युरोपमधील ऊर्जा संकटाच्या पार्श्वभूमीवर फ्रान्समधील अणुऊर्जा उत्पादनात 50 टक्क्यांची घट

पॅरिस/मॉस्को – रशिया-युक्रेन युद्धामुळे युरोपातील ऊर्जा संकटाची तीव्रता वाढत असतानाच फ्रान्ससारख्या आघाडीच्या देशातील अणुऊर्जा उत्पादन 50 टक्क्यांनी घटल्याचे उघड झाले आहे. फ्रान्समधील जवळपास 56 अणुभट्ट्या सुरक्षा तसेच देखभालीच्या कारणावरून बंद करण्यात आल्याने ही परिस्थिती ओढवली आहे. अणुऊर्जा उत्पादन बंद पडल्याने फ्रान्सने युरोपच्या ‘इलेक्ट्रिसिटी ग्रिड’मधून अतिरिक्त ऊर्जेची खरेदी सुरू केली आहे. फ्रान्सच्या या खरेदीचा फटका इतर छोट्या युरोपिय देशांना बसू शकतो व युरोपातील ऊर्जा संकट अधिकच गंभीर होईल, असा दावा विश्लेषक करीत आहेत.

गेल्या वर्षी कोरोनाच्या साथीच्या संकटातून जागतिक अर्थव्यवस्था बाहेर पडत असतानाच अनेक देशांमध्ये इंधन व ऊर्जेची मागणी अचानक मोठ्या प्रमाणात वाढली होती. मात्र मर्यादित उत्पादन व जागतिक पुरवठा साखळीत निर्माण झालेल्या अडचणींमुळे जगातील आघाडीच्या देशांना ‘एनर्जी क्रायसिस’ला तोंड द्यावे लागले होते. त्यात अमेरिका व चीनसह युरोपिय देशांचाही समावेश होता. चीनने इंधनाची आयात वाढवून तर. अमेरिकेने आपले ‘स्ट्रॅटेजिक रिझर्व्ह’ खुले करून इंधनाचे संकट काही प्रमाणात रोखल्याचे चित्र उभे केले होते. मात्र युरोपिय देशांमधील इंधन व ऊर्जा क्षेत्रातील संकट पूर्णपणे निवळले नसून युक्रेन युद्धाने त्यात अधिकच भर घातल्याचे दिसत आहे.

युरोपिय देशांच्या उर्जानिर्मितीत नैसर्गिक इंधनवायू, कच्चे तेल व कोळशाचा मोठा वाटा आहे. मात्र फ्रान्ससारख्या देशाने गेल्या शतकातच अणुऊर्जा निर्मितीवर भर दिला होता. सध्या फ्रान्सच्या ऊर्जेची 70 टक्के मागणी अणुऊर्जेच्या माध्यमातून पूर्ण होते. फ्रान्समध्ये असलेल्या एकूण 56 अणुऊर्जा भट्ट्यांमधून या ऊर्जेची निर्मिती होते. याव्यतिरिक्त फ्रान्स जलविद्युत प्रकल्प, नैसर्गिक इंधनवायू व ‘रिन्युएबल एनर्जी’च्या माध्यमातून आपली ऊर्जेची गरज पूर्ण करतो.

फ्रान्समध्ये एकूण मागणीपेक्षा जास्त ऊर्जेची निर्मिती होत असल्याने फ्रान्स हा युरोपमधील आघाडीचा ऊर्जा निर्यातदार देश म्हणून ओळखण्यात येतो. फ्रान्सकडून जर्मनी, ब्रिटन व इटली यांना ऊर्जा निर्यात केली जाते. असे असतानाही फ्रान्समधील ऊर्जानिर्मितीचा मुख्य स्रोत असलेल्या अणुऊर्जा निर्मितीला बसलेला फटका लक्ष वेधून घेणारा ठरतो. फ्रान्समधील 56 अणुभट्ट्यांपैकी 28 अणुभट्ट्या सुरक्षा, दुरुस्ती व देखभाल या कारणांवरून बंद करण्यात आल्या आहेत.

यामुळे फ्रान्समधील ऊर्जानिर्मितीला मोठा धक्का बसला आहे. ऊर्जा निर्यातदार असलेल्या या देशाला युरोपच्या इलेक्ट्रिसिटी ग्रीडमधून ऊर्जा खरेदी करणे भाग पडल्याचे उघड झाले. फ्रेंच कंपन्यांनी खरेदी केलेल्या ऊर्जेचा स्रोत सांगण्यास नकार दिला आहे. त्यामुळे फ्रान्सच्या या निर्णयावर सवाल उपस्थित करण्यात येत आहेत. एकाच कालावधीत जवळपास 28 अणुभट्ट्यांमधून होणारी ऊर्जानिर्मिती बंद कशी होऊ शकते, असा सवाल माध्यमांसह विश्लेषक व तज्ज्ञांकडून करण्यात येत आहे.

सध्या युरोपात सुरू असलेल्या ऊर्जा संकटाच्या पार्श्वभूमीवर फ्रान्समधील अणुऊर्जानिर्मिती बंद पडणे ही लक्ष वेधून घेणारी बाब ठरली आहे. रशिया-युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर युरोपिय देशांच्या इंधनपुरवठ्यात व पर्यार्याने ऊर्जानिर्मितीत मोठे अडथळे निर्माण झाले आहेत. अशा वेळी पर्यायी इंधन व ऊर्जा स्रोत पूर्ण क्षमतेने कार्यरत ठेवणे आवश्यक असताना अणुऊर्जा निर्मितीचे स्रोत बंद झाल्याने युरोपमधील ऊर्जा संकट अधिकच गंभीर होण्याचे संकेत मिळत आहेत.

leave a reply