हौथींना दहशतवादी घोषित करण्यास 29 स्वयंसेवी संघटनांचा विरोध

वॉशिंग्टन – येमेनमधील हौथी बंडखोरांनी हौदेदा शहरावर चढविलेल्या हल्ल्यात 10 जणांचा बळी गेला. याबरोबर गेल्या दोन आठवड्यात हौथींच्या हल्ल्यात बळी गेलेल्यांची संख्या 51 वर पोहोचली असून यामध्ये मुलांचाही समावेश आहे. येमेनमधील जनतेचा बळी घेणाऱ्या हौथींना ‘दहशतवादी’ घोषित करण्यासाठी अमेरिकेतील ट्रम्प प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत. पण असे झाले तर येमेनमधील मानवतावादी सहाय्यावर याचा परिणाम होईल, असे सांगून आंतरराष्ट्रीय स्तरावरील 29 स्वयंसेवी संघटनांनी हौथींना दहशतवादी घोषित करू नये, अशी मागणी केली आहे. त्याचबरोबर ओमानच्या परराष्ट्रमंत्र्यांनी देखील अमेरिकेच्या या निर्णयाने परिस्थिती बदलणार नसल्याचे म्हटले आहे.

येमेनमधील सरकारविरोधात बंड पुकारुन सत्ता काबिज करणाऱ्या हौथी बंडखोरांना सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिरात’ने (युएई) 2014 सालीच दहशतवादी संघटना म्हणून घोषित केले होते. येमेनसह आपल्याही देशातील दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी असल्याचा आरोप सौदी व युएईने केला होता. 2018 सालापासून अमेरिकेतील ट्रम्प प्रशासन देखील हौथी बंडखोरांना दहशतवादी संघटना घोषित करण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. या प्रयत्नांचा भाग म्हणून गेल्या काही दिवसांपासून राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी यासाठी वेगाने हालचाली सुरू केल्या होत्या.

येमेनमधील हौथी बंडखोरांना इराणचे सहाय्य मिळत असल्याचा आरोप अमेरिका, सौदी, युएई करीत आहे. अमेरिका व सौदीने याआधी याचे पुरावेही सादर केले होते. त्यामुळे हौथींना दहशतवादी घोषित करुन इराणवरील दबाव वाढविण्याची राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची योजना होती. संयुक्त राष्ट्रसंघाने आधीच हौथींना निर्बंधित केले असून त्यांना शस्त्रपुरवठा करण्यास मनाई आहे. अशा परिस्थितीत, हौथींना दहशतवादी संघटना घोषित केल्यानंतर येमेनमध्ये सैन्य घुसवून अमेरिकेला हौंथींविरोधात कारवाई करणे सोपे गेले असते. याचा थेट परिणाम हौथींना पाठबळ देणाऱ्या इराणवर झाला असता, असा दावा अमेरिकेचे माजी राजदूत व विश्‍लेषक करीत आहेत.

मात्र, राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी हा निर्णय घेण्याच्या आधीच अमेरिकेसह जगभरातील सुमारे 29 स्वयंसेवी संघटनांनी हौथींना दहशतवादी संघटना जाहीर करू नका, अशी मागणी केली आहे. ‘ऑक्सफम अमेरिका’, ‘नॉर्वेयिअन रिफ्युजी काऊन्सिल’, ‘इंटरनॅशनल रेस्क्यू कमिटी’ अशा 29 स्वयंसेवी व मानवतावादी सहाय्य करणाऱ्या संघटनांनी अमेरिकन काँग्रेसला लिहिलेल्या पत्रात हौथींना दहशतवादी संघटना जाहीर करण्याच्या निर्णयाला विरोध केला आहे.

येमेनच्या सुमारे 80 टक्के भागावर हौथींचे वर्चस्व आहे. हौथी बंडखोरांच्या मंजुरीनंतरच येमेनमधील जनतेला मानवतावादी सहाय्याचा पुरवठा केला जातो. अशा परिस्थितीत त्यांना दहशतवादी संघटना घोषित केले तर येमेनी जनतेला मिळणारे सहाय्य रोखले जाईल, येथील जनतेची उपासमार होईल, वैद्यकीय सहाय्यावर परिणाम होईल व त्याने दारूण संकट ओढावेल, असा इशारा या मानवतावादी संघटना देत आहेत. तर ओमानचे परराष्ट्रमंत्री ‘सईद बद्र अल बुसैदी’ यांनी देखील हौथींना दहशतवादी घोषित केल्याने काही फरक पडणार आहे का, असा सवाल केला. हौथींना दहशतवादी संघटना घोषित केल्याने येमेनमधील संघर्ष थांबणार नसून तो अधिकच भडकेल, असे बुसैदी यांनी म्हटले आहे.

अशा परिस्थितीत, इराणवर सर्व बाजूंनी दबाव वाढविण्याच्या प्रयत्नात असलेल्या अमेरिकेतील ट्रम्प प्रशासनाच्या हौथी बंडखोरांबाबत कोणता निर्णय घेईल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

leave a reply