जर्मन अर्थव्यवस्था मंदी टाळू शकणार नाही

- डॉईश बँकेच्या प्रमुखांचा इशारा

जर्मन अर्थव्यवस्थाबर्लिन – ‘रशिया युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर जागतिकीकरणाच्या प्रक्रियेला खीळ बसली असून ती पुन्हा सुरळीत होण्याची शक्यता नाही. त्याचवेळी इंधनाची टंचाई निर्माण होण्याचा धोका असून महागाईचा भडकाही कायम राहण्याची शक्यता आहे. या घटकांमुळे जर्मन अर्थव्यवस्था मंदीत जाण्याची शक्यता असून ती टाळता येणे अशक्य आहे’, असा इशारा डॉईश बँकेचे प्रमुख ख्रिस्तिअन सेविंग यांनी दिला. त्याचवेळी जर्मन अर्थव्यवस्था चीनवर मोठ्या प्रमाणात अवलंबून असून हे अवलंबित्व कमी करण्यासाठी जर्मन सरकारने प्रयत्न करायला हवेत, असे आवाहनही सेविंग यांनी केले आहे. काही दिवसांपूर्वीच जर्मन अभ्यासगट ‘इन्स्टिट्यूट फॉर एम्प्लॉयमेंट रिसर्च’ने(आयएबी), पुढील वर्षभरात जर्मनीच्या जीडीपीत 1.7 टक्क्यांची घट होईल व जवळपास अडीच लाख जणांना रोजगार गमवावा लागेल, असे भाकित वर्तविले होते.

रशिया-युक्रेनयुद्धाच्या पार्श्वभूमीवर जर्मनीत इंधनाचे दर मोठ्या प्रमाणात भडकले असून वीजेच्या पुरवठ्यावरही मर्यादा आल्या आहेत. रशियाने इंधनपुरवठ्यात घट केल्याने हिवाळ्यासाठी जर्मनीकडे नैसर्गिक इंधनवायूचा पुरेसा साठा होणे शक्य नसल्याचे आधीच बजावण्यात आले आहे. त्यामुळे जर्मनीत इंधन व ऊर्जेचे रेशनिंग सुरू झ्ााले असून सामान्य जनतेसह उद्योगक्षेत्रात तीव्र नाराजी आहे. येत्या काही काळात या नाराजीचे गंभीर परिणाम जर्मनीत जाणवू लागतील, असे संकेत वरिष्ठ अधिकारी तसेच विश्लेषकांकडून देण्यात येत आहेत. या पार्श्वभूमीवर सेविंग यांचा इशारा लक्षवेधी ठरतो.

जर्मन अर्थव्यवस्था

जर्मनीच्या फ्रँकफर्ट शहरात झालेल्या ‘बँकिंग समिट’मध्ये डॉईश बँकेच्या प्रमुखांनी जर्मन अर्थव्यवस्थेबाबत भाकित वर्तविले. ‘गेल्या काही दशकात निश्चित घटकांच्या आधारावर जागतिक अर्थव्यवस्थेबाबत भाकित करण्यात येत होते. मात्र रशिया-युक्रेन युद्धाने ही निश्चितता संपवून टाकली आहे. भूराजकीय तणावांमुळे जागतिकीकरणाला खीळ बसली असून ती प्रक्रिया पूर्वपदावर आणणे अवघड आहे. जागतिक स्तरावरील पुरवठा व मूल्यसाखळी विस्कळीत झाली आहे. मनुष्यबळाच्या बाजारपेठेतही अडचणी निर्माण झाल्या आहेत. इंधन व ऊर्जेच्या टंचाईमुळे सर्वच उत्पादनांच्या दरात प्रचंड वाढ होत आहे. त्यामुळे युरोपातही महागाईचा भडका उडाला आहे. या सर्व घटकांचा विचार करता जर्मनी आपल्यावरील मंदीचे संकट टाळू शकणार नाही’, असे सेविंग यांनी बजावले.

जर्मन अर्थव्यवस्थायावेळी डॉईश बँकेच्या प्रमुखांनी जर्मनीच्या चीनवर असलेल्या अवलंबित्वाकडेही लक्ष वेधले. जर्मनीची आठ टक्के निर्यात व 12 टक्के आयात चीनवर अवलंबून आहे. रशियन इंधनाची आयात कमी करणे जितके महत्त्वाचे आहे, तितकेच चीनवर असलेले अवलंबित्त्व कमी करणेही आवश्यक आहे, याची जाणीव सेविंग यांनी करून दिली. अमेरिका व चीनमध्ये निर्माण झालेला तणाव जर्मन अर्थव्यवस्थेसाठी धोक्याचा ठरतो, असा दावाही डॉईश बँकेच्या प्रमुखांनी केला.

कोरोना, रशिया-युक्रेन युद्ध व चीनच्या अर्थव्यवस्थेत सुरू असलेल्या घसरणीमुळे युरोपातील प्रमुख अर्थव्यवस्था असणाऱ्या जर्मनी, फ्रान्स व इटलीसारख्या देशांच्या निर्यातीला धक्का बसला आहे. गेले काही महिने युरोपातील उत्पादन क्षेत्रातही घसरण होत असून या क्षेत्राचा निर्देशांक फेब्रुवारी 2021नंतरच्या नीचांकी पातळीवर गेला आहे. ऊर्जा संकटाची वाढती व्याप्ती, महागाईचा भडका, उत्पादन व निर्यातीला बसलेला फटका आणि शेअरबाजारांसह युरो चलनात झालेली घसरण हे घटक युरोपिय महासंघाची अर्थव्यवस्था मंदीत जाण्याचा धोका वाढल्याचे संकेत देणारे आहेत, असा दावा विश्लेषकांकडून यापूर्वीच करण्यात आला आहे. डॉईश बँकेच्या प्रमुखांचा इशारा त्याला दुजोरा देणारा ठरतो.

leave a reply