अफगाणिस्तानातील अमेरिकेच्या सैन्यमाघारीचा चीन आणि रशिया फायदा घेतील

- अमेरिकेतील विश्लेषकांचा इशारा

वॉशिंग्टन – गेल्या वर्षी अमेरिकेने घेतलेल्या बेजबाबदार सैन्यमाघारीमुळे अफगाणिस्तानात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. त्याचबरोबर बायडेन प्रशासनाने अफगाणिस्तानचा अब्जावधी डॉलर्सचा निधीही रोखला आणि तालिबानच्या राजवटीबरोबर व्यवहार करण्यासाठी देखील तयार नाही. यामुळे तालिबानसह अफगाणी जनता देखील अमेरिकेवरील विश्वास गमावून बसली आहे. चीन व रशिया नेमका याचा फायदा घेऊन अफगाणिस्तानात मोठी संधी साधू शकतात, असा इशारा अमेरिकेतील विश्लेषक देत आहेत. तालिबानने अफगाणिस्तानात राजवट प्रस्थापित करून एक वर्ष पूर्ण झाले आहे. यानिमित्ताने अमेरिकेतील माजी अधिकारी तसेच लष्करी व सामरिक विश्लेषक अफगाणिस्तानबाबत चुकलेल्या निर्णयांवर टीका करीत आहेत. तसेच या सैन्यमाघारीमुळे अमेरिकेसमोरील आव्हाने आणि धोके वाढल्याचे हे विश्लेषक लक्षात आणून देत आहेत. या सैन्यमाघारीतून अमेरिकेने नेमके काय मिळविले,असा प्रश्न अमेरिकन अधिकारीच विचारत आहेत.

troops in Afghanistanफॉक्स न्यूज या अमेरिकी वृत्तवाहिनीशी बोलताना माजी राजनैतिक अधिकारी, तसेच प्रसिद्ध अभ्यासगटाच्या विश्लेषकांनी अफगाणिस्तानबाबतचा चुकीच्या निर्णयामुळे अमेरिकेला मोठा सामरिक धोका संभवतो असा इशारा दिला. चीन, रशियासारखे अफगाणिस्तानचे शेजारी देश तालिबानच्या राजवटीला मान्यता न देताही त्यांच्याबरोबर व्यवहार करत आहेत. त्यातही चीनने तालिबानच्या राजवटीला अधिकृत मान्यता दिली नसली तरी तालिबानच्या प्रतिनिधींबरोबर बैठका सुरू ठेवल्या आहेत. अमेरिकेच्या माघारीनंतर अफगाणिस्तानात मोठ्या प्रमाणात गुंतवणुकीची घोषणा करणारा चीन लवकरच या देशात आपले इंजिनियर्स, कर्मचारी रवाना करू शकतो, याकडे ‘इन्स्टिट्यूट फॉर द स्टडी ऑफ वॉर’ या अभ्यासगटाचे विश्लेषक पीटर मिल्स यांनी लक्ष वेधले.

तर अमेरिकेच्या माजी राजनैतिक अधिकारी लिसा कर्टिस यांनी अफगाणिस्तान माघारीतून आणि आत्तापर्यंतच्या अफगाणिस्तानविषयक भूमिकेतून अमेरिकेने काय साध्य केले, असा प्रश्नच उपस्थित केला आहे. तालिबानच्या नेत्यांबरोबर चर्चा करायची नाही, या धोरणातून आपण अमेरिकेचेच खूप मोठे नुकसान करीत आहोत, अशी जळजळीत टीका कर्टिस यांनी केली. तालिबानशी चर्चा करून चीन अफगाणिस्तानातील आपले हेतू साध्य करून मध्य आशियामध्ये जम बसविण्याचा प्रयत्न करणार आहे. अफगाणिस्तानच्या आर्थिक कमजोरीचा फायदा घेऊन चीन स्वत:चे उद्दिष्ट गाठणार आहे, असा इशारा कर्टिस यांनी दिला.

रशिया युक्रेनमधील युद्धात गुंतलेली असताना अमेरिकेने अफगाणिस्तानात लक्ष वळविणे आणि तिथून पुढे मध्य आशियाई देशांमध्ये आपला प्रभाव वाढविणे अतिशय महत्त्वाचे ठरते, असा इशारा कर्टिस यांनी दिला. रशिया व चीनच्या प्रभावाशी स्पर्धा करण्यासाठी मध्य आशियाई देशांमधील अमेरिकेची गुंतवणूक व त्यासाठी अफगाणिस्तानातील तालिबानच्या राजवटीबरोबरचे संबंध देखील तितकेच महत्त्वाचे ठरतात, असा दावा कर्टिस यांनी केला.

रशिया युक्रेनमधील युद्धात गुंतलेला असताना अफगाणिस्तानातील परिस्थितीचा सर्वाधिक फायदा घेण्याची संधी चीनकडे आहे व चीन ती साध्य करीत आहे, असे अमेरिकन गुप्तचर यंत्रणेचे माजी अधिकारी रेबेका कोफलर यांनी स्पष्ट केले. रशिया आजही तालिबानला दहशतवादी संघटनाच मानतो. तरीही रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन तालिबानबरोबर चर्चा करण्याच्या निर्णयावर ठाम आहेत. अफगाणिस्तानचे शेजारी देशही नेमके हेच करत आहेत आणि यामध्ये अमेरिका कमी पडते, अशी टीका कोफलर यांनी केली.

leave a reply