येमेनमध्ये तीन दिवसात २६० हौथी बंडखोर ठार

- सौदी अरेबियाचा दावा

हौथी बंडखोररियाध/सना – सौदी अरेबिया व अरब मित्रदेशांच्या आघाडीने गेल्या तीन दिवसांमध्ये येमेनमध्ये चढविलेल्या हल्ल्यात २६० हून अधिक हौथी बंडखोर मारल्याचा दावा केला. यापैकी १०५ बंडखोर चोवीस तासात ठार केले. तर गेल्या दोन आठवड्यांमध्ये जवळपास १,७०० हौथी बंडखोरांना संपविल्याचे सौदी व मित्रदेशांच्या आघाडीने जाहीर केले.

येमेनच्या उत्तरेकडील इंधनसंपन्न मरिब हा प्रांतासाठी हा संघर्ष सुरू आहे. गेल्या आठ महिन्यांपासून हौथी बंडखोर मरिबवर ताबा मिळविण्यासाठी जोरदार हल्ले चढवित आहेत. यासाठी हौथी बंडखोरांनी रणगाडे, तोफा, ड्रोन्स तसेच क्षेपणास्त्रांचा वापर केला होता. येमेनी लष्कराने आत्तापर्यं हौथी बंडखोरांचे हे हल्ले थोपवून मरिबवरील ताबा कायम राखला होता. मात्र बंडखोरांचे हल्ले तीव्र होत असताना, गेल्या काही आठवड्यांपासून सौदी अरेबिया व अरब मित्रदेश येमेनी सरकारच्या बाजूने मरिबच्या संघर्षात उतरले आहेत.

मरिब हा येमेनच्या हादी सरकारसाठी धोरणात्मकदृष्ट्या अतिशय महत्त्वाचा प्रांत मानला जातो. मरिबवरील नियंत्रण गमावले तर हादी सरकार येमेनवरील ताबा गमावून बसेल. असे झाले तर येमेनमध्ये इराणसमर्थक हौथी बंडखोरांची सत्ता प्रस्थापित होईल. याने येमेनला सीमा भिडलेल्या सौदी अरेबियाच्या धोक्यात वाढ होईल. त्याचबरोबर पर्शियन आखातापासून ते रेड सीपर्यंतच्या अतिमहत्त्वाच्या सागरी क्षेत्रावर इराण व इराणसमर्थक हौथी बंडखोरांचे वर्चस्व निर्माण होईल. तसेच या सागरी क्षेत्रातून होणारी अब्जावधी डॉलर्सच्या व्यापारी वाहतुकीची कोंडी इराण करू शकतो.

केवळ सौदीच नाही तर युएई, इजिप्त या अरबदेशांनाही याचा धोका संभवतो. म्हणूनच हौथी बंडखोरांच्या विरोधात येमेनी लष्कर करीत असलेल्या मरिबमधील संघर्षात सौदी व मित्रदेशांची आघाडीही उतरल्याचे दिसत आहे. २०१४ सालापासून येमेनमध्ये राष्ट्राध्यक्ष हादी विरुद्ध लष्करप्रमुख हौथी यांच्यामध्ये सत्तासंघर्ष पेटलेला आहे. सौदी, युएई, इजिप्त, बाहरिन, सुदान हे देश राष्ट्राध्यक्ष हादी यांचे सरकार वाचविण्यासाठी हौथी यांच्या बंडखोरांशी लढत आहेत.

सौदी व अरब मित्रदेशांची आघाडी हौथी नेतृत्त्व करीत असलेल्या बंडखोरांवर अजूनही मात करू शकलेली नाही, याचे कारण हौथी बंडखोरांना इराणचे संपूर्ण समर्थन मिळत आहे. यामुळे येमेनमधील संघर्ष हा सौदीप्रणित अरब देशांची आघाडी व इराणमधील अप्रत्यक्ष अप्रत्यक्ष युद्ध असल्याचे मानले जाते.

leave a reply