मालीतील ‘आयएस’च्या हल्ल्यात 30 जणांचा बळी

30 जणांचा बळीबमाको – मालीतील गाओ प्रांतात ‘आयएस’ दहशतवाद्यांनी चढविलेल्या हल्ल्यात 30 जणांचा बळी गेला. सरकारसमर्थक बंडखोरांचा गट असणाऱ्या ‘प्लॅटफॉर्म’ या गटाने ही माहिती दिली. यावेळी ‘आयएस’च्या दहशतवाद्यांनी मोठ्या प्रमाणात लुटालूट व जाळपोळ केल्याचेही बंडखोर गटाकडून सांगण्यात आले. मालीत गेल्या दोन महिन्यात झालेला हा चौथा मोठा दहशतवादी हल्ला ठरला आहे. गेल्या महिन्यात टेसिट शहरात झ्ाालेल्या हल्ल्यात 21 जणांचा बळी गेला होता.

बुर्किना फासो व नायजरच्या सीमेला लागून असलेला गाओ प्रांत दहशतवादी गटांचे आश्रयस्थान मानला जातो. या प्रांतात मालीचे लष्कर व सरकारसमर्थक बंडखोरांकडून ‘आयएस’ या दहशतवादी संघटनेविरोधात मोहीम सुरू आहे. यावेळी आयएसच्या दहशतवाद्यांनी सरकारसमर्थक गटांवर मोठे हल्ले चढविले. हे हल्ले चुकविण्यासाठी सरकारसमर्थक बंडखोरांनी तलातये भागानजिक माघार घेतली. त्यांचा पाठलाग करताना आयएसच्या दहशतवाद्यांनी तलातये भागात हल्ला चढविला. या हल्ल्यात 30 नागरिकांचा बळी गेल्याचे ‘प्लॅटफॉर्म’ या बंडखोरांच्या गटाने सांगितले.

आफ्रिकेच्या ‘साहेल रिजन’ म्हणून ओळखण्यात येणाऱ्या क्षेत्रात गेल्या दशकभरात दहशतवादी गटांचा प्रभाव वाढत असल्याचे दिसत आहे. त्याविरोधात फ्रान्स व अमेरिका या देशांनी स्थानिक लष्करांच्या सहाय्याने व्यापक दहशतवादविरोधी मोहीम राबविली होती. मात्र त्याला मर्यादित यश मिळाल्याचा दावा करण्यात येतो. साहेलमधील आघाडीचा देश असणाऱ्या मालीने आपल्या देशातील फ्रेंच लष्कराची तैनाती काढून घेतली आहे. त्याबदल्यात रशियाच्या ‘वॅग्नर ग्रुप’ या खाजगी कंपनीकडून कंत्राटी जवानांचे सहाय्य घेतले.

रशियन कंत्राटी जवानांच्या सहाय्याने सुरू असलेल्या कारवायांना चांगले यश मिळत असल्याचा दावा मालीच्या लष्कराकडून नुकताच करण्यात आला होता. मात्र या दाव्यानंतरच लष्करी तळांवर तसेच पथकांवर होणारे दहशतवादी हल्ले अचानक वाढले आहेत.

leave a reply