सूडाने पेटलेल्या इराणपासून असलेल्या धोक्याच्या पार्श्‍वभूमीवर

- इस्रायलचा आपल्या अणुशास्त्रज्ञांना अलर्ट

जेरुसलेम – आपल्या अणुशास्त्रज्ञाच्या हत्येनंतर सूडाने पेटून उठलेला इराण प्रत्युत्तरादाखल इस्रायलच्या अणुशास्त्रज्ञांना लक्ष्य करू शकतो. हा धोका लक्षात घेऊन इस्रायली सुरक्षा यंत्रणेने ‘नेगेव्ह’ येथील अणुप्रकल्पात काम केलेल्या आपल्या शास्त्रज्ञांना सावध केल्याची माहिती समोर आली आहे. चार दिवसांपूर्वीच इस्रायलने अरब देशांमध्ये पर्यटनाला गेलेल्या आपल्या नागरिकांना सावध राहण्याचा इशारा दिला होता. या व्यतिरिक्त इस्रायली लष्कर व संरक्षण यंत्रणांनी लेबेनॉन व सिरियातील गोपनिय माहितीचे संकलन वाढविण्यासाठी हालचाली तीव्र केल्या आहेत.

गेल्या महिन्यात 27 नोव्हेंबर रोजी इराणची राजधानी तेहरानजवळ मोहसिन फखरीझादेह या वरिष्ठ अणुशास्त्रज्ञाची हत्या करण्यात आली. अणुकार्यक्रमात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या आपल्या शास्त्रज्ञाच्या या हत्येसाठी इस्रायल जबाबदार असल्याचा आरोप इराणने केला होता. या अणुशास्त्रज्ञाची हत्या घडविणाऱ्यांना याचे परिणाम भोगावे लागतील, अशी धमकी इराणचे नेते व लष्करी अधिकारी देत आहेत. ही धमकी इस्रायली सुरक्षा यंत्रणांनी गांभीर्याने घेतल्याची माहिती समोरआली आहे.

इस्रायलच्या ‘शिमॉन पेरेस नेगेव्ह अणु संशोधन केंद्र’ येथील माजी शास्त्रज्ञाला इस्रायलच्या सुरक्षा यंत्रणेने सावध राहण्याचा इशारा दिला आहे. आपल्या प्रवासाच्या मार्गात नेहमी बदल करत रहा आणि संशयित हालचालींबाबत सुरक्षा अधिकाऱ्यांना सावध करा, अशी सूचना आपल्याला दिल्याची माहिती या शास्त्रज्ञाने स्थानिक वृत्तवाहिनीला दिली. इस्रायली वृत्तवाहिनीने सदर शास्त्रज्ञाचे नाव घोषित करण्याचे टाळले असून इतरही अणुशास्त्रज्ञ तसेच अणुकार्यक्रमाशी संबंधित विश्‍लेषकांनाही असेच सावधानतेचे इशारे मिळाल्याचा दावा इस्रायली वृत्तवाहिनी करीत आहे.

या व्यतिरिक्त इस्रायली अणुशास्त्रज्ञांच्या ऑनलाईन व्यवहार आणि सोशल मीडियातील हालचालींवरही इराण नजर ठेवून असल्याचे इस्रायली वृत्तवाहिनीने आपल्या बातमीत म्हटले होते. याआधी इस्रायली सुरक्षा यंत्रणांनी आपल्या नागरिकांनाही सावध केले होते. संयुक्त अरब अमिरात, बाहरिन या देशांमध्ये पर्यटनासाठी गेलेल्या इस्रायली नागरिकांना गर्दीच्या ठिकाणापासून दूर रहावे, अशा सूचना दिल्या होत्या. अरब देशच नाही तर अमेरिकेसह युरोप, आशिया, लॅटिन अमेरिका या देशांमधील आपल्या नागरिकांसाठीही असाच अलर्ट देण्यात आला होता.

इस्रायलची सुरक्षा यंत्रणा इराणच्या हल्ल्यापासून आपल्या अणुशास्त्रज्ञांना तसेच नागरिकांना सावध करीत असताना, तेल अविवमध्ये इस्रायली गुप्तचर यंत्रणा ‘मोसाद’च्या कमांडरचा खून झाल्याची चर्चा सुरू झाली आहे. गुरुवारी संध्याकाळी ‘फहमी हिनावी’ या मोसाद कमांडरची भर रस्त्यात हत्या झाल्याचा दावा इराणी माध्यमे करीत आहेत. इराणच्या सोशल मीडियावर याचा व्हिडिओ वायरल झाला असून इराणने फखरीझादेह यांच्या हत्येचा सूड घेतल्याचा दावाही केला जातो. इस्रायल तसेच इराणच्या सरकारने यावर प्रतिक्रिया दिलेली नाही.

दरम्यान, अणुशास्त्रज्ञ फखरीझादेह नागरी अणुकार्यक्रमावर काम करीत होते, असा दावा इराण करीत आहे. पण इस्रायली वर्तमानपत्राने प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार, दशकभरापूर्वीच फखरीझादेह यांनी इराणसाठी पाच अणुबॉम्बची निर्मिती करण्याची तयारी केली होती. इस्रायलच्या गुप्तचर यंत्रणेकडे फखरीझादेह यांची ध्वनीफीत असल्याचे सांगितले जाते. इस्रायलचे माजी पंतप्रधान एहूद ओल्मर्ट यांनी अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जॉर्ज बुश यांच्याबरोबरच्या खास चर्चेत हा पुरावा सादर केला होता, असा दावा इस्रायली वर्तमानपत्राने केला आहे.

leave a reply