लिबियातील अंतर्गत संघर्षात 32 जणांचा बळी, दीडशेहून अधिक जखमी

conflict in Libyaत्रिपोली – लिबियात नेतृत्त्वावरून पेटलेल्या संघर्षात 32 जणांचा बळी गेला असून 150हून अधिक जण जखमी झाले आहेत. या महिन्यात राजधानी त्रिपोलीत संघर्षाचा भडका उडण्याची ही दुसरी वेळ आहे. राजधानी त्रिपोलीत झालेला नवा संघर्ष म्हणजे मोठ्या युद्धाची चाहूल असल्याचा इशारा विश्लेषकांनी दिला.

libya tripoli2011 साली नाटोसह पाश्चिमात्य देशांच्या आघाडीने लिबियातील हुकुमशहा मुअम्मर गद्दाफी यांची सत्ता उलथवून लावली होती. त्यानंतर या देशात अराजकसदृश स्थिती असून विविध गट सत्ता मिळविण्यासाठी संघर्ष करीत आहे. संयुक्त राष्ट्रसंघटनेच्या पाठिंब्यावर ‘जीएनयू’ हा गट सध्या राजधानी त्रिपोलीवर नियंत्रण ठेऊन आहे. मात्र पाश्चिमात्य देशांनी बसविलेल्या या सरकारला पूर्व लिबियातील बंडखोर गटांनी तीव्र विरोध केला आहे.

लिबियातील लष्करप्रमुख जनरल खलिफा हफ्तार यांच्या नेतृत्त्वाखालील लिबियन नॅशनल आर्मीने संयुक्त राष्ट्रसंघटनेने मान्यता दिलेल्या सरकारविरोधात जोरदार संघर्ष छेडला आहे. या गटाने आपले स्वतंत्र सरकार पूर्व लिबियामध्ये स्थापन केले असून राजधानी त्रिपोलीवर ताबा मिळविण्यासाठी जोरदार संघर्ष सुरू केला आहे. या गटाचे पंतप्रधान असलेल्या फाथी बाशागा यांच्या समर्थकांनी शनिवारी त्रिपोलीवर हल्ला चढविला होता.

libya-mapअनेक तास सुरू असलेला हा संघर्ष संध्याकाळनंतर संपुष्टात आल्याचे सांगण्यात येते. ‘जीएनयू’ गटाचे समर्थन करणाऱ्या सशस्त्र गटांनी बाशागा यांच्या समर्थकांना राजधानीतून बाहेर ढकलल्याचा दावा केला आहे. अमेरिका तसेच तुर्कीने शनिवारी झालेल्या संघर्षाचा तीव्र शब्दात निषेध नोंदविला. तुर्कीने ‘जीएनयू’ गटाला आपले समर्थन दिले असून आम्ही आमच्या लिबियन बांधवांच्या पाठीशी ठाम उभे असल्याची प्रतिक्रिया दिली. तर अमेरिकेने हिंसाचाराचा निषेध करताना तातडीने संघर्षबंदी करावी, अशी मागणी केली आहे.

मात्र अवघ्या महिन्याभरात दुसऱ्यांदा राजधानी त्रिपोलीत भडकलेला संघर्ष नव्या युद्धाचे संकेत देणारा असल्याचा इशारा विश्लेषक देत आहेत. लिबियातील हफ्तार गट पुन्हा बळकट होत असून त्यांच्याकडून नजिकच्या काळात मोठे हल्ले होऊ शकतात, असा दावा ‘अटलांटिक कौन्सिल’च्या विश्लेषकांनी केला. हफ्तार गटाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गेल्या काही दिवसात परदेशात दिलेल्या भेटीगाठींकडेही लक्ष वेधण्यात येत आहे.

leave a reply