चीनच्या राखीव साठ्यातील चार टक्के सोने खोटे

बीजिंग – चीनकडे असलेल्या राखीव सोन्याच्या साठ्यातील ८३ टन म्हणजेच किमान चार टक्के सोने बनावट असल्याचा दावा करण्यात आला आहे. चीनच्या लष्कराशी संबंधित व सोन्याच्या बाजारपेठेतील प्रमुख खाजगी कंपन्यापैकी एक ‘वुहान किनगोल्ड ज्वेलरी इन्क.’ ने बनावट सोन्याच्या आधारावर सुमारे २.८ अब्ज डॉलर्सचा निधी गोळा केला. या कंपनीने तारण ठेवलेले सोने प्रत्यक्षात सोन्याचा फक्त मुलामा दिलेले तांब्याचे ठोकळे असल्याचे आढळले आहे. चीनमधील ‘कैशिन’ व अमेरिकेतील ‘झिरो हेज’ या वेबसाइट्सनी यासंदर्भातील वृत्त दिले असून चीनमधील इतर कंपन्यांमध्येही अशा प्रकारचे घोटाळे झालेले असू शकतात, असा दावा केला आहे.

China-Goldकोरोनाव्हायरस साथीचे उगमस्थान ठरलेल्या चीनच्या वुहान शहरातच सोन्याचा नवा घोटाळा उघडकीस आला आहे. ‘वुहान किनगोल्ड ज्वेलरी इन्क.’ या कंपनीने गेल्या पाच वर्षात आपल्याकडील सोने तारण ठेवून 2.8 अब्ज डॉलर्सचे कर्ज घेतले. काही महिन्यांपूर्वी या कंपनीला कर्ज देणाऱ्यापैकी ‘डोंगुआन ट्रस्ट’ बँकेने कर्जाची परतफेड करून घेण्यासाठी सोने विकण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी ‘वुहान किनगोल्ड ज्वेलरी इन्क.’ ने तारण ठेवलेले सोने बनावट असल्याचे उघड झाले. कंपनीने तारण ठेवलेले सोने म्हणजे प्रत्यक्षात सोन्याचा मुलामा दिलेले ‘कॉपर बार्स’ असल्याचे आढळले.

या घटनेनंतर ‘वुहान किनगोल्ड ज्वेलरी इन्क.’ ला कर्ज देणाऱ्या इतर वित्तसंस्था आहे खडबडून जाग्या झाल्या. यातील काही संस्थांना प्रत्यक्ष सोने सोपविण्यासही कंपनीने नकार दिल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे या कंपनीकडे खरोखर सोन्याचे साठे आहेत की नाही यावरच प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. त्यातच या कंपनीची पार्श्वभूमीही लक्ष वेधून घेणारी ठरली आहे.

चीनच्या ‘पीपल्स लिबरेशन आर्मी’मधून निवृत्त झालेले लष्करी अधिकारी जिया झीहोंग यांनी २००२ साली ‘वुहान किनगोल्ड ज्वेलरी इन्क.’ कंपनीची स्थापना केली. चीनमधील सोन्याच्या बाजारपेठेत हुबेई प्रांतातील सर्वात मोठी खाजगी कंपनी म्हणून ‘वुहान किनगोल्ड ज्वेलरी इन्क.’ ओळखण्यात येते. या कंपनीचे अमेरिकेतील प्रसिद्ध शेअरबाजार ‘नॅस्डक’मध्येही नोंदणी झाली आहे. त्यानंतर चीनने स्वतंत्ररित्या स्थापन केलेल्या ‘शांघाय गोल्ड एक्सचेंज’ मध्येही या कंपनीचा समावेश आहे.

China-Gold‘वुहान किनगोल्ड ज्वेलरी इन्क.’ ने तारण ठेवलेल्या सोन्याची चीनमधील काही विमा कंपन्यांनी हमी घेतली होती. वित्तसंस्थांनी विमा कंपन्यांच्या सर्टिफिकेटच्या आधारावर कंपनीला कर्ज दिले होते. मात्र आता सोन्याचा बनावट निघाल्यामुळे कोर्टात दावा दाखल करण्यात आला असून ‘वुहान किनगोल्ड ज्वेलरी इन्क.’सह विमा कंपन्यांनाही आरोपी करण्यात आले आहे.

वित्तसंस्थाना तारण ठेवलेले सोने बनावट निघण्याची चीनमधील गेल्या पाच वर्षातील ही दुसरी मोठी घटना ठरली आहे. यापूर्वी २०१६ साली चीनच्या शांक्सी व हुनान प्रांतांमध्ये बनावट सोन्याचे प्रकरण उघडकीस आले होते. त्यात तब्बल १९ वित्तसंस्थांमध्ये तारण ठेवलेले २.५ अब्ज डॉलरचे सोने अशुद्ध असल्याचे आढळले होते. त्यावेळी जप्त करण्यात आलेल्या ‘गोल्ड बार्स’मध्ये ‘टंगस्टन’ धातूचे पत्रे आढळले होते.

‘वुहान इन्क.’च्या घटनेने चीनमधील सोन्याचे साठे व एकूणच अर्थव्यवस्थेबद्दल मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. गेल्या काही वर्षात, चीनच्या राजवटीकडून दाखविण्यात येणारे आर्थिक विकासदराचे आकडे फुगवून सांगण्यात येत असल्याचा दावा करणारे अहवाल प्रसिद्ध झाले आहेत. चीनच्या विश्लेषकांनीही यासंदर्भात खळबळजनक दावे केले आहेत. चीनमधील सोन्याचे साठे व त्याबाबत सरकारकडून देण्यात येणारी माहिती यावरही परदेशी तज्ञांनी वारंवार संशय व्यक्त केला आहे. चीनच्या वित्तसंस्थांकडून जाहीर होणाऱ्या कर्जाचे आकडे म्हणजे निव्वळ बुडबुडे असल्याचे इशारेही देण्यात आले आहेत.

बनावट सोन्याचे प्रकरण या सर्वांना दुजोरा देणारे ठरले आहे. त्यामुळे महासत्ता होण्याचे दावे करणाऱ्या चीनने उभा केलेला प्रचंड आर्थिक डोलारा प्रत्यक्षात पोकळ असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.

leave a reply