत जर्मन इंजिन्सचीच मागणी पुढे रेटली असून माघार घेण्यास नकार दिला आहे. त्यामुळे नौदलासाठी प्रगत पाणबुड्यांचा ताफा उभारण्याची पाकिस्तानची योजना लटकल्याचे दिसत आहे.

leave a reply